नवीन लेखन...

लोकसाहित्य – लोकरंगभूमी नातेसंबंध



अनागर आणि नागर समाजाच्या पारंपरिक अविष्कारांना ‘लोकसाहित्य` असे संबोधता येईल. ध्वनी आणि शब्दांच्या सामर्थ्यासह हे लोकाविष्कार व्यक्त होतात. या लोकाविष्कारांमध्ये लोकश्रध्दा, लोकभ्रम, चालीरीती, रूढी, नृत्य, नाटयदी प्रयोगात्म आविष्कार यांचा अंतर्भाव आपण करू शकतो. लोकांच्या संदर्भातील विज्ञान म्हणजे लोकसाहित्य नव्हे तर लोकसाहित्य म्हणजे पारंपरिक लोकविज्ञान आणि लोकगीते, लोककथा आदी होय. थोडक्यात लोकसाहित्याची व्याख्या करायची झाल्यास लोकसाहित्य म्हणजे परंपरेची विज्ञान (Science of tradition ) असे आपणास म्हणता येईल. लोकसाहित्यात अंगाईगीते, प्रहेलिका, म्हणी, उखाणे, लोककथा, लोकगीते इतकेच काय हस्तकला, लोनृत्ये, लोकवाद्यवादन, लोकशिल्प, लोकचित्र, लोकवैद्यक आदींचा समावेश होतो. लोकसाहित्याचे निर्वहन एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे पारंपरिक पध्दतीने होते. मौखिकता आणि अपौरूषत्व हे लोकसाहित्याचे गुणविशेष आहेत. लोकसाहित्याला मौखिक साहित्याची समृध्द परंपरा असते तसेच हे लोकसाहित्य कोणा एका व्यक्तीचे नसते तर समूहाचे असते. समूहाने, समूहासाठी निर्मिलेल्या या मौखिक स्वरूपात संक्रांत होणार्‍या लोकसाहित्याचा कर्ता अज्ञात असतो त्यामुळे लोकसाहित्य हे व्यक्तीकेंद्री नसते तर समष्टी केंद्री असते.लोकसाहित्याची व्याख्या विल्यम बास्कम यांनी केली आहे ती अशी-“In anthropological usage the term folklore has come to mean myths, legends, folktales, proverbs, riddles, verse and a variety of other forms of artistic expression whose medium is the spoken word. Thus, folklore can be defined as verbal art.”मानववंश शास्त्रज्ञांनी लोकसाहित्याची वरील व्याख्या सर्वसाधारणपणे मान्य केलेली आहे. मौखिक संस्कृतीचे सर्व अविष्कार हे सर्वसाधारणपणे लोकसाहित्य म्हणून ओळखले जातात. लोकप्रिय आणि पारंपरिक ज्ञानाचा मानवी समूहाने पिढयान् पिढयांनी केलेला संचय म्हणजे लोकसाहित्य होय. ‘समूहाच्या शहाणपणाचा` आविष्

ार म्हणजे लोकसाहित्य होय. श्रध्दा, रूढी, रीतीरिवाज आदी द्वारे लोकसंस्कृती आविष्कॄत होते. ही आविष्कॄत लोकसंस्कृती म्हणजेच लोकसाहित्य होय. प्राचीन लोकप्रिय रूढी, परंपरा, रीतीरिवाज यांचे ज्याद्वारे

दर्शन होते त्यास लोकसाहित्य म्हणून संबोधण्यात येते.

शतकानुषतकांच्या सांस्कृतिक सजीव अवशेषांना आपण लोकसाहित्य म्हणू शकतो. लोकसाहित्याच्या अशा विविध व्याख्या असल्या तरी पारंपरिकता, अपौरूषेयत्व, सामूहिकता, मौखिकता, समूहाचे आविष्कॄत होणारे शहाणपण हे लोकसाहित्याचे गुण विशेष म्हणता येतील. लोकरंगभूमी आणि लोकसाहित्य यांच्या परस्पर संबंधांचा वेध घेण्याचा आपण प्रयत्न केल्यास असे म्हणता येईल की, लोकरंगभूमी हा लोकसाहित्याचा प्रयोगात्म अविष्कार होय, लोकसाहित्याचे कृतीरूप, व्यक्त रूप, सजीव रूप म्हणजेच लोकरंगभूमी होय. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती व्यक्त होती ती लोकरंगभूमी द्वारे. लोकरंगभूमीवरील मौखिक सामर्थ्य हे लोकसाहित्याचे योगदान होय. लोकरंगभूमीची व्याख्या आपण आपण खालील प्रकारे करू शकतो. ‘लोकसाहित्याचा गीत, नृत्य, नाटय, संगीतमय आविष्कार म्हणजे लोकरंगभूमी` शब्दरूप लोकसाहित्य कृतीरूप, प्रयोगरूप धारण करते ते लोकरंगभूमीच्या माध्यमातून लोकरंगभूमी ही समूहनाची आविष्कार भूमी होय. समूहनाचे हे कृती रूप पारंपरिक असते त्यामुळे लोकरंगभूमी ही पारंपरिक रंगभूमी होय. या पारंपरिक रंगभूमीवर स्थळ, काळ, व्यक्ती, समूह साक्षेप संस्कार होतात. या संस्कारांमुळे लोकरंगभूमीचे स्वरूप बदलत जाते त्यामुळेच परंपरा आणि नवता यांचा सुंदर मिलाप म्हणजे लोकरंगभूमी असे म्हणावे लागते. लोकांनी, लोकासांठी, लोकांमधून तयार केलेला प्रयोगमंच म्हणजे लोकरंगभूमी. या लोकरंगभूमीची वैशिष्टये खालील प्रमाणे सांगता येतील.-१) पारंपरिकता २) मौखिकता ३) सहज स्फूर्तता ४) उत्स्फूर्
तता ५) स्थल, काल संवादित्व ६) सामूहिकता ७) नित्यनूतनता ८) परिवर्तनशीलता ९) समग्रता १०) विशिष्ट हेतू प्रधानता१) पारंपरिकता:- लोकरंगभूमीचा पाया पारंपरिकता हा आहे. पिढयान पिढयांच्या संस्कारातून एक परंपरा विकसित होते. या परंपरेचे प्रयोगरूप दर्शन लोकरंगभूमीवर होते. या परंपरेला विधि विधाने, धर्मश्रध्दा आदींचे अधिष्ठान असते. त्यातूनच पुढे लोकरंगभूमीवर विधिनाटये, संकीर्तन नाटयांची परंपरा निर्माण झाली, गोंधळ, जागरणा सारखी विधिनाटये, दशावतार, भारूड, ललिता सारखी संकीर्तननाटये अथवा भक्तीनाटये हे लोकरंगभूमीचे मध्ययुगीन रूप होय. या विधिनाटयांची आणि संकीर्तननाटय अथवा भक्तीनाटयांची मोठी परंपरा भारतीय लोकरंगभूमीला आहे. २) मौखिकता:- लोकरंगभूमीवरील सर्व आविश्कार प्रारंभी मौखिक संहितेच्या स्वरूपात होते. जस जसा काळ बदलत गेला तसे या मौखिक संहितोना लिखित संहितेचे स्वरूप प्राप्त झाले व पुन्हा या लिखित संहिता प्रयोग रूपात येतना परिष्कॄत झाल्या. लोकरंगभूमी ही मौखिक स्वरूपातच होती पण या लोकरंगभूमीवर बदलत्या प्रसार, प्रचार व मनोरंजन माध्यमांचा फार मोठा प्रभाव पडला व मौखिक स्वरूपातील संहिताही कालंतराने या माध्यमांच्या प्रभावाने बदलत गेली.३) सहजस्फूर्तता:- सहजस्फूर्तता हा लोकरंगभूमीचा गुणविशेष आहे. लोकरंगभूमीवर कोणतही गोष्ट पूर्वनियोजित नसते. सहज स्वाभाविक जे स्फूरते त्याचा आविश्कार लोकरंगभूमीवर होतो. अभिनय, नृत्य, वादन, गायन आदी आविष्कारांच्या सदंर्भात ही सहज स्फूर्तता असते. ४) उत्स्फूर्तता:- लोकरंगभूमीवरील आविष्कार उत्स्फूर्त असतात. आयत्या वेळी जे सुचते. जसे सुचते तसा आविष्कार लोकरंगभूमीवर लोककलावंत घडवितात. ही उत्सफूर्तता मौखिक संहितेच्या प्रगटीकरणाच्या पातळीवर, नृत्य, गायन, वादन आदी आविष्कारांच्या पातळीवर असते. उत्स्फूर्तत

