‘डायट’ हे आपल्याकडे गेल्या काही वर्षांत बरेच फोफावले फॅड आहे. ज्यूस डायट ते केटोजेनिक डायट असे विविध डायट प्रकार घाऊक दराने आढळून येतात. वजन कमी करण्यासाठी उपास करणे हा एक ‘अनोखा’ मार्ग काहीजण अवलंबतात. विशेषतः महिलावर्गात ही पद्धत फारच प्रसिद्ध आहे.
“सध्या वेट ओब्सर्व्ह करतेय. डायटचा भाग म्हणून रात्री जेवत नाही.” असं वाक्य बऱ्याचदा कानावर पडत असतं. किती मात्रेत जेवावे हे आपण याआधीच पाहून झाले आहे. आज या उपास(मारी)बद्दल पाहू. आयुर्वेद म्हणतो; चार घास कमी जेवावे. मात्र योग्य मात्रेपेक्षा कमी जेवणे हे आरोग्यास अपायकारक आहे असेही आयुर्वेदाचेच मत आहे. भूक मारून उपास केल्यास शरीराला पुष्टी प्राप्त होत नाही. पुष्टी नसल्याने बळ कमी होते. शरीराची जडणघडण (उपचय) ढासळू लागते. हा उपचयच आपली रोगप्रतिकार शक्ती ठरवत असतो. तोच कमी झाल्याने या शक्तीवरही विपरीत परिणाम होऊन शरीर आतून पोखरण्यास सुरुवात होते. याशिवाय अशी उपासमार केल्याने शरीरात वेगवेगळे वाताचे विकार (सांधेदुखी वगैरे) घर करू लागतात.
वजन कमी करण्याच्या नादात भूक मारून रात्रीचे जेवण बंद केलेत तर सुरुवातीला चांगला फरक अवश्य जाणवतो; काही प्रमाणात वजन कमीदेखील होते. मात्र हे वजन शरीरातील अतिरिक्त पाण्याचे असते. प्रत्यक्षात मेद मात्र मुळीच कमी झालेला नसतो. शिवाय अशा प्रकारे काही किलो वजन घटवलेत तर पुढे केव्हाही नेहमीचा आहार घेण्यास सुरुवात केल्यावर त्याच्या जवळपास दीड ते दोन पट वजन वाढते हा कित्येकांचा अनुभव असेल. आरोग्य उत्तम राखून वजन कमी करायचे असल्यास; ‘योग्य आहार- संतुलित व्यायाम- आयुर्वेदीय उपचार’ ही यशस्वी त्रिसूत्री आहे.
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
Leave a Reply