लेखकांची व्यथा एक लेखकच बर्यापैकी मांडू शकतो पण त्यासाठी तो हाडाचा लेखक आणि किंचित साहित्य वेडाच असायला ह्वा ! श्रीमंतीत जन्माला येऊन चांदिच्या ताटात सोन्याच्या चमच्याने पंच पक्वान खाऊन लेखक झालेला लेखक लेखकांची व्यथा कशी मांडू शकणार ? लेखक म्ह्णून जन्माला आलेला आणि प्रसिद्धीसाठी लेखक झालेला यांची व्यथा वेगवेगळी असते. लेखकांच्या घरातील लोकांच्या नजरेत दारुड्या आणि तो लेखक यांच्यात काही फरक नसतो ही लेखकाची सर्वात मोठी व्यथा असते. बहुसंख्य लेखकांना आपण लेखक का झालो ? या प्रश्नाचे जगाल पटेल असे उत्तर देणे अवघड जाते ही दुसरी व्यथा. आजही तू काय करतोस ? हा प्रश्न आपल्या देशातील लेखकाला विचारला तर तो छाती फुगवून सांगत नाही की मी लेखक आहे, मग तो मी चित्रपटासाठी, नाटकासाठी, वर्तमानपत्रासाठी अथवा टेलिव्हिजनसाठी लिहतो असं उगाचच मनात नसतानाही जोडून सांगत असतो म्ह्णजे त्यांच्या लेखक असण्याला वजन प्राप्त होते. ही आणखी एक व्यथा.
एखादा तरूण लेखक आहे म्ह्णून त्याच्याशी लग्न करायला तयार असणारी स्त्री एक तर लेखक असायला हवी नाहीतर वेडी ! ही पुरूष लेखकांची आणखी एक व्यथा आहे. आपल्या देशात अनेक नामवंत लेखक आहेत ज्यांना आपलं पहिलं पुस्तक प्रकाशित होण्यासाठी दहा- बारा वर्षे वाट पाहावी लागली इतकी वाट पाहायला लागणे ही ही एक व्यथाच आहे. या व्यथे पासून सुटका करून घेण्यासाठी काही लेखक पै-पै गोळा करून, इतरांची मदत घेऊन प्रसंगी कर्ज काढून स्वःखर्चाने आपली पुस्तके प्रकाशित करून घेतात. त्यांचे आयुष्य संपले तरी त्या पुस्तकांच्या ह्जार प्रती काही संपत नाहीत आणि संपल्या तरी त्या फुकट वाटून संपलेल्या असतात. या सगळ्यात आपला वेळ आणि पैसा तर वाया गेलाच पण प्रसिद्धी ही मिळाली नाही ही व्यथा आयुष्यभर त्यांचा पिच्छा सोडत नाही. कित्येक लेखकांना आपण इतके चांगले लेखक असूनही आपल्याला प्रसिद्धी, मानसन्मान, पुरस्कार का मिळाले नाही ही व्यथा सतावत असते. प्रत्येक लेखकाला त्याच्या आयुष्यात एकदा तरी हा प्रश्न पडतोच की आपण लेखक होऊन काही चूक तर केली नाही ना ?
लेखकाची सर्वात मोठी व्यथा ही असते की प्रत्येक वेळी त्याला फक्त मानधनच स्वीकारावे लागते त्याचे मूल्य तो नाही तर इतर ठरवतात. लेखकांची ही बोली लागेल असा दिवस कधीतरी या देशात उजाडेल का ? हा प्रश्न प्रत्येक लेखक स्वतःला विचारत असतो आणि अधिक व्यथीत होत असतो. लेखकाचे मूल्य अमूल्य असते आणि ते अमूल्यच राहते देर्दैवाने ही एक व्यथाच आहे.
— निलेश बामणे
Leave a Reply