आज मोबाईल आणि प्रेम यापैकी एकालाच निवडण्याची वेळ आली तर आपण नक्कीच मोबाईलची निवड करण्याची शक्यता अधिक आहे नाही का ?
आज मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. तो सतत आपल्या सोबत असतो. काही क्षणासाठी जरी तो आपल्यापासून विभक्त झाला तर आपले मन बेचैन होते, आपल्याला काही सुचेनासे होते, आपल्या आयुष्यात आता काहीच सुरळीत चालू शकणार नाही असेही वाटून जाते. आता तर माणूस आणि मोबाईल यांच्यातील प्रेम लक्षात घेऊन त्याला जवळ – जवळ त्याला सर्वत्र माणसासोबतच वावरण्याची मान्यताच मिळालेली आहे.
पण आता काही लोकांना त्याच मोबाईलचा त्रासही होऊ लागला आहे हे सत्य ही नाकारता येणार नाही. आपल्या वरील कोणाचं प्रेम अती ओतू जायला लागलं तर आपल्याला त्याचाही त्रास होऊ लागतो. मोबाईल तर शेवटी एक यंत्रच आहे. तो आपल्या सर्वच गरजा जरी पुर्या करण्यास कारणीभूत ठरत असला तरी हे सतत त्याच्यावर अवलंबून राहणं आपल्याला कधी ना कधी त्रासदायक ठरणारच आहे.
पूर्वी मोठ्या आकारात असणारा मोबाईल कालांतराने लहान होत गेला आणि आता त्याचा आकार पुन्हा वाढत- वाढत जवळ मिनी लॅपटॉप इतका झाला आहे. पूर्वी फक्त संपर्काचं साधन असणारा मोबाईल आता कित्येकांसाठी त्यांचा पर्यायी मेंदू झालेला आहे. त्याचबरोबर कित्येकांसाठी तो एखाद्या ज्ञानाच्या भंडारापेक्षा कमी राहिलेला नाही.
एक दिवस मी माझा मोबाईल घरीच विसरलो. नेमका त्याच दिवशी मला एक मह्त्वाचा फोन येणार होता. मग काय मोबाईलसाठी मला पुन्हा अर्धा तास प्रवास करून माघारी घरी जावे लागले. तेंव्हा मला जाणवलं आपण मोबाईल नावाच्या यंत्राचे गुलाम झालेले आहोत. पुर्वी आपल्या तालावर नाचणारा मोबाईल आता आपल्यालाच त्याच्या तालावर नाचवू लागलेला आहे.
पूर्वी फक्त माझ्या घरातीलच नव्हे तर इतरांचे मिळून माझे जवळ पास पंचवीस- तीस नंबर तोंडपाठ होते पण आता घरातल्यांचे तर सोडाच माझा स्वतःचा नंबर ही मला कधी- कधी आठवावा लागतो. एकदा रात्री मला घरी यायला खूपच उशीर होणार होता मी विचार केला होता घराजवळ आल्यावर घरी फोन करून कोणाला तरी बोलावून घेऊ कारण मुंबईच्या रस्त्यावर अपरात्री हल्ली कुत्र्यांच साम्राज्य बरंच वाढलेलं आहे. पण तेंव्हा नेमकी माझ्या मोबाईलची बॅट्री संपली आणि मी माझ्या घरापर्यत जीव मुठीत घेऊन कसा पोहचलो ते माझं मलाच माहीत. तेंव्हापासून मोबाईलवर पूर्णपणे अवलंबून राहण्याचे मी सोडूनच दिले.
मोबाईलच्या बाबतीत मी एक नियम कटाक्षाने पाळ्तो तो म्ह्णजे मी मोबाईलचे हेडफोन कधीच वापरत नाही. कोणासोबतही मोबाईलवर मी शक्यतो पाच मिनिटापेक्षा अधिक बोलत नाही. बिलींगचा मोबाईल वापरत नाही, रोज फक्त दहा रूपयांचेच रिफील करतो कारण त्यामुळे आपल्या बिनकामाचे फोन करण्याचा मोह टाळ्ता येतो. मोबाईल वरून बिनकामाचे मेसेज करण्याच्या भानगडीत मी कधीच पडत नाही.
मोबाईलमुळे फक्त माणसेच जवळ आली पण त्यांची मने मात्र कायमची दूर गेली. पूर्वी प्रेम डोळ्यातून मेंदूपर्यत पोहचत असे पण हल्ली ते कानातून मेंदूपर्यत पोहचत असावं मोबाईलच्या माध्यमातून. सध्याच्या तरूण – तरूणी मोबाईलवर दिवस- रात्र काय बोलत असतात हाच सध्या एक संशोधनाचा विषय झालेला आहे. मोबाईल सतत स्वतः जवळच ठेवण्याची मी स्वतःला सवयच लावून घेतली नाही त्यामुळे माझा मोबाईल नेहमी मी जेथे असेन तेथे आजूबाजूलाच कोठे तरी पडलेला असतो. मी मोबाईलवर फेसबुक वगैरे साठी इंटरनेटचा वापर अपरिहार्य परिस्थितीतच करीत असतो. रात्री झोपताना मोबाईल उशीजवळ कधीच ठेवत नाही.
मी व्यक्तीशः मोबाईलचा उपयोग फोन घेणे आणि करणे या व्यतिरीक्त फक्त छायाचित्रे काढ्ण्यासाठी बर्याचदा करतो, पण तो ही माझ्या व्यवसायाचा आणि छंदाचा एक भाग आहे. कित्येकांना स्वतःला मोबाईलपासून दूर ठेव ही शिक्षा वाटत असते पण मला ती तशी वाटत नाही. सध्याच्या पिढीचे प्रेम मोबाईच्या माध्यमातून जलद सुरू होते, जलद बहरते आणि फुलतेही जलद. ते जितक्या जलद सुरू होते तितक्याच जलद कोमेजते, कुस्करते आणि नष्टही होते.
भविष्यात कामाच्या ठिकाणी मोबाईलच्या वापरावर पूर्णपणे बदी घातली जाण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. मोबाईलमुळे चांगल्या दिसणार्या आणि गोड आवाज असणार्या व्यक्तींना अचानक खूप महत्व प्राप्त झालेले आहे. मला व्यक्तीशः मोबाईलवर लोकांशी बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून बोलायला अधिक आवडते. पूर्वी मोबाईल हे माणसाच्या हातातील खेळणं होतं, पण आता माणूसच मोबाईल नावाच्या यंत्राच्या हातातील खेळणं झालेला आहे. मोबाईलमुळे माणूस परावलंबी, आळशी, चंगळवादी आणि काहिसा बेफिकीरही झालेला आहे. मनुष्यास मोबाईल वापराचा दुषपरिणाम म्ह्णून हल्ली काही आजारांचाही सामना करावा लागत असल्याच्या बातम्या येत असतात पण त्यात किती तथ्य आहे ते देवच जाणे !
आज प्रत्येकाने आपण मोबाईलच्या किती आहरी गेलेलो आहोत हे आता नव्याने तपासून पाहण्याची नितांत आवश्यकता आहे हे मात्र नक्की…
— निलेश बामणे
Khup Chan pan mala Kahi vishista mudyanvar pahije hota ha lekh. Jase, mobile ha mahatvacha shod, Mobile dware kharedi vikri, samparka madhyam, Mobile madhe camera, majakur photo etc chi devanghevan, mobile che tote talne aavashyak