चार वर्षांपूर्वी वाराणसी येथील संकटमोचन हनुमान मंदिरात बॉम्बस्फोटांची मालिका घडवल्यानंतर अतिरेक्यांनी पुन्हा एकदा वाराणसीला लक्ष्य केले. यावेळी दशाश्वमेध घाटावर गंगा आरती सुरू असताना इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्यांनी स्फोट घडवून आणला. हा बॉम्बस्फोट झाल्यानंतर तोपर्यंत सुस्त असलेले प्रशासन खडबडून जागे झाले. या बॉम्बस्फोटांमधून तरी प्रशासन काही धडा घेणार का हा प्रश्न आहे.पुण्यात झालेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटानंतर दहशतवादी हल्ला न झाल्याने भारतीय नागरिक सुखावले होते. सुरक्षा व्यवस्थेतही काहीशी ढिलाई आली होती. नेमका याचाच फायदा घेऊन अतिरेक्यांनी वाराणसी येथील शितला घाटावर बॉम्बस्फोट घडवून आणला. हा स्फोट कमी तीव्रतेचा असल्याने मोठी जिवीतहानी झाली नाही. पण, त्यात एका बालिकेचा बळी गेला आणि तीसहून अधिक लोक जखमी झाले. अतिरेक्यांनी या स्फोटाची तयारी किमान काही महिने आधीपासून केली असावी. कारण असा बेत तडीस न्यायचा असेल तर जागेची पाहणी करून बॉम्ब ठेवण्याची नेमकी जागा हेरावी लागते. तसेच बॉम्ब तयार करणे, तो बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी घेऊन जाणे आणि शेवटी स्फोट घडवून आणणे ही प्रक्रिया झटक्यात पूर्ण होत नाही. अशा बॉम्बस्फोटाची कल्पना आपल्या गुप्तहेर खात्याला येऊ नये यातच या खात्याचे अपयश दडले आहे.शितला घाटावर गंगेची आरती सुरू असल्याने स्फोटाच्या वेळी तिथे किमान 700 ते 800 भाविक हजर होते. या ठिकाणी अधिक तीव्रतेचा स्फोट झाला असता तर मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी झाली असती. तसेच स्फोटानंतर चेंगराचेंगरी होऊन त्यातही काहींचे बळी गेले असते. सुदैवाने फार मोठी दुर्घटना झाली नाही. पण, असे हल्ले झाल्याने नागरिकांचा देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होऊ लागतो. देशात कोणताही दहशतवादी हल्ला झाला की, संबंधित संघटनेला पाकिस्ता स
कार आणि इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स यांच्याकडून मदत मिळते हे सत्य आता सर्व जगाला माहीत झाले आहे. वाराणसीमधील बॉम्बस्फोटानंतर एका वृत्तवाहिनीला इंडियन
मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेकडून ई-मेल मिळाला. त्यात या बॉम्बस्फोटाची जबाबदारी इंडियन मुजाहिदीन घेत असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे बॉम्बस्फोटाची जबाबदारी इंडियन मुजाहिदीनने घेतली असली तरी या मुद्यावरून उत्तर प्रदेश राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात स्फोट टाळण्याच्या जबाबदारीवरून वाद सुरू झाला आहे. वाराणसीमध्ये असा हल्ला होऊ शकतो याची माहिती फेब्रुवारीमध्येच उत्तर प्रदेश सरकारला दिली असल्याचे गृहमंत्री चिदंबरम् यांचे म्हणणे आहे तर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी केंद्र सरकारने उपाय योजता येतील अशी माहिती दिली नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, इंडियन मुजाहिदीनने पाठवलेला ई-मेल नवी मुंबईतून पाठवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. हा ई-मेल पाठवण्यासाठी मुंबईतील डीजे अखिल तलरेजा याचे वायफाय कनेक्शन हॅक करण्यात आले होते. यापूर्वीही अहमदाबाद येथील बॉम्बस्फोटानंतर मुंबईत राहणार्या एका व्यक्तीचे वायफाय कनेक्शन हॅक करून एका वृत्तवाहिनीला मेल पाठवण्यात आला होता. त्यामुळे आता वायफाय कनेक्शनच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी सॉफ्टवेअर कंपन्यांना वायफायमधील त्रुटी दूर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.सध्या पाकिस्तानमध्ये लपून बसलेले रियाज आणि इक्बाल हे भटकळबंधू या स्फोटाचे सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे. इंडियन मुजाहिदीनच्या स्थापनेतही भटकळबधूंचा हात होता. आता ही अतिरेकी संघटना देशभरात आणखी बॉम्बहल्ले करण्याची योजना आखत असल्याचे बोलले जाते. फेब्रुवारीमध्ये शाहजाद अहमद या इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्याला अटक करण्यात आ
