नवीन लेखन...

रामजन्मभूमी मुक्ती : एक अभूतपूर्व आंदोलन

भारतीय जनमानसाचे आराध्य असणाऱ्या प्रभु श्री रामचंद्राच्या रामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन भारतीय स्वातंत्र्योत्तर काळातील एक अभूतपूर्व आंदोलन आहे. स्वातंत्र्य आंदोलनापेक्षा अधिक व्यापक तीव्र असे हे आंदोलन या जन चळवळीचा साक्षेपी सखोल व साधारण मागोवा घेतला आहे प्रसिद्ध पत्रकार विचारवंत दै.त.भारतचे माजी संपादक श्री. दि.भा.उर्फ मामासाहेब घुमरे यांनी. पृ. 160 किं. 150 रू. ISBN : 978-93-80232-24-9

इतिहासाचा विश्र्वसनीय दस्तावेज सादर करून सडेतोड उत्तर देणारे रामजन्मभूमी मुक्तीचे अभूतपूर्व आंदोलन भारत देशाच्या उद्धारासाठी, त्याला स्वावलंबनाच्या, समृद्धीच्या पायावर उभे करण्यासाठी सुरू झालेले, परंतु सर्वाधिक बदनाम करण्यात आलेले आंदोलन म्हणजे रामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन. या आंदोलनाचे नाव देखील उच्चारले तरी तुम्ही या, रामाच्याच देशात वाळीत टाकले जाता. परंतु, एखाद्याला पूर्वग्रह बाजूला ठेवून या आंदोलनाची इत्यंभूत माहिती करून घ्यायची असेल तर, ज्येष्ठ पत्रकार श्री. दि.भा.घुमरे यांनी लिहिलेले “रामजन्मभूमी मुक्तीचे अभूतपूर्व आंदोलन” हे पुुस्तक वाचलेच पाहिजे.

अत्यंत सन्माननीय पत्रकार म्हणून ज्यांना मान्यता आहे, अशा श्री. दि.भा.उर्फ मामासाहेब घुमरे यांच्यासारख्या अभ्यासू पत्रकाराने हे जे पुस्तक लिहिले आहे, ते निव्वळ संशोधनावर व पुराव्यांवर आधारित नाही तर, वाचनीयही झाले आहे. सहसा हे तीन गुण एकाच पुस्तकात आढळत नाहीत. नचिकेत प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित करून मराठी वाचकांच्या हाती एक विश्वसनीय दस्तावेजच सोपविला आहे. या आंदोलनातील विविध टप्प्यांवरील कार्याची माहिती देणार्‍या पुस्तिका यांच्या आधारे तसेच एक कार्यकर्ता या नात्याने जे पाहिले, ऐकले, अनुभवले त्या आधारानेही हे पुस्तक सिद्ध केल्याचे स्वत: लेखकाने म्हटले आहे.

अयोध्या रामजन्मभूमीसाठी 1984 ते 1992 या आठ वर्षांच्या कालखंडात झालेले राष्ट्रव्यापी आंदोलन हे एक अभूतपूर्व आणि अद्वितीय आंदोलन ठरले आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी 1857 चे पहिले स्वातंत्र्यसमर आणि त्यानंतर 1920 ते 1942 या काळात झालेल्या स्वातंत्र्य आंदोलनानंतर, संपूर्ण देश ढवळून काढणारे जर कोणते एक व्यापक आंदोलन झाले असेल तर ते रामजन्मभूमी आंदोलन होय. हे आंदोलन मुख्यत: हिंदूंनी केलेले आंदोलन होते, तेही एका मंदिरासाठी केलेले आंदोलन होते, त्यामुळे त्याला राष्ट्रीय आंदोलनाची सर येऊ शकत नाही, असे त्याबाबत म्हटले गेले आहे आणि पुढेही म्हटले जाईल. परंतु असे म्हणणारे या आंदोलनाचा प्रारंभ कसा आणि कशामुळे झाला, याचा जर शोध घेतील तर त्यांना सोमनाथच्या जीर्णोद्धारात या आंदोलनाची बिजे दडलेली होती, हे उमगून येईल. सोमनाथच्या जीर्णोद्धारातून ही जी प्रेरणा मिळाली, ती प्रथम रामजन्मभूमी मुक्तीसाठी अयोध्येत अनेक वर्षांपासून सतत धडपडणार्‍या संत-महंतांना आशेचा केवळ किरणच नव्हे तर प्रकाश ठरली.

विश्व हिंदू परिषदेच्या हाती हा विषय येताच विहिंपने विविध कार्यक्रमांद्वारे सार्‍या देशात जनजागृती सुरू केली. तीन धर्मस्थानांची मुक्ती, या विषयाला राष्ट्रीय विषयांच्या कोटीत नेऊन बसविले. विहिंपने हिंदूंना चिथवले आणि त्या चिथावणीने हिंदूंनी अयोध्येत धडक मारून बाबरी मशीद पाडली, असा जो सरळसोट आरोप आजही केला जातो. तो बव्हंशी हिंदुद्वेष्ट्या, हिंदुत्वविरोधी आणि भाजपाविराधी क्षेत्रातून, त्यांच्या त्यांच्या राजकारणाच्या सोयीसाठी केला जातो आणि काही अंशी तो अज्ञानापोटी केला जातो. या सर्व आरोपांची उत्तरे विहिंपने 1994 ते 1992 या आठ वर्षात धार्मिक, ऐतिहासिक, राष्ट्रीय या अंगांनी जे विविध कार्य केले त्यातून मिळतात. ती सर्व माहिती प्रस्तुत पुस्तकात विस्ताराने देण्यात आली आहे.

रामजन्मभूमी आंदोलन हे चुन्याविटांनी बांधावयाच्या एका मंदिराचे आंदोलन नसून, शेकडो वर्षांनंतर घडून आलेल्या ऐतिहासिक बोधाची हिंदूंमध्ये झालेली ती विराट जागृती आहे, असे मत नोबेल पारितोषिक विजेते विद्याधर नायपॉल यांनी म्हटले आहे. रामजन्मभूमी आंदोलनाचे मूल्यमापन करणार्‍यांनी या दृष्टीने विचार करून पाहावा. हिंदूंना चिथावल्यामुळे ते उत्तेजित झाले आणि थेट अयोध्येत घुसून त्यांनी गुंडागर्दी करून मशीद पाडली, असे ते आंदोलन नव्हते तर, पूर्ण अभ्यास करून, क्रमाक्रमाने, सनदशीर मार्गांनी, धार्मिक तथा राष्ट्रीय भावनांना साद घालून, अभ्यासपूर्ण रीतीने आपली बाजू मांडून, न्यायप्रक्रियेत आवश्यक असलेले पुरावे सादर करून हे आंदोलन करण्यात आले. तो सारा तपशील या पुस्तकात विस्ताराने मांडला आहे.

या पुस्तकातील प्रकरणे बघितली तर, लेखकाने किती बारकाईने आणि तक्रारीला कुठूलाही वाव राहू नये, या दक्षतेने या पुस्तकात सर्व माहिती देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे, ते लक्षात येईल. जन्मभूमीचा पूर्वेतिहास, सोमनाथ जीर्णोद्धारानंतर…., अभूतपूर्व आंदोलन, उत्तरप्रदेशातील दहशत पर्व, कारसेवा संग्राम, उभयपक्षी पुरावा, बाबरीखालून मंदिराचे अवशेष, जय श्रीराम हो गया काम, रामजन्मभूमीचा निर्णायक पुरावा, प्रतिक्रिया, न्यायालयातील खटले, बाबरीखाली 10 व्या शतकातील मंदिर, काशी विश्वनाथ व श्रीकृष्ण जन्मभूमी ही या पुस्तकातील प्रकरणांची नावे आहेत. ती पाहिली की, या पुस्तकाची सर्वव्यापकता लक्षात येईल. एवढ्यावरच लेखक थांबले नाहीत. त्यांनी सात परिशिष्टांच्या माध्यमातून अधिकची विश्वसनीय माहिती देखील देण्याचा प्रयत्न केला आहे. रामजन्मभूमीसाठी झालेले संघर्ष, अयोध्येचा विष्णुहरि मंदिर शिलालेख, शिलालेखाचा अर्थ, सहभागी कारसेवक, सर्व आवाहने व्यर्थ इत्यादी परिशिष्टांमुळे वाचकांच्या ज्ञानात अधिकची मूल्यवान माहितीचीच भर पडते.

विशेष म्हणजे उभयपक्षी पुरावा हे प्रकरण तर प्रत्येकाने वाचावेच असे आहे. त्यातून या आंदोलनाबाबत मनातील सर्व गैरसमज दूर झालेच म्हणून समजा. मंदिराच्या बाजूचे प्राचीन, मुस्लिम तसेच युरोपियनांचे पुरावे, राजस्व नोंदी, पुरातत्त्वीय पुरावे इत्यादी वाचनीय आणि नवनवीन माहिती देणारे आहेत. जन्मस्थानासंबंधी बुद्धिभेद, हिंदूंचा सातत्यपूर्ण दावा, मुस्लिम लेखकाची कोलांटउडी, बाबरी कमेटीने दिलेला पुरावा हे जर वाचले तर, या आंदोलनाला एका विशिष्ट उद्देशाने कसे बदनाम करण्यात आले, हे लक्षात येते.

बाबरी खाली झालेल्या उत्खननातून जे मंदिराचे अवशेष मिळाले, त्यांची छायाचित्रे या पुस्तकात दिली आहेत. ती छायाचित्रे या आंदोलनाला बदनाम करणार्‍यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहेत. उत्तम समर्पक मुखपृष्ठ, भरपूर छायाचित्रे आणि सुटसुटीत मांडणी यामुळे पुस्तकांची निर्मिती देखणी व आकर्षक झाली आहे.

एकूणच हे पुस्तक रामजन्मभूमी आंदोलनावर हेतुपूर्वक, स्वार्थी आणि उथळ आरोप करणार्‍यांना सडेतोड उत्तर देणारे आहे, यात शंका नाही. या आंदोलनात सहभागी झालेल्यांनी, त्यांच्या सहानुभूतीदारांनीच नव्हे तर, या आंदोलनाला विरोध करून आपली राजकीय स्वार्थाची पोळी शेकून घेणार्‍यांनी देखील हे पुस्तक एकदा तरी वाचले पाहिजे. तरच या आंदोलनाची अभूतपूर्वता आणि व्यापकता त्यांच्या लक्षात येईल.

रामजन्मभूमी मुक्तीचे अभूतपूर्व आंदोलन लेखक : दि. भा. घुमरे पाने : १६० किंमत : १५० रू. नचिकेत प्रकाशन : 24 योगक्षेम ले-आऊट, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर-15, भ्र. 9225210130

— मराठीसृष्टी टिम

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..