१० सप्टेंबर १८७२ रोजी भारतातील काठियावाड संस्थानात कुमार श्री रणजितसिंहजींचा जन्म झाला. रणजी ह्या नावाने ते विख्यात आहेत. राजेशाही थाटाची, पौर्वात्य किमयेची आणि उच्छृंखल अशी फलंदाजी रणजी करीत. लवचिक मनगट अनेकांजवळ असते, वेळही बरेच जण अचूक साधतात पण या दोन्ही गोष्टींसोबत उपजत नजाकत ज्या फार विरळा किमयागारांजवळ असते त्यात रणजींचा समावेश होतो. मधल्या यष्टीच्या रोखाने आलेले चेंडूही ते नजाकतीने फ्लिक करीत अशी वर्णने आढळतात. आपले सर्व कसोटी सामने रणजी इंग्लंडकडून खेळले. पदार्पणात ओल्ड ट्रॅफर्डवर त्यांनी ६२ आणि नाबाद १५४ धावा काढल्या. १८९६ च्या हंगामात त्यांनी एकूण १० प्रथमश्रेणी शतके काढली. कांगारुंच्या भूमीवरील पहिल्या कसोटी डावातही त्यांनी शतक काढले.
चार्ल्स फ्राय आणि रणजी ह्या ससेक्सच्या सलामीच्या जोडीने एक काळ इतका गाजविला होता की इंग्लिश क्रिकेट इतिहासात हा काळ ‘फलंदाजीचे सुवर्णयुग’ म्हणून ओळखला जातो.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील पहिले द्विशतक सचिन तेंडुलकरने काढले हा भ्रम किंवा अर्धसत्य आहे…
१० सप्टेंबर १९७० रोजी ऑस्ट्रेलियातील न्यूकॅसलमध्ये जन्माला आलेली एक बालिका पुढे ऑस्ट्रेलियाची कर्णधार बनली. बेलिंडा जेन क्लार्क हे तिचे नाव. १९९७ च्या विश्वचषकात आणि २००५ च्या विश्वचषकात तिच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने विजेतेपद मिळविले. १९९७ च्या विश्वचषकातील एका सामन्यात बांद्र्याच्या मिडल इन्कम ग्रुप ग्राऊंडवर बेलिंडाने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधील पहिले द्विशतक झळकावले. तोपर्यंतच काय, त्याच्यानंतरही सुमारे १३ वर्षे ही कामगिरी कुणाही पुरुषाला जमली नाही.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply