‘मेनोपॉज’ अर्थात ‘रजोनिवृत्ती’ हा आजार नव्हे. प्रत्येक स्त्रीला आयुष्यातील या टप्प्याला सामोरे जावेच लागते. मासिक पाळी सुरू होण्याच्या वयात मुली मनाची जी घालमेल अनुभवतात, तीच घालमेल आणि अस्वस्थता मेनोपॉजच्या काळातही स्त्रियांना सतावते. मात्र हा निसर्गचक्राचाच एक भाग आहे. जीवनातल्या या पर्वाला सकारात्मक दृष्टीकोनाने स्वीकारणे आवश्यक आहे.
मेनोपॉज म्हणजे स्त्रियांची मासिक पाळी कायमची बंद होणे. सर्वसाधारणपणे वयाच्या ४५ ते ५० व्या वर्षी स्त्रीला मेनोपॉज येऊ शकतो. अशा वेळी जर एखाद्या स्त्रीला एक वर्षांपर्यंत मासिक पाळी आलीच नाही तर तिला मेनोपॉज आला असे म्हणता येते. तरीही या स्त्रियांनी पाळी चुकल्याची शंका आल्यावर स्त्रीरोग तज्ञांकडून तो मेनॉपॉजचाच टप्पा असल्याची शहानिशा करून घेणे आवश्यक आहे. पाळी बंद होण्याआधी काही वर्षे आधीपासूनच स्त्रियांच्या शरीरात त्या दृष्टीने काही बदल घडायला सुरुवात होते. या काळाला ‘पेरीमेनोपॉजल पिरीयड’ म्हणतात. हा काळ साधारणपणे ३ ते ४ वर्षांचा असू शकतो. मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती हा आजार नाही. निसर्गचक्राचाच हा एक भाग आहे. त्यामुळे जीवनाच्या या पर्वाला सकारात्मक भावनेने स्वीकारणे आवश्यक आहे.
काही दिवसांपूर्वी एका वर्तमानपत्रातील बातमीने लक्ष वेधून घेतले. बातमी होती एका लग्न होऊ घाललेल्या २८- २९ वर्षांच्या मुलीला ‘मेनोपॉज’ आल्याबाबतची. सहाजिकच ही बातमी वाचणाऱ्या बऱ्याच जणी अकारण काळजीत पडल्या. जर एखाद्या स्त्रीला वयाच्या ३५ वर्षांच्या आधीच मेनोपॉज आला तर त्याला ‘अर्ली’ किंवा अकाली मेनोपॉज असे म्हटले जाते. अकाली मेनोपाज अर्थातच विरळा आढळतो. लवकर मेनाोपॉज येण्याची ही तक्रार आनुवांशिक असू शकते. आईला लवकर मेनोपॉज आला असेल तर मुलीचीही तीच प्रवृत्ती असू शकते. स्त्रीला ‘पेल्व्हिक इन्फेकशन’ किंवा क्षयासारखा एखादा आजार होऊन गेल्यामुळे तिच्या ओव्हरीजवर परिणाम होऊनही अकाली मेनोपॉज येऊ शकतो.
मेनोपॉजची लक्षणे
* मासिक पाळी अनियमित होऊन हळूहळू पूर्णपणे बंद होणे.
* मानसिक स्थितीत अकारण बदल होणे. एका क्षणी आनंदी वाटणे तर दसऱ्याच क्षणी काहीही सबळ कारण नसताना निराशा दाटून येणे.
हॉट फ्लशेस
सारे काही व्यवस्थित असताना काही क्षणातच शरीराचे तापमान वाढते. लगेच थोडय़ा वेळात हे तापमान कमी होऊन थंड वाटते. यामुळे दरदरुन घाम सुटतो. कधी- कधी रात्री झोपमोड होते.
* पचनशक्ती मंदावल्यामुळे सतत पोट गच्च झाल्यासारखे वाटते.
* स्मरणशक्ती कमी होते.
* योनीमार्ग कोरडा पडून शारिरिक संबंधास त्रास होतो.
* सांधे दुखी
* वजनात वाढ. विशेषत: पोटाचा घेर वाढतो.
* त्वचेवर दिसणारे परिणाम. त्वचा कोरडी होऊन अंगाला खाज येणे. त्वचेवर सुरकुत्या दिसणे, त्वचा सैल पडणे.
