जहाल क्रांतिकारक श्री अरविंद यांच्याविरोधात ब्रिटिशांनी कारवाईची तयारी सुरू केली तेव्हा त्यांच्या अंतर्मनात माणसाच्या आत्मिक स्वातंत्र्याचा विचार प्रकटला. त्याकरिता योगाभ्यासासाठी म्हणून ते फ्रेंचांची वसाहत असलेल्या पॉंडिचेरीला आले. तिथला त्यांचा मुक्काम म्हणजे खरे तर प्रथम अज्ञातवासच होता. तरी त्यांचे वास्तव्य ब्रिटिश गुप्तचरांच्या लक्षात आले आणि त्यांच्या हेतूंबद्दल संशय असल्याने ब्रिटिश तसेच फ्रेंच गुप्तहेरांची त्यांच्यावर पाळतही होती.
नंतर अरविंदांनी आपले वास्तव्य उघड केले आणि अनेक मान्यवर त्यांच्या भेटीलाही जाऊ लागले. त्यामुळे अरविंदांविरुध्द काही पुरावा उभा करावा आणि त्यांना ताब्यात घ्यावे, यासाठी ब्रिटिशांनी कट रचला. ब्रिटिश गुप्तहेरांनी काही बनावट छायाचित्रे, नकाशे तसेच काही पत्रे एका पत्र्याच्या डब्यात भरली व तो डबा अरविंदांचे मित्र सी.व्ही.व्ही.एस अय्यर यांच्या घरातील विहिरीत टाकून दिला आणि फ्रेंच पोलिसांना धाड टाकण्यास सांगितले. मात्र त्याआधीच अय्यर यांची मोलकरीण विहिरीतून पाणी काढत असताना तो डबा वर आला. त्या डब्याबाबत अरविंदांनीच फ्रेंच पोलिसांना वर्दी दिली. फ्रेंच पोलीस आले व त्यांनी अरविंदांच्या खोलीची झडती सुरू केली. त्या खोलीत बरीच पुस्तके कागदपत्रे होती. त्यातील काही कागदपत्रांवर ग्रीक तसेच लॅटिन भाषेत लिहिलेले आढळले. अरविंदांना या भाषादेखील येतात, हे पाहून त्या फ्रेंच अधिकार्याला आश्चर्य वाटले. योगी अरविंदांविषयी कृतज्ञता व्यक्त करुन निघून गेला.
पण या धाडीमुळे अरविंदांनी अल्जेरियासारख्या देशात जाऊन राहावे, असे काही जणांचे मत पडले. तमीळ राष्ट्रकवी सुब्रह्मण्यम भारती यांनीही तसा आग्रह केला. अरविंदबाबू शांतपणे म्हणाले, कितीही धाडी पडल्या तरी मी येथून क्षणभरही हलणार नाही.
पॉंडिचेरी फ्रेंचाच्या ताब्यात का असेना पण परक्या अल्जेरियापेक्षा आपल्या मायभूमीतील हा वनवास ही त्यांना प्रिय होता. मातृभूमीवरचे हे प्रेम पाहून सार्यांचीच अंत:करणे हेलावली.
Leave a Reply