प्रा.डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी एम. ए.,पीएच.डी., मास्टर ऑफ ड्रॅमॅटिक्स या पदव्या प्राप्त केल्या होत्या. त्यांचा जन्म ५ डिसेंबर १९४३ रोजी झाला. १९६६ ते १९६८ या कालावधीत मौलाना आझाद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तर १९६८ ते १९८० स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. २३ नाटय़महोत्सवाचे आयोजन, २०० पेक्षा अधिक नाट्यकथांची निर्मिती करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, डॉ. श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर दोन चित्रपटांत भूमिका, अशी त्यांची नाट्य-चित्रपट कारकीर्द होती. ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगामुळे डॉ. देशपांडे यांचा प्रेक्षक-श्रोता जगभर होता. एकूण ५२ पात्रांचे विविध आवाज आणि कमीतकमी प्रभावी हालचाली हे या एकपात्री प्रयोगाचे खास वैशिष्टय़ होते. मराठवाडय़ाच्या ग्रामीण जीवन शैलीशी एकरूप असलेले आणि अस्सल व्यक्तिरेखा असणारा हा प्रयोग केवळ मराठवाडय़ातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि विविध देशांतील मराठी नाटय़रसिकांना भावला. ‘गीनिज बुक’मध्ये तब्बल दोन वेळा नोंद घेण्यात आलेले लक्ष्मण देशपांडे यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. ‘वऱ्हाड’चे लेखन, दिग्दर्शन आणि कलावंत या सगळ्या भूमिका डॉ. देशपांडे यांच्याच होत्या. तीन छोटे दिवे, तीन माईक आणि पंचा इतके छोटे साहित्य वापरून ५२ व्यक्तिरेखा उभ्या करणाऱ्या ‘वऱ्हाड निघालंय लंडन’ची सुरुवात १९८० मध्ये झाली. डॉ. देशपांडे यांनी ‘वऱ्हाड’ लंडन, अमेरिका, कॅनडा, दुबई, मस्कत, ऑस्टेलिया, नायजेरिया, नैरोबी, कतार, कुवेत, थायलंड, सिंगापूर या देशांतही पोहोचवले. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ने त्यांच्या या कार्याचा १९९६ मध्ये प्रथमत: गौरव केला. आजपर्यंत या एकपात्री प्रयोगाचे ३ हजारांपेक्षा अधिक प्रयोग झाले होते. डॉ. देशपांडे यांनी डॉ. अनुया दळवी यांच्याबरोबर द्विपात्री ‘नटसम्राट’चे शंभरावर प्रयोग केले. त्यांनी दोन चित्रपटांतही काम केले. स्वेच्छानिवृत्तीनंतर ते परभणीच्या अ. भा. नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष झाले. नाटकाच्या मिळकतीतून बरीचशी रक्कम त्यांनी नगिर्स कॅन्सर हॉस्पिटल (बाशीर्), अंधशाळा नाशिक आणि इतर ठिकाणी दिली. २००३ मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाने सन्मानित केले तर २००४ ला त्यांना विष्णुदास भावे पुरस्कार प्रदान करण्यात आला. या शिवाय अनेक मान्यताप्राप्त पुरस्कार त्यांना देण्यात आले.
प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे २२ फेब्रुवारी २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply