नवीन लेखन...

वादग्रस्त एनसीटीसी…

 

एनसीटीसीसाठी ५ मे रोजी खास स्वतंत्र बैठकीचे आयोजन केल्याची घोषणा गृहमंत्र्यांनी केली. देशातील सर्व दहशतवादविरोधी यंत्रणांमध्ये सुसूत्रता व समन्वय निर्माण करण्यासाठी केंद सरकारने राष्ट्रीय दहशतवाद विरोधी केंदाच्या (एनसीटीसी) स्थापनेची घोषणा केली. परंतु हा राज्यांच्या घटनात्मक अधिकारातील केंदाचा हस्तक्षेप ठरवत तेरा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या स्थापनेला विरोध केला आहे. वस्तुस्थिती काय आहे?

आपल्याला अशा यंत्रणेची गरज आहे की नाही?..देशांतर्गत सुरक्षा आणि प्रस्तावित राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राच्या विषयावर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केंद्र सरकारला पुरते घेरण्यात कॉंग्रेसविरोधी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना यश आले. येत्या ५ मे रोजी होणार्‍या दुसर्‍या बैठकीतही अशाच प्रकारे केंद्र सरकारला घेरून मागे हटण्यास भाग पाडले जाईल अशी, चिन्हे त्यामुळे दिसू लागली आहेत. केंद्र आणि राज्यसंबंध कधी नव्हे एवढे सध्या ताणले गेले आहे. आणि प्रस्तावित दहशतवादविरोधी केंद्राची उभारणी राहिली बाजूलाच, राज्यांच्या घटनात्मक अधिकारांवरच केंद्र सरकार आक्रमण करू पाहते आहे, असा आरोप चहुबाजूंनी होऊ लागला आहे. आजवर राज्याच्या अखत्यारीतील बाब मानली गेलेली कायदा आणि सुव्यवस्था आणि पोलीस दलाच्या अधिकारांमध्ये केंद्र सरकार या केंद्राच्या बहाण्याने नाक खुपसते आहे आणि भविष्यात राजकीय कारणांसाठी त्या अधिकारांचा दुरूपयोग होऊ शकतो हे या विरोधाचे प्रमुख कारण आहे. ज्या आय. बी. च्या छत्राखाली हे दहशतवादविरोधी केंद्र स्थापन केले जाणार आहे, तिचा आजवरचा इतिहास काही ठीक नाही. आय. बी. चा वापर दहशतवाद्यांची माहिती मिळवण्यासाठी कमी आणि आपल्या राजकीय विरोधकांची माहिती काढण्यासाठीच आजवर अधिक केला जात आला आहे.

अधिकारांचा दुरुपयोग होणे सहज शक्य 
आणीबाणीच्या काळात आय. बी. ने थैमान घातले होते. आय. बी. ला आजवर केवळ माहिती गोळा करण्याचे अधिकार होते. या प्रस्तावित केंद्राच्या अनुषंगाने प्रत्यक्ष छापे टाकण्याचे आणि अटक करण्याचे अधिकारदेखील त्यांना देण्याचा घाट केंद्र सरकारने घातलेला आहे. म्हणजे जसे सीबीआय हे केंद्राच्या हातचे बाहुले बनलेले आहे आणि त्याच्या आधारे आपल्या राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी त्याचा एखाद्या हत्यारासारखा वापर होतो आहे, तशाच प्रकारे या दहशतवादविरोधी केंद्राच्या आडून राज्य सरकारांच्या अधिकारांवर गदा आणून आपल्या राजकीय विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी या अधिकारांचा दुरुपयोग होणे सहजशक्य आहे.

