गोडा मसाला बनवताना सुके खोबरे व तीळ हे स्निग्ध पदार्थ टाळून अथवा अत्यल्प प्रमाणात घेऊन, धने-जीरे, लवंग – दालचिनी, तमालपत्र, लालसुकी मिरची वगैरे पदार्थ तेलाशिवाय कोरडे भाजून दळून मसाला बनवावा.
मैद्याऐवजी नेहमी गव्हाचे पीठ म्हणजे कणीक वापरावी. चवीत काहीही फरक पडत नाही. रोजच्या पोळीच्या कणकेत थोडे सोयाबीनचे पीठ मिसळून ठेवावे. ज्वारी – बाजरीच्या पिठात थोडे नाचणीचे पीठ मिसळून ठेवावे म्हणजे रोजचीच पोळी – भाकरी अधिक पौष्टिक बनेल.
कॅलरीज कमी करण्यासाठी स्किम्ड दुधाचा वापर करावा. दोन वेळा दुधावरची मलई काढून टाकल्यावर ते दूध “लो फॅट स्किम्ड मिल्क’ बनेल. ह्या दुधाचे दही, ताक सर्व बनवता येते. शक्य तर गाईचे दूध वापरावे.
डाळींमध्ये भरपूर प्रथिने असतात. तुरीची, मुगाची, मसुरीची उडदाची अशा सर्व प्रकारच्या डाळी आपण वापरतो. डाळ शिजवतानाच त्यात आवडीप्रमाणे कांदा – लसूण – टोमॅटो – हिरवी मिरची घालावी. म्हणजे नंतर चमचाभर तेलाची फोडणी पुरेल. बदल म्हणून डाळ शिजतानाच त्यात मेथी, पालक, शेपू अशी कोणतीही पालेभाजी घालून शिजवावे. म्हणजे प्रथिनांबरोबर पालेभाजीतील “लोह’ व “अ’ जीवनसत्व मिळेल.
डाळींप्रमाणे कडधान्ये म्हणजे प्रथिनांचे स्रोत मानतात. कांदा, टोमॅटो, काकडी, कोबी, गाजर, मुळा बीटरूट अशा कोणत्याही कोशिंबीरीत मोड आलेले कोणतेही कडधान्य कच्चेच घालावे. फोडणी देणे टाळावे. म्हणजे रोजचीच कोशिंबीर अधिक पौष्टिक बनेल.
प्रेशर कुकर, ओव्हन, नॉनस्टिक तवा, पॅन, कढई यांचा वापर केल्यास कमीत कमी तेलात अनेक पदार्थ बनवता येतील.
साखरेऐवजी शक्ये तेथे गूळ वापरावा, मधाचा उपयोग करावा.
ताजी फळे खाणे उत्तम! सुकामेव्यापैकी आक्रोड, खजूर, काळ्या मनुका, सुके अंजीर सर्वांत पौष्टिक असतात. वजन कमी करण्याचा प्रश्न् नसेल तर रोज दोन बदाम खावेत.
संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. उमाशशी भालेराव
Leave a Reply