नवीन लेखन...

विदेशींना मोत्याचा चारा, देशींना मात्र सडका घास!

हा देश महान करायचा असेल तर आधी या देशाची अस्मिता जागृत करावी लागेल, ज्या वस्तुंचे, पिकांचे उत्पादन या देशात होते, अशा सगळ्याच वस्तुंच्या आयातीवर बंदी घालावी लागेल, संसदेपासून ते प्राथमिक शाळेपर्यंत सगळीकडे इंग्रजीला कायम तृतीय किंवा त्याही खालचे स्थान द्यावे लागेल, क्रिकेटसहीत सगळ्या विदेशी खेळांची हकालपट्टी करावी लागेल आणि

त्यासाठी आधी आपल्या मनात खोलवर रूजलेली गुलामीची पाळेमुळे निखंदून काढावी लागतील.

स्वत्वाची जाणीव आणि अभिमान नसणे हा या देशाला अगदी प्राचीन काळापासून लाभलेला शाप आहे. या देशातील लोकांना कायम विदेशी भूमीवरील लोकांचे आकर्षण वाटत आले आहे. हे प्रेम आकर्षण वाटण्यापुरते मर्यादित असते तर कदाचित समजून घेता आले असते; परंतु हे प्रेम आकर्षणाच्याही पलीकडे जाऊन त्यांच्या गुलामगिरीत धन्यता मानत आले आहे. या मागची नेमकी कारणे शोधून काढण्याची जबाबदारी समाजशास्त्रज्ञांची असली आणि त्यांनी ती कारणे शोधून काढली तरी ते वस्तुस्थितीत बदल करू शकणार नाहीत. विदेशी आक्रमकांनी या देशावर हल्ले केले, इथे सत्ता स्थापन केली, इथल्या लोकांना त्यांनी गुलामासारखे वागविले; परंतु ही गुलामी उलथून टाकण्यासाठी निकराचे प्रयत्न इथे झालेच नाहीत. दोन-चार अपवादात्मक उदाहरणे सोडली तर बहुतेक वेळा इथल्या लोकांनी आपल्या भाग्याला दूषण देत परकियांची गुलामी स्वीकारलेली दिसते. पुढे चालून गुलामीची ही मानसिकता इतकी प्रबळ होत गेली, की परकीय सत्ताधिशांचे इथल्या लोकांना कौतुक वाटू लागले.

खूप आधीच्या काळात शक, हुण, ग्रीक आदी परकियांनी भारतावर आक्रमण केले, इथे सत्ता स्थापन केली आणि आमची उदारता एवढी, की आम्ही त्यांना आपल्यात सामावून घेतले. नंतरच्या काळात मोगलांनी भारतावर आक्रमण केले, ते इथे स्थिर झाले आणि आमच्या लोकांनी “खुल्क खुदा का, मुल्क बादशाह का” म्हणत त्यांचेही वर्चस्व स्वीकारले. महाराणा प्रतापांसारख्या मोजक्या लढवय्यांचा अपवाद वगळला तर अत्यंत शूर समजल्या जाणार्‍या अनेक राजपूत सरदारांनीही नंतर नाईलाजाने मोगलांची चाकरी करण्यातच आयुष्य घालविले. मराठे सरदारदेखील कधी कुतूबशाहीची, कधी निजामशाहीची तर कधी आदिलशाहीची चाकरी करत होते. मराठ्यांमध्ये स्वत्वाची आणि स्वाभिमानाची ज्योत प्रज्ज्वलित केली ती शिवाजी महाराजांनी. त्यांनी छोट्या-मोठ्या पातशहांना पाणी पाजत थेट दिल्लीच्या प्रबळ सत्ताधीश मोगलांनाच आव्हान दिले. त्यांच्या नाकावर टिच्चून स्वराज्य उभे केले, स्वत:ला राज्याभिषेक करवून एक सार्वभौम राजा म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. शिवाजी महाराजांच्या पश्चात पुन्हा एकदा आपल्या मानसिक गुलामीने उचल खाल्ली आणि दिल्लीचे तख्त फोडून दिल्लीवर भगवा फडकविण्याची संधी मिळाली, तेव्हा या जर्जर बादशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी पेशव्यांच्या काळात मराठे सरदारांनी स्वीकारली. आपण या देशाचे राजे होऊ शकत नाही, आपण बादशाह होऊ शकत नाही, ही मानसिकता अगदी खोलवर रूजल्यामुळेच असे झाले होते. आजही परिस्थिती बदललेली नाही. मुघलानंतर इंग्रजांनी या देशावर राज्य केले. मूठभर इंग्रजांनी हा खंडप्राय देश आपल्या गुलामीत कसा आणला आणि पुढचे दीडशे वर्षे ते कसे काय राज्य करू शकले, हे एक लाजिरवाणे गुढ आहे. इथल्या लोकांच्या मनात खोलवर कुठेतरी कुण्या तरी परक्या सत्ताधिशांच्या समोर लवून मुजरा करण्याची जी मानसिकता मुरली आहे, ती आजही काय
म आहे. आज कुणी परकीय इथे सत्तेवर नाहीत; परंतु इथे सत्तेवर असलेल्या स्वकीयांचे त्याच गुलामीच्या मानसिकतेतून रूजलेले परकीय प्रेम कायम आहे. केवळ सत्ताधाऱ्यांच्याच नव्हे तर सर्वसामान्य लोकांच्याही मनावर आजही गोऱ्या टोपीकरांची मोहनी कायम आहे.

क्रिकेट सारख्या भिकारड्या खेळाला या देशात इतके महत्त्व असण्याचे कारणच काय? हा खेळ आपला नाही. इंग्रजांचा तो खेळ, त्यांनी इथे आणला आणि आज इंग्लंडपेक्षा भारतातच त्याची लोकप्रियता प्रचंड झाली आहे. इथे प्रत्येक शहरात क्रिकेटची मैदाने आहेत, क्लब आहेत; परंतु हॉकीसारख्या राष्ट्रीय खेळाला कुठेच स्थान नाही. एखाद्या देशाच्या राष्ट्रीय खेळालाच त्या देशात स्थान नसावे आणि विदेशी खेळ मात्र प्रचंड लोकप्रिय असावा, असे एकमेव उदाहरण केवळ भारतात पाहायला मिळते. कुस्ती, मल्लखांब, कबड्डी सारखे खेळ तर केवळ देशी असल्यामुळेच हद्दपार झाले आहेत. आता तर काय त्या फार्म्यूला वनचे फॅड भारतात येऊ पाहत आहे. केवळ खेळाच्याच बाबतीत असे नाही तर प्रत्येक देशी गोष्टीच्या नशिबी हेच भोग आहेत. आमच्या देशी गाईला कुणी विचारत नाही. कौतुक केवळ विदेशी, संकरीत गाइंर्चे! देशी गाइंर्ना धड चारा खायला मिळत नाही आणि या विदेशी संकरीत गाइंर्साठी कुलर वगैरे लावण्याप्रत आमचे प्रेम उतू जाते. देशी गाइंर्साठी गायराने नाहीत, असली तरी त्यात केवळ गाजर गवत माजलेले असते; पौष्टिक चारा तर बिचारीला सणासुदीलाही मिळत नाही, तरी सुद्धा बिचारी आपल्या मालकाचे पोट भरण्याइतपत दुध त्याला देत असते. या विदेशी संकरीत गाइंर्ना एकदा आपल्या गायरानात चरायला सोडा, इथल्या उन्हात त्यांना तापू द्या आणि मग त्या किती दूध देतात किंवा दूध देणे तर दूर राहिले, जगतातच की नाही, ते पाहा! ही वस्तुस्थिती माहीत असूनही आमचे प्रेम विदेशी गाइंर्वरच, त्यांचेच कोडकौतुक अधिक!