* नखे/ हाडे ठिसूळ होणे. इ.
ही सगळी लक्षणे प्रत्येक स्त्रीमध्ये दिसतीलच असे नाही. लक्षणांची तीव्रताही कमी- अधिक होऊ शकते.
मेनोपॉजनंतर स्त्रीच्या शरीरातील ‘फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन’ आणि ‘ल्युटेनायझिंग हॉर्मोन’ या हॉर्मोन्सचे प्रमाण वाढते तर ‘इस्ट्रोजेन’ या हॉर्मोनचे प्रमाण कमी होते.
मेनोपॉज नंतरच्या आवश्यक तपासण्या
* सीरम कॅल्शिअम.
* सीरम व्हिटामीन डी- ३
* बोन डेन्सिटी-
वयाच्या चाळीसाव्या वर्षांनंतर दर दोन वर्षांनी बोन डेन्सिटी तपासणी करणे आवश्यक
मॅमोग्राफी – स्तनांतील गाठी आणि स्तनांच्या कर्करोगाची शक्यता पडताळण्यासाठी वयाच्या ४५व्या वर्षांनंतर दर दोन वर्षांनी मॅमोग्राफी तपासणी करणे आवश्यक आहे.
मेनोपॉजनंतर जीवनशैलीमध्ये करावयाचे बदल
* शारीरिक क्षमतेनुसार नियमित व्यायाम आवश्यक.
* मानसिक ताण कमी करण्यासाठी प्राणायाम आणि ध्यान (मेडिटेशन) करावे.
* शक्यतो सुती आणि सैलसर कपडय़ांचा वापर करावा.
* कोणत्याही प्रकारे तंबाखूचे सेवन टाळावे.
* भरपूर पाणी प्यावे.
* कॅल्शिअमयुक्त आहार घ्यावा. आहारात सोयाबिनचे एक किलो पीठ पाच किलो गव्हाच्या पिठात मिसळून त्याचा वापर रोजच्या जेवणातील चपात्या/ पोळ्यांसाठी करता येईल. सोयाबिनच्या दुधाचे पनीर (टोफु), सोया चंक्स, सोया मिल्क लाभदायक ठरते. भरपूर प्रमाणात फळे, भाज्यांचे सेवन करावे. भोपळा मेनोपॉजसाठी अतिशय लाभदायक. दररोज किमान १ ग्लास दूध प्यावे. एकाच वेळी भरपूर खाण्यापेक्षा ४-५ वेळा थोडे थोडे खावे. तेलकट आणि मसालेदार पदार्थ कमी प्रमाणात खावेत. कॉफीचे अतिरिक्त सेवन टाळावे. दररोज ४-५ बदाम खाल्ले तर उत्तम. तीळ आणि जवसाचाही रोजच्या जेवणात समावेश करणे लाभदायक.
सतत मूड बदलण्याच्या तक्रारीवर (मूड स्विंग) ओट्स, पनीर, कडधान्यांचा आहारात अधिक प्रमाणात असणे फायदेशीर ठरू शकते. सफरचंद, पिअर, द्राक्षे ही फळे आणि खजुर, मनुका हा सुकामेवा जरूर खावा. या फळांमुळे हाडे ठिसूळ होण्याची म्हणजे ऑस्टिओपोरॉसिसच्या प्रक्रियेचा वेग मंदावू शकतो.
वयाची पस्तिशी उलटण्यापूर्वीच काही मुलींना मेनोपॉज येऊ शकतो.
अकाली (अर्ली) मेनोपॉजला कारणीभूत ठरू शकणाऱ्या गोष्टी-
* आनुवंशिकता
* हायपोथायरॉइडिझम
* क्षय (टीबी)
* गालगुंड
स्त्रीचे गर्भाशय व अंडाशय शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकावे लागले असल्यास कर्करोगावरील उपचारांत रेडिएशन व केमोथेरपी द्यावी लागल्यास अकाली मेनोपॉजसाठी करावयाच्या तपासण्या-
* एफएसएच (फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन) टेस्ट
* एलएच (ल्युटेनायझिंग हॉर्मोन) टेस्ट
* इस्ट्राडिऑल टेस्ट
* प्रोजेस्टेरॉन टेस्ट
* टेस्टॉस्टेरॉन टेस्ट
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- लोकसत्ता
Leave a Reply