नवीन लेखन...

मैदाने इतर खेळांसाठी मोकळी करा !

रविवार २० मे २०१२

क्रिकेटचे हे भूत लोकांच्या डोक्यावरून उतरवायचे असेल, तर एक चांगला उपाय आहे आणि तो म्हणजे क्रिकेटसाठी जी मैदाने उभी करण्यात आली आहेत ती सगळी मैदाने इतर खेळांसाठी सक्तीने उपलब्ध करून द्यावीत. या मैदानांवर आधी इतर खेळांना प्राधान्य देण्यात यावे. ही

मैदाने हॉकी, फुटबॉल, खो-खो, कबड्डीसारख्या खेळांना अग्रक्रमाने देण्यात यावी. या खेळांच्या वेळापत्रकातून वेळ मिळालाच, तर त्यावर क्रिकेटचे सामने घेण्याची परवानगी दिली जावी.

सध्या सुरू असलेल्या क्रिकेटच्या आयपीएलमध्ये मॅच फिक्सिंग, स्पॉट फिक्सिंग होत असल्याचे एका वृत्त वाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाले. अर्थात त्यात आश्चर्य वगैरे वाटण्याचे कारण नाही. भारतात क्रिकेट हा खेळ खेळ म्हणून नव्हे, तर धनाढ्य लोकांचा जुगार म्हणूनच खेळला जात होता. सट्टेबाजी, मॅच फिक्सिंगसारखे प्रकार या खेळात सातत्याने होत आले आहेत आणि आता तर आयपीएलसारख्या प्रकाराने देशातील धनाढ्य उद्योगपतींना आपला काळा पैसा पांढरा करण्याचे एक उत्तम साधन प्राप्त करून दिले आहे. सुब्रतो रॉय, विजय मल्ल्या, प्रीती झिंटा, नेस वाडीया, शाहरूख खान या लोकांचा क्रिकेटशी काय संबंध? परंतु प्रचंड पैसे मोजून खेळाडूंना विकत घेत हे लोकही आयपीएलच्या मैदानात उतरले आहेत. विजय मल्ल्यांकडे आपली किंगफिशर एअरलाईन सांभाळण्यासाठी पैसा नाही; परंतु आयपीएलमध्ये मात्र ते कोट्यवधीची उधळण करीत आहेत. मागे एकदा शाहरूखने एक सामना जिंकल्यानंतर आपल्या खेळाडूंना पार्टी दिली आणि त्या पार्टीत स्कॉटलंडमधून मागविलेली वाईन खेळाडूंना पुरविण्यात आली. तशा प्रकारची वाईन खास ऑर्डर करून मागवावी लागते आणि भारतात केवळ दोन दोनच बॉटल त्यावेळी मागविण्यात आल्या होत्या, त्यापैकी एक शाहरूखने मागविली होती. त्या वाईनच्या ३० मिलिलीटर पेगसाठी तब्बल ४० हजार रुपये मोजावे लागले होते. ही इतकी उधळपट्टी हे लोक कसे करू शकतात? आपल्याकडील प्रचंड प्रमाणात असलेला काळा पैसा अशा मार्गाने ते चलनात आणण्याचा प्रयत्न करतात हे उघडच आहे. एरवी क्षणाचीही फुरसत नसलेले हे बडे संघमालक आपल्या संघाचा सामना असला, की पूर्ण वेळ स्टेडियममध्ये उपस्थित असताना दिसतात. त्यांना इतका वेळ कसा मिळतो? क्रिकेटच्या या धंद्यातून प्रचंड पैसा मिळत असल्यामुळेच आपली बाकी सगळी कामे सोडून ही बडी धेंडे क्रिकेटच्या मैदान
वर हजेरी लावत असतात. त्यांची उपस्थिती केवळ क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी असते असे समजण्याचे कारण नाही. त्यांच्यासाठी हे एकघोडामैदान असते आणि आपल्या घोड्यांवर लागलेले पैसे वसूल होतात, की नाही हे पाहण्यासाठी ते जातीने हजर असतात.

थोडक्यात सांगायचे, तर या बड्या धेंडांनी क्रिकेटच्या मैदानाला जुगाराचा अड्डा बनविले आहे. आपल्याकडील काळा पैसा अवैध मार्गाने चलनात आणणे हा खरे तर गुन्हा आहे, केवळ गुन्हाच नाही तर तो देशद्रोह आहे. क्रिकेट सध्या अशाच देशद्रोही लोकांच्या हातचे बाहुले बनले आहे. एकीकडे क्रिकेटचे इतके स्तोम माजलेले असताना इतर देशी खेळांकडे मात्र अतिशय सापत्न भावाने पाहिले जाते. हॉकीसारख्या राष्ट्रीय खेळाची अतिशय दैनावस्था झाली आहे. आज देशातील जवळपास प्रत्येक शहरात, अगदी खेड्यातसुद्धा क्रिकेटसाठी मैदाने उपलब्ध करून दिली जातात; परंतु इतर खेळांना साधी सुविधाही पुरविली जात नाही. हा देशबुडवा खेळ या देशातून हद्दपार करायचा असेल, तर आधी ही मैदाने इतर खेळांसाठी उपलब्ध करून द्यायला हवीत. मुंबईसारख्या शहरात क्रिकेटसाठी तीन-तीन स्टेडियम उभारण्यात आले आहेत. हॉकीसाठी किती मैदाने आहेत, याचा विचार कुणी करत नाही. नागपूरमध्ये एक स्टेडियम असताना आणि ते पुरेसे असताना दुसरे नवे आणि अत्याधुनिक स्टेडियम उभारण्यात आले. पुण्यातही आधीचे एक स्टेडियम असताना सुब्रतो रॉयने नवे आधुनिक स्टेडियम उभे केले. या सगळ्यांची खरेच गरज आहे का? या देशात एकच खेळ खेळला जातो का? किंवा एकच खेळ खेळला जावा अशी सरकारची इच्छा आहे का? संसदेत खासदारकी बहाल करायची असेल, तर सचिनच्याच नावाचा विचार का होतो? इतर कोणत्याही खेळातील मोठ्या खेळाडूचा विचार केला जात नाही. खरेतर राज्यसभेत एखाद्याला नामनियुक्त करायचे असेल, तर त्याचे काही निकष असतात. या निकषानुसार कोणत्याही खेळाडूला नामनियुक्त करता येत नाही. सचिनसाठी हे निकष डावलण्यात आले. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. विविध क्षेत्रांतील विचारवंत तिथे देशाची धोरणे ठरवित असतात. अशा सभागृहात रेखासारख्या नटव्या आणि सचिनसारख्या पैसे घेऊन क्रिकेट खेळणलार्‍य
ा तद्दन व्यापारीवृत्तीच्या लोकांचे काय काम आहे? त्यांची अशी कोणती वैचारिक योग्यता आहे?

खरेतर या खेळाने देशाचे जितके नुकसान केले आहे तितके इतर कोणत्याच गोष्टीमुळे झालेले नाही. हजारो लोक स्टेडियममध्ये आणि कोट्यवधी लोक टीव्हीसमोर तासनतास बसून हा जुगार पाहत असतात. कोट्यवधी तासांचे मनुष्यबळ त्यामुळे अक्षरश: वाया जाते. भारतासारख्या गरीब देशाला ही उधळपट्टी परवडणारी नाही. आयपीएलचे सगळे सामने विद्युत झोतात खेळविले जातात. देशात विजेची प्रचंड टंचाई आहे. आजही खेड्यापाड्यांत बारा ते अठरा तासांचे भारनियमन केले जाते. ग्रामीण भागातील लघु उद्योगांवर त्याचा अत्यंत विपरीत परिणाम झाला आहे. हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. वीज नसल्यामुळे शेतीला पाणी देता येत नाही, त्यातून शेतयार्‍यांची अवस्था बिकट झाली आहे आणि या पृष्ठभूमीवर रात्री कृत्रिम सूर्य निर्माण करून क्रिकेटच्या मैदानावर झगमगाट केला जात असेल, तर ही क्रिकेटच्या जुगांर्‍यांनी चालविलेली गरिबांची चेष्टाच म्हणावी लागेल.

शेतकर्‍यांना द्यायला वीज नसलेल्या सरकारकडे या तमाशासाठी शेकडो मेगावॉट वीज कुठून येते? क्रिकेटचे हे भूत लोकांच्या डोक्यावरून उतरवायचे असेल, तर एक चांगला उपाय आहे आणि तो म्हणजे क्रिकेटसाठी जी मैदाने उभी करण्यात आली आहेत ती सगळी मैदाने इतर खेळांसाठी सक्तीने उपलब्ध करून द्यावीत.

या मैदानांवर आधी इतर खेळांना प्राधान्य देण्यात यावे. ही मैदाने हॉकी, फुटबॉल, खो-खो, कबड्डीसारख्या खेळांना अग्रक्रमाने देण्यात यावी. या खेळांच्या वेळापत्रकातून वेळ मिळालाच, तर त्यावर क्रिकेटचे सामने घेण्याची परवानगी दिली जावी. इतर खेळांसाठी लागणार्‍या सगळ्या पायाभूत सुविधा या मैदानांवर उपलब्ध करून द्याव्यात. साधारण दोनशे वर्षांपूर्वी क्रिकेटच्या खेळाचा शोध लागला; परंतु या दोनशे वर्षांत वीस देशांपेक्षा अधिक देशांमध्ये त्याचा प्रसार होऊ शकला नाही. आजही कसोटी क्रिकेटचा दर्जा असलेल्या देशांची संख्या केवळ दहा आहे. इतर कोणत्याही प्रगत देशांमध्ये हा खेळ खेळला जात नाही. दिवसेंदिवस या खेळासाठी वेळ वाया घालविणे प्रगत देशांना परवडणारे नाही. ही चैन केवळ आपल्यासारखे कंगाल देशच करू शकतात.

या खेळातून देशाचा गौरव वाढण्याऐवजी केवळ नुकसानच होते, प्रचंड प्रमाणात मनुष्यबळ वाया जाते याची जाणीव इतर प्रगत देशांना आहे आणि म्हणूनच आज दोनशे वर्षे झाली, तरी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स आणि इतरही प्रगत देशांमध्ये हा खेळ रूजू शकला नाही. ही अक्कल आपल्याला केव्हा येईल? या देशबुडव्या खेळाचे स्तोम आपल्याकडेच इतके का माजले आहे? क्रिकेटच्या या भुताटकीतून देशाला बाहेर काढायचे असेल, तर आधी क्रिकेटसाठी राखून ठेवलेल्या मैदानांचा श्वास मोकळा करणे गरजेचे आहे. ही सगळी मैदाने इतर खेळांसाठी उपलब्ध करून दिली जावीत, त्यातून इतर खेळांचा प्रसार आणि प्रचार वेगाने तर होईलच शिवाय क्रिकेटचे स्तोमदेखील हळूहळू कमी होत जाईल. हा खेळ ज्या मायबाप इंग्रजांनी इथे आणला त्यांच्याच देशात क्रिकेटच्या तुलनेत फुटबॉलची लोकप्रियता खूप अधिक आहे. फुटबॉलचे सामने पाहण्यासाठी तिथली स्टेडियम खच्चून भरतात आणि क्रिकेटचा सामना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळला जातो. इंग्रजांचा खेळ गौरवाने मिरविणार्‍या भारतीयांनी इंग्रजांचे हे शहाणपण तरी स्वीकारायला हवे.

जुने प्रहार वाचण्याकरिता:फेसबुकवर प्रकाश पोहरे टाईप करा.

मोबाईल :- ९१-९८२२५९३९२१

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..