” शरीर साक्षात परमेश्वर , सैतान सुध्दा “ हा जीवनविद्येचा सिध्दांत वाचून वाचकांच्या भुवया निश्चित उंचावतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे . ह्याचे मुख्य कारण असे की , शरीराबद्दल आपण आतापर्यंत जे वाचत आलो , ऐकत आलो व सांगत आलो , त्यापेक्षा हा सिध्दांत आगळा आणि वेगळा आहे .
शरीर हे नाशवंत आहे , असार आहे , मिथ्या आहे , टाकाऊ आहे वगैरे , अशा शब्दात शरीराची निंदा – नालस्ती करण्यात येते . याचा दृश्य परिणाम असा झाला की , मानवी शरीराकडे पहाण्याची दृष्टी विकृत झाली .
शरीराला ताप दिल्याशिवाय किंवा त्रास दिल्याशिवाय देव प्रसन्न होत नाही असा आणखीन एक गैरसमज निर्माण झाला .
तीर्थयात्रा करणे , व्रतवैकल्ये करणे , उपास-तापास करणे , देहदंडन करणे , अनवाणी प्रदक्षिणा घालणे किंवा देवाच्या दर्शनाला जाणे वगैरे , शरीराला ताप देणारे प्रकार , *’ तप किंवा तपश्चर्या ‘* या नावाखाली प्रचलित झाले .
जीवनविद्येला हा प्रकार मान्य नाही . वर म्हटल्याप्रमाणे मानवी शरीराकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकृत झाल्यामुळे त्याचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टिकोनच विकृत झाला .
शरीराची काळजी न घेणे , शरीराकडे दुर्लक्ष करणे , संसाराकडे व मुलाबाळांकडे लक्ष न देणे व संसारातील सर्व गोष्टी दैवाधीन आहेत अशा भावनेने प्रयत्नवादाला सोडचिठ्ठी देणे , वगैरे गोष्टी केल्या म्हणजे आपण देवाचे मोठे भक्त झालो , असा भ्रम त्याच्या ठिकाणी निर्माण झाला .
त्याचप्रमाणे जन्म – मरणातून सुटका म्हणजे मोक्ष व हा मोक्ष प्राप्त करुन घेण्यासाठी एकांतात जाणे , वैराग्याची कास धरणे , आधिभौतिक प्रगतीकडे दुर्लक्ष करणे , साधू , बैरागी किंवा संन्यासी होणे वगैरे गोष्टी करण्यात , देव , धर्म , उपासना व जीवनाची सार्थकता आहे , अशी लोकांची धारणा होऊन बसली .
देहाकडे , संसाराकडे व जीवनाकडे पहाण्याचा दृष्टिकोन असा विकृत झाल्यामुळे , आधिभौतिक प्रगतीकडे , सामाजिक जीवनाकडे व राष्ट्रहिताकडे लोकांचे संपुर्ण दुर्लक्ष झाले. परकीय आक्रमणाला आपण यशस्वीपणे तोंड देऊ शकलो नाही व गुलामगिरीच्या बंधनात शेकडो वर्षे जखडून पडलो , त्याची जी अनेक कारणे आहेत , त्यापैकी एक मुख्य कारण म्हणजे शरीराकडे व जीवनाकडे पाहण्याचा वरील विकृत दृष्टिकोन हाच होय .
— सदगुरु श्री वामनराव पै .
संदर्भ ग्रंथ :- शरीर साक्षात परमेश्वर , सैतान सुध्दा .
Leave a Reply