“लताचा 87 वा वाढदिवस येतोय , काहीतरी लिहिलं पाहिजे ” असं परवा एका मित्राला म्हटलं तेव्हा तो माझ्यावर भडकलाच !
” त्या कुठे ? तू कुठे ? ( तुझी पात्रता काय ?) आणि तू त्यांना सरळ एकेरीत संबोधन करतोस ? निदान वयाचा तरी विचार ? ”
मी त्याला म्हटलं , ‘ हे बघ, आपण दोघेही कोल्हापूरात राहतो ! तू कधी म्हणतोस का, ‘आदरणीय श्री अंबाबाई यांच्या देवळात चाललोय ‘ ?
आपण म्हणतो ” अंबाबाईला चाललोय ” किंवा ‘ आत्ताच मारूतीला जाऊन आलो !’
‘ उद्या आमच्याकडे गणपती साहेब येणार आहेत असं म्हणायची आवश्यकता नाही , आपल्या सगळ्या दैवतांना आपण एकेरीत संबोधतो ‘
लताही दैवतासमानच !
खरं म्हणजे असल्या दैवतीकरणाचा मला मनस्वी राग आहे . पण हिच्या गाण्यापुढे सगळे अभिनिवेष अगदी गळून पडतात .
मध्यंतरी एक मित्र म्हणाला , ‘लताला भारतरत्न देणं चुकीचं आहे , तिने आपल्या संगीतात थेट नवीन भर काय घातली ? जे संगीतकारांनी सांगितलं ते तिनं म्हटलं , तिनं काय कुमारजींसारखे नवे राग निर्माण केले काय ? ‘
मग मी त्याला ‘ संगीतकारांचे भीष्माचार्य ‘ – अनिल विश्वास यांच्या एका उद्गाराची आठवण करून दिली –
” लता आली आणि आम्हा संगीतकारांना ‘देवदूत’ आल्याचा आनंद झाला , ती यायच्या आधी गायकाच्या गळ्याला झेपेल अशीच चाल तयार करायला लागायची . पण ती आली आणि सगळी बंधनं नाहीशी झाली ” .
म्हणजे अनेक संगीतकारांची प्रतिभा मुक्त विहार करू शकेल असं आभाळ – असा अवकाश – लताच्या गाण्यानं उपलब्ध झाला , हे तिचं केवढं मोठं योगदान आहे ?
मग मात्र तो निरुत्तर झाला .
एकदा अशीच चर्चा चालली होती – लता आणि आशा यांच्या स्वभावातल्या फरकाबद्दल .. आशाला सगळ्याची हौस … लता मात्र सदैव पांढ-या सुती ( की सुतकी ) साडीत ! एक जण म्हणाला ‘ या बाईंनी लग्न पण केलं नाही … संसार नाही इ. इ.
तेव्हा माझे एक ज्येष्ठ सहकारी म्हणाले, “अहो, लतानं 1956 सालीच एका गाण्यातून आपल्याला सांगून ठेवलंय – ‘मेरा छोटासा देखो ये संसार है, मेरा जीवन है ये, मेरा सिंगार है’ – संगीत हाच तिचा ‘संसार’ , सात स्वर हेच तिचं जग, संगीतातले यच्चयावत अलंकार हेच तिचे दागिने ‘ , उगीच लौकिक फूटपट्ट्या कशाला लावता ? ‘
‘ नास्तिक व्यक्तीला देखील आस्तिक बनवण्याची ताकद तिच्या गाण्यात आहे . आपले पाडगावकर तसे निरीश्वरवादीच ! पण तेही म्हणाले ,
‘ एेकता गायकांना
वानितो मी त्यांच्या स्वरांना
एेकता गाणे ‘लताचे’
मानितो मी इश्वराला ‘
लेख लिहायला म्हणून बसलो आणि लताच्या गाण्यांच्या अथांग सागराकडे एक कटाक्ष टाकला . त्याचा तो प्रचंड पसारा पाहून एकच गोष्ट पक्की समजली ,
” लताचं प्रत्येक गाणं हे परीपूर्ण आहे पण तिच्या गाण्यावरचा प्रत्येक लेख हा अपूर्ण – अधुरा असाच असणार ! स्वतःची मर्यादा लक्षात आली आणि लेख लिहायचा विचार सोडून दिला ! लताच्या स्वरविश्वासमोर नतमस्तक होऊन शांत उभा राहिलो
( धनंजय कुरणे 9325290079)
28.9.2016
Leave a Reply