चे स्वरूप ‘अंतारिचे धावे स्वभावे बाहेरी` असे असते. ५) स्थल, काल संवादित्व :- लोकरंगभूमीवरील आविष्कार स्थल, काल सापेक्ष असतात. हे आविष्कार स्थल, कालनुरूप् बदलतात. लोकरंगभूमीवरील एखादे लोकनाटय एखाद्या विशिष्ट ठाकणी सादर होत असेल तर त्या ठिकाणाचे संदर्भ त्या लोकनाटयात घेतले जातात. जागरण, गोंधळा सारख्या विधिनाटयात नमन आवाहनात त्या त्या ठिकाणच्या ग्रामदेवतांचा उल्लेख केलेला असतो. अनेक समकालीन संदर्भ लोकरंगभूमीवर येतात. ‘गाढवाचं लग्न` या वगनाटयात वगसम्राट दादू इंदुरीकर चित्रसेन गंधर्वाचे लग्न लागताना प्रेक्षकांमधील मान्यवरांचा उल्लेख वर्‍हाडी मंडळी असा करायचे. ‘विच्छा माझी पुरी करा` या लोकनाटयाचा प्रयोग शिवाजी मंदिर येथे सुरू असताना केंद्रीय अर्थमंत्रीपदाचा राजीनामा सी.डी.देशमुख यांनी दिल्याचे वृत्त थडकले तात्काळ दादा कोंडके उद्गारले, ‘आरं आरं शिडी पडली` अशा समकालीन संदर्भांसह लोकरंगभूमी विकसित होते. म्हणजेच स्थल, काल संवादित्व हा

लोकरंगभूमीचा गुण विशेष असतो. ६) सामूहिकता:- लोकरंगभूमीवरील आविष्कार हे व्यक्तीकेंद्री नसतात समष्टी केंद्री असतात.

हे आविष्कार कोणा एका व्यक्तीची निर्मिती नसते तर समूहाची निर्मिती असते. समूहमनाचा गीत, नृत्य, नाटय संगीतमय आविष्कार म्हणजेच लोकरंगभूचे आविष्कार त्यामुळे तेथे सामूहिकतेला विशेष महत्व असते. अध्यात्मिक उद्बोधन, सामाजिक प्रबोधन आणि रंजन अशा त्रिसुत्रीने लोकरंगभूमीवरील आविष्कार सादर होतात त्यासाठी समूह भावना महत्वाची असते. अंगणीय, प्रारंणीय, मंदिर परिसरातील अथवा कृषी क्षेत्रातील सर्व लोकाविष्कारांचे दर्शन लोकरंगभूमीवर होते त्यात लोकनृत्ये, विधिनाटये, विधिगीते, लोकनाटये आदींचा समावेश असतो. या सर्व लोकाविष्कारांमध्ये सामूहिकता महत्वाची असते.७) नित्यनूतनता:- लोकरंगभूमीवरील
ोकाविष्कार हे नित्य ताजेतवाने असतात. नित्य नूतन असतात. एखाद्या ग्रंथाची जशी आवृत्ती असते. ही आवृत्ती पहिली, दुसरी, तिसरी अशी बदलत जाते तसे लोकाविष्कार म्हणजे पुनरावृत्ती, पुनर् मांडणी अषा स्वरूपाचे नसतात. प्रत्येकवेळी ही मांडणी नवीन असते त्यात आधीच्या आविष्कारांची नकुल नसते तर प्रत्येक लोकाविष्कार हा नवा असतो आणि नवा वाटतो. त्या लोकाविष्कारामध्ये ताजेपणा असतो कारण या आविष्कारांची उर्जा नवी असते. हे आविष्कार सादर करणार्‍या लोककलावंतांची अंतरिक उर्जा नवी असते त्यामागच्या प्रेरणा जरी परंपरेशी घट्ट नाते जोडलेल्या असल्या तरी या उर्मीला नव नवोन्मेष प्राप्त झालेले असतात.८) परिवर्तनशीलता:- लोकरंगभूमीवर आविष्कार हे पारंपरिक असेल तरी त्याच्यात बदलांची क्षमता असते. ते परिवर्तनशील असतात. लोकरंगभूमीवरील लोकाविष्कारांची सर्व मदार ही लोकांवर असते. लोकानुनय हे त्यांचे वैशिष्ट असते. या आविष्कारांचे भरण पोषण समूहावर अवलंबून असते. लोकांची मागणी बदलत जाते. ही मागणी जशी बदलते तशी परिवर्तने लोकाविष्कारांमध्ये होतात. लोकांची रूची बदलते तसे बदल लोकाविष्कारांना करावे लागतात पण हे बदल केले गेले तरी या लोकाविष्कारांमागे असणारे परंपरेचा धागा मात्र सुटला नाही.९) समग्रता:- लोकरंगभूमी ही समूहाची असते. ती समग्र असते म्हणूनच तिचा विचार एकत्र आविष्कार असा करता येत नाही तर समग्र आविष्कार असा करावा लागतो. प्रेक्षक आणि कलावंत हे दोघेही लोकरंगभूमीवरील खेळत सहभागी असतात. प्रेक्षक हे केवळ खेळाचे निरक्षण करणारे प्रेक्षक नसतात तर खेळातील सहभागी प्रेक्षक असतात. ‘नोहे एकल्याचा खेळ । अवघा मेळविला मेळ` असे लोकाविष्कारांचे स्वरूप असते त्यामुळे समग्रता हा लोकरंगभूमीचा गुणविशेष असतो. याचे उदाहरण म्हणजे कीर्तनात कीर्तनकारा सोबत भक्तही नामसंकीर्तनात मग
्न होतात. जागरण, गोधळ यासारख्या विधिनाटयात भक्त घटस्थापना झालेली असताना प्रत्यक्ष जागरण, गोधळ सुरू असताना वाघ्या-मुरळयांचा कपाळाला भंडारा लावतात त्याच्या पाया पडतात, आशीर्वचन घेतात त्यावेळी जागरण, गोधळाच्या रंगभरणीत रसविक्षेप झाला असे कोणलाही वाटत नाही कारण हे समग्रतेचे लक्षण मानले जाते. १०) विशिष्ट हेतू प्रधान:- लोकरंगभूमीवरील आविष्कार कुठल्यातरी ……….. हेतूमुळे सिध्द होतात. निर्हेतूक लोकाविष्कार शक्य नसतात. या हेतूंमध्ये विविधता असते. विधि विधाने, आध्यात्मिक उद्बोधन, समाज प्रबोधन, लोकरंजन असे विविध हेतू लोकाविश्कारांमागे असतात. लोकरंगभूमी आणि लोकसाहित्य यांचा परस्पर संबंध दृढ असतो. लोकसाहित्याचे कृतीरूप् लोकरंगभूमी हे आहे.
<(महान्यूजच्या सौजन्याने)

— डॉ.प्रकाश खांडगे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..