अहाहऽआ काय सुंदर उद्यान ! उंच उडणारी कारंजी, पुष्कराणी, तर्हतर्हेची फुलझाडे – फळझाडे, थंडगार हवा दाट झाडांची सावली, पक्ष्यांचे मंजुळ कुंजन… मन उल्हसीत करणारा सगळा देखावा. जणू स्वर्गातलेच उद्यान असावे असा भास व्हावा.
अशा उद्यानात तर्हतर्हेची फुलझाडे होती. त्या झाडांतील एका झाडाला मुळी फुलेच येत नव्हती. त्यामुळे ते दु:खी होते. त्याला सगळे “वेडं झाड” म्हणून हिणवत असत. बिच्चारे एकाकी पडले होते. कोणीसुद्धा त्याला गप्पा गोष्टींत सामील करुन घेत नसत. त्याच्याशी सगळ्यांनी अबोला धरला होता. सगळे झाड म्हणत वेड्या झाडामुळे सुंदर उद्यानाची शोभा नष्ट झाली आहे.
एकदा त्या बागेत एक सुंदर पक्षी रात्री विहार करण्यास आला, त्या सुंदर, स्वच्छंदी पक्षाचे लक्ष वेड्या झाडाकडे गेले पक्षी म्हणाला तू असा हिरमुसला का ? झाडाने काहीच उत्तर दिले नाही. त्याने इतर झाडांना त्याबद्दल विचारले झाडे म्हणाली “ते वेडं झाड वांझोटे आहे. त्याला फुले येत नाहीत की फळे येत नाहीत त्याच्याशी आम्ही काय गप्पा मारणार ? शिवाय ते उगवलय कोपर्यात त्याला आमच्यात एकीने रहायचं नाही. पक्षी म्हणाला तुम्ही त्या झाडाला एकटं पाडून दु:ख देत आहात. सम विचार, सम गुण असलेले एकत्र येऊ शकतात. त्या झाडात कमीपणा आहे तो नाहीसा झाला की तुम्ही त्याच्याशी आपणहून बोलायला जाल. त्यालाही फुले येतील किंबहुना तुमच्यापेक्षा वेगळी, उद्यानची शोभ वाढवणारी.
हा स्वच्छंदी पक्षी होता खुद्द सृष्टीकर्त्याच्या उद्यानातील. हा पक्षी थेट गेला सृष्टीकर्त्याकडे त्याने दूरुन वेडं झाड सृष्टीकर्त्यास दाखविले. सृष्टीकर्त्याने त्याच्यावर वरदहस्त ठेवला, आणि काय आश्चर्य ! रात्री झाड शुभ्र फुलांनी
बहरुन गेले. त्याचा मादक, मोहक सुवास वाढत जाणार्या रात्रीबरोबर उद्यानात दरवळत होता. पहाट झाली फुलांचा सुवास कमी झाला. रात्री सुवास वाढत वाढत पहाटे कमी होत जात असे इतर झाडांना वेड्या झाडाचा हेवा वाटला पण त्याच्यात आता काही उणीव नव्हती. सगळी झाडे वेड्या झाडाला म्हणाली झालं गेलं विसरुन जा आपण आता गुण्या गोविंदाने राहू. तू आमच्यातलाच एक आहेस उद्यानाची शोभा रात्रि वाढवणारा. म्हणून आम्ही तुला रात्रराणी म्हणत जाऊ. वेडं झाड हसले व मनात म्हणाले सुखाचे सगळे भागीदार असतात अडी अडचणीत हीन-दीन वृत्ती कळते आणि खर्या मैत्रीची आणि निर्व्याज प्रेमाची प्रचिती येते. हे स्वच्छंदी पक्षा, तुझे बोल खरे ठरले. मी तुला सुवासा शिवाय काहीच देऊ शकत नाही. माझ्या फुलांचा सुगंध तुला धुंडाळत येईल परत एकदा भेटण्यासाठी.
त्या रात्री आलेल्या स्वच्छंदी पक्ष्यास रात्रराणीचा सुवास धुंडाळत मैलन् मैल जात असतो. पहाटे रात्रराणी! थकून जाते, फुले सुकून जातात. रात्रराणी पहाटे विचार करीत असते, रात्री पडलेलं ते एक स्वप्न तर नव्हते ना ? हा विचार करता करता रात्र होते व पुन्हा विचार येतो छे ते स्वप्न नव्हते सत्य होते. उपकार करणारे स्तुती सुमनांचा वर्षाव टाळतात. मलाच त्याला धुंडाळले पाहिजे हे स्वच्छंदी पक्ष्या माझे तुला कोटी प्रणाम !
Leave a Reply