योगासनांची विविध अंगं आणि प्रकार आहेत. योगाचे अंग आणि प्रकार यामध्ये फरक आहे. प्राचीन ग्रंथामध्ये योगाचे विविध प्रकार सांगितले आहेत. ज्ञानयोग, हठयोग, कर्मयोग, भक्तियोग, राजयोग हे काही योगाचे प्रकार आहेत. तसंच यम, नियम, योगासन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ही योगाची अंगं आहेत.
आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या योगासनाची सखोल माहिती
योगासनामुळे शरीर लवचिक राहतं तसंच शरीर निरोगी राखण्यासाठी, शरीराचा आकार बांधेसूद राखण्यासाठी, एकाग्रता वाढवण्यासाठी योगासनं उपयुक्त ठरतात. या योगासनाचे काही प्रमुख प्रकार आहेत. सूर्यनमस्कार, पद्मासन, अर्धपद्मासन, वज्रासन, सिद्धासन, पवन मुक्तासन, सर्वागासन, पश्चिमोतानासन, शीर्षासन, श्वसन, सुखासन हे काही प्रमुख प्रकार असून त्यातला पहिला प्रकार कसा करायचा आणि त्याचे फायदे काय आहेत
सूर्यनमस्कार हा भारतीय परंपरेतील प्राचीन व्यायाम आहे. सूर्यनमस्काराला सवरेश्रेष्ठ आसन मानलं जातं आणि त्याचे अनेक फायदे आहेत. कोवळ्या किरणात पूर्वेला नमस्कार करून सूर्यनमस्कार घालावेत. तसंच ते शांत आणि स्वच्छ जागेत करावेत. सूर्यनमस्कार बाराही महिने करू शकता. सूर्यनमस्काराला सुरुवात करताना सुरुवातीला जमतील तेवढेच सूर्यनमस्कार घालावेत. तसेच ते अनशापोटी केलेले उत्तम. वेळेअभावी ते संध्याकाळी करायचे असतील तर त्यापूर्वी कमीत कमी दोन तास तरी खाऊ नये. सूर्यनमस्कारात बारा क्रिया असतात. त्यातील पहिली क्रिया म्हणजे प्रणामासन.
प्रणामासन प्रणामासन ही सूर्यनमस्कारातली पहिली पायरी आहे.
सरळ उभं राहावं आणि दोन्ही पाय जवळ ठेवावेत. दोन्ही हात छातीच्या मध्यभागी नमस्काराच्या स्थितीत जोडलेले असावेत. मान ताठ आणि नजर समोर असावी. पाठीचा कणा ताठ असावा. शरीर शांत ठेवून आरामशीर श्वास घ्यावा.
फायदा: मन स्थिर होण्यास मदत मिळते. शरीराचा तोल साधला जातो.
हस्तउत्तासन किंवा उध्र्वनमस्कार यात पहिल्या अवस्थेत उभं राहून मान वर करावी. पाठीचा कणा मागच्या बाजूला वाकवावा. आणि हात वर करावेत. या स्थितीत असताना श्वास आत घेतला जातो. तसंच या स्थितीतून पूर्वावस्थेत येताना पाठीच्या कणावर ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.
फायदा : या अवस्थेत असताना पोटावरची चरबी खेचली जाते. यामुळे तिथली चरबी कमी होण्यास मदत होते.
पादहस्तासन हस्तउत्तसानाच्या स्थितीत असताना जेव्हा श्वास आत घेतला जातो तो श्वास हळुवारपणे सोडत दोन्ही हाताचे पंजे जमिनीला पूर्णपणे टेकवावेत. यात डोकं गुडघ्याला लावावं. ज्याप्रकारे ओणवं उभं राहतो तसंच राहावं पण या स्थितीत हाताचा पंजा जमिनीला टेकलेला असतो.
फायदा : या स्थितीमुळे मेंदूपर्यंत रक्ताभिसरण होऊन स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. तसंच हृदय आणि फुप्फुसांची क्षमता वाढतेच पण पायांचीही ताकद वाढते. या स्थितीमुळे पोटावर आणि ओटीपोटावर दाब आल्याने स्त्रियांची मासिक पाळीसुद्धा नियमित होते. तसंच पोटावरची आणि कमरेवरची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते.
अश्यसंचलनासन तिसरी क्रिया केल्यानंतर आता हात जमिनीला टेकवून एक पाय मागे ताणायचा तर दुसरा पाय गुडघ्यातून वाकवायचा या अवस्थेत असताना मान किंचीत उंचवावी. पुढे ठेवलेला पाय आणि हात समांतर रेषेत नसले तरी चालतील पण पायाचा अंगठा आणि हाताचा पंजा समान रेषेत असावा.
फायदा : मूत्रसंस्था आणि प्रजननसंस्थेच्या आरोग्यासाठी ही स्थिती उपयुक्त ठरते.
अधोमुखश्वसनासन पूर्वावस्थेतून बाहेर येण्यासाठी आपले दोन्ही पाय समान रेषेत आणावे आणि हात तसेच ठेवावेत. अधोमुखश्वसनासन करताना श्वास बाहेर सोडायचा असतो. यात कमरेखालचा भाग उंचवायचा म्हणजेच इंग्रजी अक्षराच्या उलटय़ा व्ही सारखी स्थिती असते. या अवस्थेत डोकं खालच्या दिशेला असेल.
फायदा : या अवस्थेमुळे पायांचे स्नायू ताणले गेल्यामुळे स्नायू लवचिक होतात. तसंच खांदे मजबूत होतात. पायामध्ये आणि पोट-यांमध्ये गोळे येणं कमी होतं.
अष्टांग नमस्कार : मागील स्थितीतून पुढे जाण्यासाठी हातांवर योग्य प्रमाणात जोर देऊन शरीर जमिनीला टेकवावे. पाय सरळ रेषेतच ठेवून हनुवटीही जमिनीला टेकवावी.
फायदा : हात आणि खांद्याचे स्नायू मजबूत होतात आणि ताकद वाढते.
भुजंगासन यात दोन्ही हात सरळ रेषेत ठेवून जमिनीला टेकवावे व संपूर्ण शरीराचे वजन हात व पायांच्या चौडय़ांवर तोललं जाईल अशा अवस्थेत राहावं. या आसनामध्ये श्वास आत घेतला जाईल आणि मान जमेल तितकी मागे घेण्याचा प्रयत्न करावा.
फायदा : हे आसन करण्याचा फायदा म्हणजे गॅस आणि पोटाचे विकार दूर होण्यास मदत होते. तसंच फुप्फुसांची क्षमता वाढते. पाठीच्या कण्यासाठी खूप लाभदायक ठरतं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply