प्रो.अ.ती.शहाणे, नावाप्रमाणेच शहाणपणा करण्याची सवय असलेले. असो, तर ते एकदा मोटरसायकल खरेदीसाठी मल्टीब्रांडेड शोरूम मध्ये गेले. तेथील सेल्समनला त्यांनी बरेच ‘पिळले’, नव्हे अंतच पहिला म्हणाना त्याचा.
प्रो.: अरे ही काय मोटरसायकल आहे? दुसरी काहीतरी लेटेस्ट दाखव.
सेल्समन : ही पहा सर, अगदी लेटेस्ट आहे,
याचे मायलेज उत्तम आहे.
प्रो. : छे. पटत नाही. दुसरी नाही का?
सेल्समन : मग तुम्ही ही घ्या सर, हीला ऑटोमॅटिक गिअर आहेत.
प्रो. : तुमच्याकडे काही व्हरायटीजच नाहीत. दुसरीकडे जाऊ का?
सेल्समन : असं कसं म्हणता सर, हे पहा नविन मॉडेल, सर या बाईकला क्लचच नाही, आणि हीला एक वर्षा ऐवजी दोन वर्षाची वॉरन्टी पण आहे.
प्रो. : छेऽऽ अरे विना कल्चमध्ये काय नवीन आहे रे? आणि दोन वर्षांची वॉरन्टी म्हणजे सर्व्हिससाठी तुमच्याकडे दोन वर्षे हेलपाटेच मारायचे ना?
आता मात्र सेल्समन जाम वैतागला होता, तरीही शांतपणे तो प्रोफेसरांना म्हणाला,सर आता मी जे एक मॉडेल तुम्हाला दाखवितो आहे ते तुम्ही निश्चितच पसंत करणार याची मला खात्री आहे.
प्रो. : असं? तर मग दाखव ते मॉडेल. आणि काय नवीन वैशिष्टे आहे सांग पाहू त्याची.
सेल्समन : सर हे पहा ते मॉडेल. हे घेऊन जाणारे ग्राहक एकदा गेले की गेलेच म्हणून समजा, ते पुन्हा येतच नाही.
प्रो. : अरे व्वा! म्हणजेच सर्व्हीसिंगसाठी सुद्धा येण्याची गरज पडत नाही म्हणजे फारच उत्तम मॉडेल आहे दिसतयं हे. असचं काहीतरी नवीन घेण्याची माझी इच्छा होती. बर आता मला सांग की असं काय वैशिष्ट्य आहे याच्यात?
सेल्समन : सर, या लेटेस्ट मॉडेल मध्ये ब्रेकच नाही.
— रमण कारंजकर
Leave a Reply