श्रीरामप्रभूच्या रघुवंशाची ही कथा प्रसिद्ध आहे. रघुवंशातील थोर राजा दिलीप व त्याची पत्नी सुदक्षिणा यांना धन, धान्य, समृद्धी सर्वकाही परमेश्वराने ओतप्रोत दिले होते. परंतु निपुत्रिक असल्याने त्यांच्या आयुष्यात एक मोठे दुःख असते. पुत्रप्राप्तीसाठी वसिष्ठ ऋषि त्या दाम्पत्याला नंदिनी गाईची सेवा करण्यास सांगतात. ह्या सेवाव्रतामध्ये नंदिनी गाय ज्या ठिकाणी जाईल त्याठिकाणी तिच्याबरोबर दोघांनी जावे, ती बसेल तेव्हांच बसावे, तिचे दूध प्यावे, ती खाईल तेच खावे आणि तिचे सर्वतोपरी रक्षण करावे असा सल्ला देतात. मुनींनी सांगितल्याप्रमाणे राजा दिलीप व सुदक्षिणा त्यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करतात. रानात चरत असतांना तिच्यावर सिंह आक्रमण करतो आणि राजा त्या सिंहाशी द्वंद्व करून त्याला पराभूत करतो अशा प्रकारचा गोष्टीचा शेवट आहे. त्यानंतर त्यांना पुत्रप्राप्ती होते.
ह्या गोष्टीतील वासिष्ठ ऋषी हे एक एन्डोक्रायनोलॉजी आणि वंध्यत्व विषयातील महान तज्ञ होते. त्यांनी राजाच्या दैनंदिन कार्याची पाहणी केली व त्यातून त्यांच्या लक्षात आले की राजा दिलीप व त्याची पत्नी सुदक्षिणा हे दोघेही आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहेत, त्यांचा आहार अतिशय पौष्टिक आणि मेद वाढविणारा आहे, त्यांच्या दिनक्रमात व्यायामाचा अभाव आहे आणि त्यामुळे त्यांना मेदवृद्धी झाली आहे. मेदवृद्धीमुळे होर्मोन्स्चे संतुलन बिघडले, बीजप्रवर्तन बरोबर होत नाही आणि पॉलिसिस्टिक ओव्हेरियन विकार सुदक्षिणेला झाला आहे. राजाच्या शरीरामध्ये मेद वाढल्यामुळे शुक्राणूंची निर्मिती आणि कामेच्छा होत नाही असे निदान मुनींनी केले. त्यानुसार त्यांना नंदिनी गाईचे व्रत करण्यास सुचविले.
ऐश्वर्य असल्यामुळे त्यांच्या आहारात भरपूर प्रमाणात मिष्टान्न असणे स्वाभाविक होते. त्यांना गाईचे दूध पिण्यास सांगितले म्हणजेच कमी कॅलरीज असलेला आहार घेण्यास सांगितले. गाईबरोबर रानावनात जाण्याची सूचना दिली म्हणजेच चालण्याचा व्यायाम सुचविला, गाय खाईल तेच खावे ह्याचा अर्थ ‘गवत’ खावे असा नसून हाय फायबर डायेट घ्यावे असा अभिप्रेत आहे, जेणेकरून त्यांचा कोठा साफ राहून पचन सुधारेल, शरीरातील मेद कमी होईल. गोष्टीच्या शेवटी सिंहाशी द्वंद्व ह्याचा अर्थ “दिलीप राजाने व पत्नीने व्यायाम, आहार, दैनंदिन आचरण ह्यातून स्वतःची शरीरयष्टी उत्तम केली, त्यांची रोगप्रतिकार क्षमता उंचावली आणि महान शक्तिशाली जंतुसंसर्गाला सामोरे जाऊन त्यालाही पराभूत करण्याची क्षमता दोघांनी मिळविली”. ह्या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या होर्मोन्स्चे संतुलन योग्य झाले, चरबी कमी झाली, कामेच्छा वाढली, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन विकार नियंत्रणात आला, एन्डोमेट्रिऑसिस रोगाचे निवारण झाले आणि अशाप्रकारे त्यांना संततीप्राप्ती झाली.
पुराणातील गोष्टी अत्यंत शास्त्रीय आहेत, त्यांच्याकडे पाहण्याचा आणि समजून घेण्याचा दृष्टीकोन जागृत करणे आवश्यक आहे.
वैद्य संतोष जळूकर
संचालक,
अक्षय फार्मा रेमेडीज, मुंबई
संपर्क – drjalukar@akshaypharma.com
+917208777773
खूप सुंदर कथा आहे सर. तुम्ही प्रकटीकरण केल्यामुळे तुम्हाला शतकोटी दंडवत प्रणाम????????