आज आपल्या देशात भ्रष्टाचार माजलेला आहे. राज्यकर्ते पैश्यामागे धावताना दिसत आहे. प्रजेला न्याय मिळत नाही. त्या मुळे देशात अराजकता माजते आहे. प्रजा संभ्रमात आहे की कुणास वोट द्यावे, प्रत्येक झाडावर कावळाच बसलेला आहे. पण आजही न्यायपथावर चालणारे लोक आहेत. न्यायाचा बाजूनी लढनार्यास समर्थन देण ही काळाची गरज आहे. लहानपणी ऐकलेली विक्रमादित्याची कहाणी आठवली. आज आपल्याला विक्रमादित्या सारखा राजा पाहिजे. एके काळी विक्रमादित्य नावाचा राजा अवंती नगरीवर राज्य करीत होता.आपल्या न्यायसाठी तो तिन्ही लोकात प्रसिद्ध होता. एके दिवशी रात्रीच्या वेळी नेहमीप्रमाणे वेश पालटून, राजा विक्रमादित्य आपल्या प्रजेचा हालचाल पाह्यला राजमहालातून बाहेर पडला. मध्यरात्रीच्या वेळी अवंती नगरीच्या वेशीवर त्याला तीन सुंदर स्त्रिया नगरी बाहेर जाताना दिसल्या. नगरी कडे पाहत त्या सारख्या रडत होत्या. विक्रमादियाला प्रश्न पडला – मध्यरात्रीची वेळ तीन सुंदर स्त्रिया नगराच्या वेशीवर अश्या का रडतात आहे? विक्रमाने त्या स्त्रियांना विचारले – बायानो तुम्ही कोण आहात? तुम्हाला भीती नाही वाटत का? अशा मध्यरात्रीच्या वेळी तुम्ही कुठे निघाला आणि तुम्ही अश्या रडतात का? त्यातली एक स्त्री म्हणाली – विक्रमा- पुष्कळवर्षापर्यंत आम्ही या नगरीत निवास केला. पण नियतीच्या नियमांमुळे आम्हाला ही नगरी सोडावी लागते आहे. नगरी सोडताना होणार्या दु:खा मुळे आम्हाला रडू येत आहे. मी या नगरीची श्रीलक्ष्मी आहे, दुसरी विद्येची देवता आहे आणि तिसरी न्याय देवता आहे. विक्रमादित्याने विचारले – महाकाल साक्षी आहे मी प्रजेच्या भल्या शिवाय कधी दुसरा कुठलाही विचार चुकुनही केला नाही. माझ्या हातून असा काय गुन्हा घडला की तुम्ही ही नगरी सोडून जात आहात. श्रीलक्ष्मी म्हणाली राजा- नियती पुढे आम्ही विवश आहोत. पण तू आम्हाला बाहेर जाताना बघितले आहे. तू विनंती केली तर आमच्या पैकी कुणी एक इथेच वास्तव्य करेल. अन्य दोन्ही नगरी सोडून जातील.
राजा विक्रमाने विचार केला. श्रीलक्ष्मी गेली तरी चालेल. गरिबीतही लोक आनंदाने राहतात. विद्या विना ही प्रजा जगू शकते. पण न्यायाविना राज्यात अराजकता माजेल. अवंती नगरी उद्वस्त होईल. राजा विनम्रतेने श्रीलक्ष्मीस म्हणाला – न्याय देवता नगरीत राहावी ही विनंती आहे. बाकी तुम्ही दोघी जाऊ शकतात. श्रीलक्ष्मी म्हणाली – राजा आम्ही तुझी परीक्षा घेत होतो. तू त्यात उतीर्ण झाला. ज्या राज्यात न्याय असेल तिथे लक्ष्मी आणि सरस्वतीला निवास हा करावाच लागतो. जो पर्यंत तू अवंतीचा राजा आहे आम्ही तिघीही या नगरीतच निवास करणार. तुझे कल्याण असो -असे म्हणत त्या तिघी अदृश्य झाल्या. राजा विक्रमादित्याचा न्यायपूर्ण शासनामुळे अवंतीनगरी त्या काळी तिन्ही लोकात प्रसिद्ध झाली.
— विवेक पटाईत
Leave a Reply