ी होती आणि त्याची चौकशी केली असता दशाश्वमेध घाट आणि जर्मन बेकरी अतिरेक्यांच्या रडारवर असल्याचे निष्पन्न झाले होते. हीच माहिती केंद्रीय गृहखात्याने उत्तर प्रदेश सरकारला दिली होती. 6 डिसेंबर या दिवशीच अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली होती. म्हणून इंडियन मुजाहिदीनला या दिवशीच वाराणसीमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणायचा होता. वृत्तवाहिनीला आलेल्या ई-मेलवर 6 डिसेंबर अशीच तारीख आहे. परंतु, काही कारणांमुळे हा स्फोट एक दिवस पुढे ढकलावा लागला असावा असे वाटते. इंडियन मुजाहिदीनकडून आलेल्या ई-मेलमध्ये वाराणसीचा उल्लेख नसल्याने ती आधीच तयार करून ठेवली असावी आणि प्रत्येक स्फोटाच्या वेळी त्यात तारीख बदलून पाठवता यावा अशी सोय केली असावी असा अंदाज बांधता येतो. म्हणजेच या पुढील काळात आणखी काही ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची इंडियन मुजाहिदीनची योजना असल्याचा संदेश मिळतो. या संदेशावरून आपण काय धडा घेतो आणि पुढील बॉम्बस्फोट टाळू शकतो का हे महत्त्वाचे ठरणार आहे. यापुढे तरी सरकारने (राज्य आणि केंद्र) कोणताही पूर्वसंदेश गांभीर्याने घेऊन त्याविरुद्ध ‘फुलप्रूफ’ योजना तयार ठेवायला हवी. तरच आपण अतिरेक्यांचे मनसुबे उधळून लावण्यात यशस्वी ठरू.गुप्तहेर खाते अधिक सक्षम हवे : मेजर जनरल शशिकांत पित्रे (निवृत्त)
वाराणसी येथील शितला घाटावर गंगा आरतीच्या वेळी झालेला बॉम्बस्फोट इंडियन मुजाहिदीन या संघटनेने घडवून आणल्याचे स्पष्ट झाले. बाबरी मशीद-राम मंदिर वादात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने दिलेल्या निर्णयाने समाधान न झाल्याने या संघटनेने हा बॉम्ब स्फोट घडवला असल्याचे दिसून येते. या बॉम्बस्फोटासाठी वाराणसी हे ठिकाण निवडण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हिदुंचे हे तीर्थक्षेत्र अयोध्येपासून जवळ आहे तसेच या ठिकाणी अनेक परदेशी पर्यटक असतात. तिथे भाविकांची गर्दीही असते. या बॉम्बस्फोटात अधिकाधिक हानी व्हावी असा दहशतवाद्यांचा उद्देश नसावा. या स्फोटानंतर प्रसिद्धीमाध्यमांद्वारे प्रसिद्धी मिळवून आपले म्हणणे सर्वांसमोर मांडणे हाच त्यातील मुख्य हेतू असावा असे वाटते. अधिकाधिक हानी करण्याचा इंडियन मुजाहिदीनचा विचार असता तर त्यांनी अधिक तीव्रतेचा बॉम्बस्फोट केला असता, पण बॉम्ब तयार करणे आणि हाताळण्याच्या दृष्टीने अधिक तीव्रतेची स्फोटकेच धोकादायक असतात. त्यामुळेही त्यांनी कमी तीव्रतेचा स्फोट घडवून आणला असावा. देशात कुठेही स्फोट झाला तरी आपण पोलिसांपासून सरकारपर्यंत सर्वांना दोष देतो. पण, एवढ्या मोठ्या देशात गर्दीच्या ठिकाणी छोटासा बॉम्ब घेऊन जाणे अशक्य नसते. तसेच स्फोट
घडवून आणणे हे फार शौर्याचे किंवा खूप अवघड काम नाही. असे असले तरी असे स्फोट घडणार असल्याची माहिती मिळवण्यात आपले गुप्तहेर खाते अयशस्वी ठरले असे म्हणण्यास जागा आहे.
इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेत सुशिक्षित मुस्लिम तरुणांचा भरणा आहे. देशात बाबरी मशीद पाडण्या सारख्या घडलेल्या घटनांचे निमित्त करून अशा तरुणांना फूस लावली जाते आणि त्यांच्याकडून देशविघातक कारवाया करवून घेतल्या जातात. पण म्हणून देशात घडणार्या प्रत्येक बॉम्बस्फोटानंतर पाकिस्तानकडे बोट दाखवणे योग्य नाही. असे बॉम्बस्फोट घडवून आणणार्यांना पाकिस्तानकडून मदत मिळते हे खरे असले तरी केवळ पाकिस्तानी मदतीवर स्फोट आणि दहशतवादी हल्ल्याच्या बेतांची काटेकोर अंमलबजावणी करणे शक्य नाही. या गोष्टींसाठी त्यांना काही स्थानिकांचा पाठिंबा मिळतो हे नाकारून चालणार नाही. माझ्या मते दहशतवाद्यांचे दोन मुख्य हेतू असतात. पहिला हेतू खरोखरच सर्वसामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण करणे तर, दुसरा हेतू प्रसिद्धी मिळवून आपले म्हणणे मांडण्याची संधी घेणे. शांततेच्या मार्गाने आपले म्हणणे मांडू न शकणार्या संघटना दहशतवादाचा आधार घेत असतात. दहशतवाद्यांचा दुसरा हेतू साध्य करण्यासाठी आपल्याकडीलच नव्हे तर जगभरातील प्रसिद्धीमाध्यमे एका पायावर तयार असतात. कोणताही दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तेथील ‘आँखो देखा हाल’ सर्वप्रथम प्रेक्षकांना दाखवण्यासाठी प्रसिद्धीमाध्यमांमध्ये चढाओढ लागते. सर्व प्रसिद्धीमाध्यमे बंद केली तर दहशतवादही बंद होऊ शकेल. अर्थात, हा तोडगा व्यवहार्य नाही आणि प्रत्यक्षात आणणेही शक्य नाही. त्यामुळे यापुढील काळात असे हल्ले होऊ नयेत यासाठी गुप्तहेरखाते अधिक सक्षम करणे महत्त्वाचे आहे.
(अद्वैत फीचर्स)
— महेश धर्माधिकारी
Leave a Reply