नवीन लेखन...

म्हैस – पुलंची नि मोहनकाकांची



इ. स. २००९ साली निवडणुकांचे निकाल लागले नि मोहनकाकांची बस विकासाच्या वाटेवर टायमात सुटली. म्हणजे मंत्र्यांचा शपथविधी वेळेवर झाला. बसमध्ये केरळचा शशी मलुष्टे, लखनऊचा मुलायमशेठ, मायाताई, संगामामा, दिग्विनाना, एक साह्येब, (होम्योपथीचे नाही – पण अर्थशास्त्राचे) दोन डॉक्टर, दिल्लीचा युवराज, अशी तालेवार मंडळी होती. बस सुरु झाली तेव्हा सरकारच्या वतीनं कोण जागं होतं, कळायला मार्ग नाही, बस जशी काही आपोआपच चालली होती. बसमधले काही प्रवासी तिहारच्या फाट्यावर जबरदस्तीने उतरवले गेले. त्यातल्या एका दोघांनी पुन्हा धावत येऊन बस पकडायची कोशिश केली, पण लोकांनी त्यांना वर चढू दिलं नाही. पुलंच्या बशीनं हातखंब्याचा फाटा ओलांडला त्याच सुमारास मोहनकाकांच्या बशीनं वेगळा टप्पा गाठला. ताई उतरल्यावर त्यांच्या सीटवर कुणाला बसवायचं याचा खल चालू असतानाच अचानक समोरच्या बाजूने “म – म – म – म – म्हैस…” असा गलका ऐकू आला नि अ ते ज्ञपैकी कोणत्याही अक्षराने लिहून दाखवता येणार नाही असा इंजिनचा फायरिंगचा आवाज चालू ठेवीत करीत बस (डेपोत जशी थांबलेली असते तशी) थांबली.
म – म… ताई गाडीला आडवी आली होती. तिला बराच राग आलेला दिसत होता. कारण ती बोलत नव्हती. ताईंच्या सीटवर मोहनकाका, सोमनाथकाका, कलामकाका किंवा संगामामाला न बसवता भलत्याच व्यक्तीला बसवल्याचा राग तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. म –म – ता… गाडीसमोर आडवी येऊन वाट अडवून थांबली. बस पुढं जात नाही म्हटल्यावर प्रवासी देखील उतरले नि आपसात गप्पा मारू लागले.
“ही म – म – ताई अशीच आडवी येत राहिली ना तर तिचं सरकार काही टिकणार नाही,” पत्रकार म्हणाले.
“सरकार पडलं तर पर्वा नाय हो, पण या मोहनरावाला धडा शिकवला नाही तर नावाचा संगामामा नाही.” संगामामा.
तिकडं मॉन्टूकाकांनी बसच्या टपावरून आपला चांदीचा कमोड उतरवला होता नि राजानं सिंहासनावर बसावं, तशा रुबाबात ते त्यावर बसून अर्थशास्त्राचं पुस्तक वाचू लागले होते. हा कमोड पस्तीस लाख रुपये किमतीचा आहे हे त्यांनी बसमध्ये बसल्यापासून प्रत्येकाला सांगितलं होतं.
“म – म – ताईला चालतं का हो तुमचं अर्थशास्त्र?”
“न चालायला काय होतंय? सिंगूरचं पथ्य पाळलं म्हणजे झालं, काय हो डॉक्टर?”
उत्तरादाखल डॉक्टरांनी टॉयलेट पेपरला नाक पुसून तो (म्हणजे पेपर) बाजूला फेकला.
पुलंची म्हैस ऊठून पळून गेली आणि बस सुटली. मोहनकाकांच्या बसचं काय होईल हे सांगणं मात्र कठीण आहे.
*
© विजय तरवडे

— विजय तरवडे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..