अमेरिकेच्या एनसीटीसीमध्ये पेंटागॉन, एफबीआय, सीआयए आदी यंत्रणांच्या समन्वयातून दहशतवादासंबंधीची माहिती गोळा करणे, हेच काम अपेक्षित आहे. स्वतंत्रपणे तपास करण्याचे वा अटक करण्याचे अधिकार एनसीटीसीला तेथे नाहीत. मग आपल्याकडेच तसे थेट अधिकार देणे म्हणजे केंद्राच्या हातात एक नवे बेछूट हत्यार देणेच ठरणार आहे. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा विरोध होतो आहे, त्यामागे केवळ राज्य सरकारांच्या अधिकारांवर केंद्र गदा आणू पाहते आहे. एवढ्यामुळेच नाही. त्याला केंद्र सरकारविषयीच्या या अविश्वासाचीही पार्श्वभूमी आहे. कोठेही हिंसाचार झालेला असला तरी राज्य सरकारने विनंती केल्याखेरीज केंद्र सरकार लष्कर वा निमलष्करी दले तेथे पाठवीत नाही. राज्य सरकारने विनंती केल्यानंतर व खरोखरच स्थानिक पोलीस यंत्रणा परिस्थिती हाताळण्यास असमर्थ आहे अशी खात्री पटल्यावरच ही दले राज्य सरकारच्या अखत्यारीतील पोलिसांच्या मदतीला पाठवली जातात. तेथेही त्यांनी कमीत कमी बळाचा वापर करणे अपेक्षित असते. एखादेवेळेस हिंसाचाराच्या ठिकाणी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी दंडाधिकारीदेखील लष्कराला पाचारण करू शकतात, परंतु केंद्र आणि राज्य यांची सहमती अपेक्षितच आहे. घटनेच्या कलम ३५५ अन्वये, केंद्र सरकारने राज्यांचे संरक्षण करणे अपेक्षित असले, तरी त्या कलमाचा आधार घेत परस्पर लष्कर पाठवले गेल्याचा प्रकार कधी घडलेला नाही सध्याचे देशातील राजकीय वातावरण कॉंग्रेसला अनुकूल नाही. जवळजवळ तेरा राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा येत्या पाच मेच्या बैठकीत एकमुखाने केंद्राच्या या प्रस्तावाला कडाडून विरोध करतील तेव्हा मागे हटण्यावाचून गृहमंत्र्यांना पर्यायच राहणार नाही.

दहशतवादाच्या विरोधात देशभरातील गुप्तवार्ता एकत्र करणे, त्याचे विश्लेषण करणे, गुप्तचर संघटनांत समन्वय साधणे यासाठी एनसीटीसीची स्थापना केली जात आहे. त्यानंतर राज्यातील सुरक्षा यंत्रणांना एनसीटीसीला अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. राज्यांची परवानगी न घेता चौकशीचे व अटकेचे अधिकार एनसीटीसीला आहेत. यामुळे राज्यातील सुरक्षा यंत्रणेवरील आपला अधिकार जाईल, अशी भीती काही मुख्यमंत्र्यांना वाटते. पक्षीय व प्रादेशिक हितसंबंधांना प्राधान्य देण्याच्या राजकारणामुळे ‘केंद्र विरुद्ध राज्य’ असे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेससह सर्व पक्षांनी या संकुचितवादाला सोडचिठ्ठी दिली तरच ही परिस्थिती बदलू शकेल
दहशतवाद्यांनी भारतात घुसण्यासाठी नेपाळ , बांगलादेशातून नवीन मार्ग शोधले
दहशतवाद्यांनी भारतात घुसण्यासाठी नेपाळ व बांगलादेशातून नवनवीन मार्ग शोधून काढले असून, भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमा तेवढ्याच धगधगत्या आहेत. 2011 हे वर्ष सीमावर्ती राज्यांतील दहशतवादाचे प्रमाण तुलनेने कमी झाल्याचे होते; तरीही दहशतवाद्यांनी आपल्या क्षमता वाढविण्यासाठी ज्या आधुनिक शस्त्रांचा सहारा घेतलेला दिसतो, ती चिंताजनक बाब आहे. जुलै 2011 मध्ये मुंबईत झालेले बॉंबस्फोट व पाठोपाठ सप्टेंबरमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वाराशी झालेल्या स्फोटांतील संशयित दहशतवादी हे भारतीय नागरिकच आहेत. त्यांची पार्श्‍वभूमीही गुन्हेगारी नाही.भारतातील प्रत्येक राज्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यांचा धोका कायम आहे. दहशतवादी राज्या-राज्यांच्या सीमा जाणत नाहीत; केंद्र व राज्य सरकारांच्या अधिकारक्षेत्रांशीही त्यांना देणे-घेणे नाही. हल्ले करून समाजातील शांतता भंग करणे, हाच त्यांचा एकमेव उद्देश असतो. त्यामुळे यापुढील काळातही त्यांच्याशी लढताना केंद्र व राज्यांना एकदिलानेच मुकाबला करावा लागणार आहे. अद्याप राज्यांतील पोलिस दलांमध्ये पाच लाख एक हजार 69 रिक्त जागा भरण्याचे आव्हानही आपल्यासमोर आहे.
ईशान्य राज्यांतील अनेक बंडखोर गटांनी सरकारशी चर्चेची तयारी दाखविली आहे.2011 मधे देशाच्या पश्‍चिम सीमेवर घुसखोरीचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. अक्षरशः दर आठवड्याला तेथे घुसखोरीच्या घटना घडतात. आता तर अतिरेक्‍यांनी बांगलादेश व नेपाळमधील नवनवीन मार्गही भारतात घुसण्यासाठी शोधून काढल्याचे आढळले आहे. दहशतवाद्यांच्या आव्हानाशी मुकाबला करण्यासाठी केंद्र व राज्यांतील परस्पर समन्वय हा ठोस उपाय ठरेल.
निधी पूर्ण वापरा
” केंद्राने पोलिस दलांच्या आधुनिकीकरणासाठी एक हजार 111 कोटी रुपये 2011-12 साठी मंजूर केले होते. मात्र, काही राज्यांनी निधीचा वापरच केला नाही. परिणामी, 311 कोटी रुपये निधी वापराविना पडून राहिला. या निधीचा विनियोग होऊ शकला नाही. सध्याच्या वर्षासाठीही केंद्राने 900 कोटी रुपये याच कारणासाठी मंजूर केले आहेत, दहशतवाद रोखण्यास राज्यांची यंत्रणा अपुरी पडते. त्यादृष्टीने एनसीटीसी हे महत्त्वपूर्ण पाऊल असून राज्य व केंद्राच्या संयुक्त प्रयत्नांतूनच दहशतवादावर मात करता येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. अशा परिस्थितीतही केंद व राज्य सरकारांनी संयुक्त मोहिमा राबवून दहशतवाद्यांचे गट उद्ध्वस्त केले पाहिजे .दर आठवड्याला घुसखोर विविध मार्गांनी देशात घुसण्याचा प्रयत्न करून दहशतवाद पसरवतात. २०११मध्ये मुंबईत व दिल्ली हायकोर्टाच्या आवारात दोन मोठे दहशतवादी हल्ले झाले, दोन्हींचे संशयित सूत्रधार भारतीय नागरिक आहेत.

