नवीन लेखन...

मोबाईल

 

सध्याच्या विज्ञानयुगात जगाचं वर्णन ‘छोटंसं खेडेगाव‘ म्हणून केलं जातं. या लहानशा खेड्याला समर्थपणे कवेत घेणारं इंटरनेट, वाहतूक दळणवळणाची अत्याधुनिक साधनं आता सगळीकडे मुबलकपणे वापरली जातात. पटापट कामं करून देणार्‍या या यंत्रांना गमतीने ‘फट् साधनं‘ म्हणतात. मात्र या फटाकड्या साधनांच्या अतिवापरामुळे काय

होतं, हे दर्शविणारी एक छोटीशी बातमी मध्यंतरी वृत्तपत्रात वाचायला मिळाली. जगातील सर्वाधिक मोबाईल फोनधारक असलेल्या चीनमध्ये असंख्य तरुणांना मोबाईलवर अवलंबून राहाण्याचा नवा मानसिक विकार जडल्याचं या बातमीत नमूद केलं होतं! ही ‘विकृती‘ जडलेली माणसं थोडा वेळ जरी कुणाचा फोन आला नाही तरी लगेच अस्वस्थ होऊन आपला हँडसेट तपासू लागतात आणि त्याच्या संदेशवहनात काही बिघाड तर झालेला नाही ना, याची खातरजमा करीत राहतात. त्यामुळे अर्थातच सतत चित्त विचलित राहणं, एकाग्रतेने काम करता न येणं, स्मरणशक्तीचा वापर करण्याबाबत आळस आणि चटकन राग येणं ही या मानसिक आजाराची प्रमुख लक्षणं!

मोबाईलचा डिक्शनरींतील अर्थ ‘सहज हलणारा, अस्थिर, फिरता‘ असा आहे. ही अस्थिरता अनेक मोबाईलधारकांच्या व्यक्तिमत्त्वात उतरावी हे दुर्दैवच! ‘अति सर्वत्र वर्जयेत्‘ या उक्तीची आठवण करून देणारी वरील बातमी अनेक मुद्यांवर विचार करायला भाग पाडणारी आहे.

माणसाच्या गरजा अमर्याद असतात आणि प्राधान्यानुसार तो आपल्या गरजांचा क्रम लावून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, हा अर्थशास्त्राचा प्राथमिक सिद्धांत. त्यामुळे दृश्य वस्तूंच्या बाबतीत साहजिकच मूलभूत गरजेच्या वस्तू आणि चैनीच्या वस्तू अशी विभागणी होते. भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये विशिष्ट वर्गांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावताच पूर्वी चैनीच्या समजल्या जाणार्‍या अनेक वस्तू आणि उत्पादने अलगदपणे गरजेच्या यादीत जाऊन बसली! फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन याबरोबरच ‘मोबाईल फोन‘ ही आता अनेकांची चक्क गरज बनली आहे! रस्ता, दुकान, प्लॅटफॉर्म यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी मोबाईल हातात धरून बोलणार्‍या व्यक्तींकडे कुतूहलाने वळून वळून पाहण्याचे दिवस केव्हाच मागे पडले! आता पोरापासून थोरापर्यंत अनेकांच्या हातात मोबाईल असतो.

ट्रॅफिक जॅम, मुसळधार पाऊस यांसारख्या कारणांनी झालेला खोळंबा, नियोजित ठिकाणी पोचण्यास अचानक उद्भवणार्‍या एखाद्या अडचणीमुळे होणारा उशीर याबाबत संबंधितांना तत्परतेने कळविण्यास मोबाईलचा छान उपयोग होतो, हे निर्विवाद. डॉक्टर्स, बिझनेसमेन, कामानिमित्त अनेक तास घराबाहेर राहणार्‍या आणि लहान मुलं असलेल्या स्त्रिया, अत्यंत धावपळीचं आयुष्य जगणारे, घड्याळाच्या काट्याबरहुकूम नाचणारे विविध क्षेत्रांतील लोक मोबाईलमुळे होणार्‍या मोठ्ठ्या सोयीला चक्क दुवा देत असतात! अमेरिकेत ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर‘वर झालेल्या हल्ल्यात बळी पडलेल्या अनेकांनी मृत्यूच्या जबड्यात शिरताना आपापल्या प्रिय व्यक्तीशी मोबाईलवरून संपर्क साधून ‘अलविदा‘ केलं होतं. मात्र हे सगळं खरं असलं तरी मोबाईल वापरणारे सगळेच तो गरज म्हणून वापरतात का? काहीजणांना मोबाईल वापरणं हे प्रतिष्ठेचं लक्षण वाटतं. तर कॉलेजची मुलं तासन्तास त्याच्याशी चक्क खेळत बसलेली दिसतात. मुंबईतील एका नामांकित कॉलेजमध्ये वर्ग चालू असताना विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास बंदी करण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला, तेव्हा त्याविरुद्ध विद्यार्थ्यांवर जणू आकाश कोसळलंय, अशा आविर्भावात ओरड करण्यात आली होती. नाट्य आणि चित्रपटगृहांमध्येसुद्धा आजूबाजूच्या महाभागांच्या मोबाईलमुळे रंगाचा बेरंग होतो. अनेक व्यावसायिक नाटकांचे प्रयोग चालू होण्यापूर्वी मोबाईल बंद ठेवण्याची विनंती प्रेक्षकांना केली जाते. मात्र बरेच प्रेक्षक या विनवणीला अजिबात धूप घालत नाहीत.सर्वच क्षेत्रांतील यांत्रिकीकरणाच्या रेट्यामुळे माणसातले उरलेसुरले ‘माणूस‘पणसुद्धा हरवून जाईल, अशी सार्थ भीती विविध क्षेत्रांतील विचारवंत व्यक्त करीत आहेत. यांत्रिकीकरणाच्या अतिरेकातून उद्भवणार्‍या विविध ‘मनोकायिक‘ आजारांचा सं स
्ग ‘छोट्याशा खेड्यात‘ राहणार्‍या आपल्याला सर्वांनाच होणार! मोबाईलमुळे उद्भवणार्‍या मनोविकारांपासून मुक्त होण्यासाठी, शहरी धकाधकीपासून अधूनमधून निदान काही काळ तरी लांब जाणं, गिर्यारोहण, निसर्गात मनसोक्त भटकंती, आवडत्या छंदात मन गुंतवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईलला आयुष्याचा अविभाज्य हिस्सा बनू न देणं हा उपाय असल्याचं मनोविकार तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मुळात माणूस हेसुद्धा निसर्गाचंच लेकरू. हे हरवलेलं लेकरू पुन्हा निसर्गाकडे परतणार की निसर्गापासून अधिकाधिक दूर जाऊन अखेर सर्वनाश ओढवून घेणार, हे येणारा काळच ठरवील.

— भालचंद हादगे उर्फ भाली

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..