अशा स्फोटक वातावरणात सुदैवाने केंद्र व राज्य सरकारच्या यंत्रणांमधे संघर्ष व्हायला नको., २०११मध्ये दहशतवाद्यांचे १८ गट तर २०१२मध्ये आजवर तीन गट (sleeper cells) उद्ध्वस्त केले आहेत. दहशतवादी कारवायांसाठी गतवर्षी ५३ तर चालू वर्षात आजवर ११ संशयितांना अटक केली आहे .राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) विभागीय कार्यालये मुंबई, कोची आणि लखनऊत सुरू होणार आहेत.
नक्षलवाद, संघटीत गुन्हेगारी, तस्करी ही मोठी आव्हाने 
देशाची अंतर्गत सुरक्षा आणि बाह्य सुरक्षा या दोन्हीचा वेगवेगळा विचार करुन चालणार नाही. सशस्त्र दल हे घुसखोरी आणि दहशतवाद विरोधी मोहिमेत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. याचा देशांतर्गत अंतर्गत सुरक्षेशी जवळचा संबंध आहे. लष्करासंबंधीचा कोणताही वाद हा देशांतर्गत सुरक्षेवर विपरित परिणाम करत असतो. नक्षलवाद, संघटीत गुन्हेगारी, तस्करी ही मोठी आव्हाने देशापुढे आहेत. मात्र केंद्र आणि राज्यं यांच्या पातळीवर उत्तम समन्वय ठेवला तर या आव्हानांचा सामना नक्कीच करता येईल . नेपाळ तसेच बांगलादेश सीमेवरुन होणारी घुसखोरी आणि तस्करी हा चिंतेचा विषय आहे.

जुलै २००१ मध्ये मुंबईत तर सप्टेंबर २०११ मध्ये दिल्लीत दहशतवादी हल्ले झाले. या दोन्ही घातपातांशी संबंधित अनेक व्यक्ती या आयुष्यात पहिल्यांदाच गुन्हेगारी स्वरुपाची कृती करताना आढळल्या आहेत. मात्र त्यांनी केलेली अतिशय गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्याला सहाय्यक ठरली आहे. हा एक नवा पण काळजी वाढवणारा ट्रेंड आहे. २०११ मध्ये ५३ जणांना अटक करुन दहशतवाद्यांचे ११ मॉड्युल्ड उद्ध्वस्त केले आणि २०१२ च्या पहिल्या तीन महिन्यात ११ जणांना अटक करुन दहशतवाद्यांचे आणखी तीन मॉड्युल्ड उद्ध्वस्त केले. आसाम हे दहशतवाद्यांचे नवे माहेर बनत आहे. सतत सतर्क राहून तसेच केंद्र-राज्यं पातळीवर उत्तम समन्वय राखून या आव्हानांचा सामना करता येईल.

नक्षलवादाचा प्रश्‍न
नक्षलवादाचा विषय जेव्हा केव्हा चर्चेला येतो तेव्हा त्या समस्येकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे ही चर्चा सातत्याने होत राहते. राज्य सरकारच्या पोलीस यंत्रणेच्या काही मर्यादा असतात आणि त्यामुळे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि अतिरिक्त मनुष्यबळ यासाठी नेहमीच राज्यांना केंद्राकडे डोळे लावून बसावे लागते. मग केंद्र सरकार राज्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना मनुष्यबळ पुरविते. याचदरम्यान नक्षलवाद हा एकट्या राज्याचा विषय नाही आणि त्यासाठी त्रस्त सर्व राज्यांनी एकत्रित येऊन ही समस्या सोडविली पाहिजे असा युक्तिवाद केला जातो. बहुराज्यीय सुरक्षा दले एकत्र येऊन जेव्हा अशी फौज केली जाते तेव्हाही मतभेद होतातच आणि माओवाद्यांच्या मदतीने निवडून आलेली सरकारे असे ऑपरेशन थांबविण्याची मागणी करतात. राज्यांनी एखादी समस्या सोडविण्यासाठी एकत्र येणे ही काही नवीन बाब नाही. दिल्लीत नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा दहशतवादविरोधात कठोर कायदा करण्याची गरज सरकारला भासली. दहशतवादविरोधात पोटा हा कायदा रालोआ सरकारने तयार केला होता. हा कायदा संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने सत्तेत येताच रद्द केला. आज कसाब आणि अफझलगुरू यांना फाशी होत नाही. उलट त्यांची कारागृहात किती बडदस्त ठेवली जाते. इतक्या सर्व संस्था अस्तित्वात असताना सुरक्षेचे इतके विकेंद्रीकरण खरोखरच आवश्यक आहे काय? हेही एकदा तपासून पाहिले पाहिजे.
ईशान्य हिंदुस्थानातील बंडखोरी, कश्मीरमधील बंडखोरी, नक्षलवादाची समस्या, परकीय राष्ट्रांच्या चिथावणीने बळावत चाललेला दहशतवाद अशी वेगवेगळी सुरक्षा आव्हाने आहेत. यासाठी बळकट अशी गुप्तचर व तपास यंत्रणा, कारवाई यंत्रणा, साधनसामग्री मिळविणारी यंत्रणा सुरक्षा खात्यांतर्गत निर्माण करावी लागणार आहे. या सर्व यंत्रणांमध्ये सुसूत्रता असणे आवश्यक आहे.
सीबीआय, आयबी, एनआयए, रॉ यांना का सक्षम करत नाही?
देशावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शासन सध्या आस्तत्वात असलेल्या संस्थांना सक्षम करण्याचे जाहीर करते, त्यासाठी समित्या नेमते, समित्या अहवाल देतात, पण अंमलबजावणी शून्य. त्याची चर्चा पुन्हा दुसरा दहशतवादी हल्ला झाल्यावरच होणार. राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राचेही असेच होणार असेल तर त्याची गरजच काय? यांना आपण का सक्षम करत नाही. त्यांना आधुनिक तंत्रज्ञान असलेली उपकरणे, वाहतूक तसेच शस्त्र का पुरवले जात नाही? ज्या संस्था आस्तत्वात आहेत त्यांनाच जर आपण सक्षम करू शकत नसू तर त्यात आणखी एका संस्थेची भर घालण्याची आवश्यकताच काय?

जर दहशतवादाची पाळेमुळेच उपटून काढायची असतील तर त्यासाठी शासनाचे पाहुणे झालेले अफझलगुरू, कसाब यांना फासावर देण्याची गरज आहे. आपण दहशतवादी व त्यांना छुपी मदत करणार्‍यांना महत्त्वाचा संदेश तर देऊच. त्यानंतर इंडियन मुजाहिदीन,, सिमी यांसारख्या राष्ट्रविरोधी संघटनांचे कार्यकर्ते जे नाव बदलून काम करत असतील तर त्यांना शोधून जबर शिक्षा करावी लागेल. त्यांचे देशभर पसरलेले जाळे नष्ट करावे लागेल. आपल्या देशातील काही संघटनांना विदेशातून येणार्‍या मदतीचा शोध घेतला पाहिजे. मदतीच्या नावाखाली तरुणांना दहशतवादी बनवणार्‍या संस्थांना पैसा पुरवण्याचे काम होत असेल तर त्यांचा शोध घेऊन त्यांना नष्ट केले पाहिजे. जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी प्रशिक्षण अड्डे मुळापासून उद्ध्वस्त केले पाहिजेत, पण हे सर्व करताना पक्षाची व्होट बँक हातची जाईल असा विचार करून या गोष्टींकडे कानाडोळा केल्यास दहशतवादी कृत्यांना अप्रत्यक्षपणे खतपाणी घालण्याचेच देशविघातक कार्य होईल. धार्मिक भावना भडकावणार्‍या राजकारणी लोकांना कडक शासन केले पाहिजे तर आणि तरच दहशतवाद मुळापासून संपुष्टात येईल अन्यथा दहशतवादाचे झाड मुळापासून उपटून काढण्याऐवजी आपण फक्त शहीदांची संख्याच मोजत बसू.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..