देशी कुत्र्यांचेही नशीब असेच फुटके आहे. रस्त्यावर झोपणारी, बेवारस, भटकी म्हणून त्यांचा द्वेष केला जातो. मालकाने केवळ चतकोर भाकरी समोर टाकली आणि प्रेमाने अंगावरून हात फिरविला, तर जीव गेला, तरी मालकाशी कधी बेईमानी न करणारा देशी कुत्रा आज सगळीकडे झिडकारल्या जात आहे. आम्हाला कौतुक गोबऱ्या अंगाच्या किंवा शरीरावर चित्रविचित्र डिझाईन असलेल्या किंवा लांब शेपूट किंवा कान असलेल्या किंवा नसलेल्या कधी केसाळ तर कधी चोपड्या विदेशी कुत्र्यांचे; त्यांच्या गळ्याला साखळी बांधून त्यांच्या सोबत फिरायला जाणे आमच्यासाठी किती भूषणावह असते. पन्नास हजारांपासून ते लाखापर्यंत या विदेशी कुत्र्यांच्या किमती असतात, तरी ते विकत

घेतले जातात. त्यांना आवडेल ते खायला दिले जाते, त्यांना उन्हाचा, थंडीचा त्रास होऊ नये म्हणून खास व्यवस्था केली जाते, `बिवेअर ऑफ डॉग’ अशा पाट्या फाटकावर लावून आम्ही विदेशी कुत्रे पाळले आहेत, याची जाहिरात केली जाते आणि देशी कुत्रे मात्र गल्लीबोळात, नाल्यांमध्ये, उकिरड्यावर काही खायला मिळते का म्हणून वणवण भटकत असतात. कुत्री पाळायचा इतकाच शौक आहे तर देशी कुत्री का नाही पाळत? कारण स्पष्ट आहे, आम्ही विदेशी कुत्रा पाळतो यातून श्रेष्ठत्वाची, अहंकाराची जी भावना पुष्ट होते, ती देशी कुत्रा पाळून होणार नसते. विदेशी म्हणजे श्रेष्ठ आणि आम्ही श्रेष्ठ म्हणून आमची कुत्रीही श्रेष्ठ, अशी काहीशी ती मानसिकता असते.

विदेशीच्या नादाला लागून इथल्या शेतीचेही आम्ही असेच वाटोळे केले आहे. विदेशी तंत्रज्ञान म्हणजे अत्याधुनिक, भरपूर फायदा देणारे, अगदी जादूची कांडी फिरावी तशी गरिबी दूर करणारे या भ्रमात राहून आम्ही आपल्या तंत्रज्ञानाचा त्याग केला, परंपरागत शेतीपद्धती सोडून दिली, देशी बियाणे, खते हद्दपार केली आणि आता स्वत:चेच डोके फोडून घेत बसलो. बाहेरून येणारे, इंपोर्टेड तेवढे चांगले आणि देशी म्हणजे मागास, दरिद्री, टाकाऊ ही जी मानसिकता आपल्या लोकांमध्ये खोलवर रूजली आहे तिला केवळ गुलामीची मानसिकता म्हणावी लागेल.

जगाच्या पाठीवर असा एकही देश नाही की ज्या देशाच्या संसदेत किंवा सर्वोच्च सभागृहात त्या देशाच्या भाषेखेरिज इतर विदेशी भाषांमधून कारभार चालत असेल, अपवाद फक्त भारताचा; इंग्रजी इथल्या कुठल्याही राज्याची राजभाषा नाही, ती राष्ट्रभाषादेखील नाही, देशातील नव्वद टक्के लोकांना इंग्रजी अवगत नाही, ती एक परकीय भाषा आहे; परंतु संसदेचे कामकाज मात्र इंग्रजीतच चालते. त्याचे थेट प्रक्षेपण होते आणि विदेशात बसून ते पाहताही येते. तिथे हिंदी किंवा इतर प्रांतीय भाषा बोलणार्‍याकडे गावंढळ असल्यासारखे पाहिले जाते. देशाच्या सर्वोच्च सभागृहातच स्वदेशाभिमानाची अशी लक्तरे होत असतील, तर त्या देशातील नागरिकांना “मेरा भारत महान” म्हणण्याचा नैतिक अधिकारच उरत नाही. हा देश महान कोणत्या निकषावर ठरतो? या देशाचा कारभार परकीय भाषेत चालतो, इथे उच्चशिक्षण परकीय भाषेत दिले जाते, या देशातल्या शेतात परकीय वाणांचे बीज टाकले जाते, या देशातील लोक विदेशी कुत्री व गाई अभिमानाने बाळगतात, या देशाची ध्येयधोरणे अमेरिकेत निश्चित होतात आणि तरीही हा देश महान!

हा देश महान करायचा असेल तर आधी या देशाची अस्मिता जागृत करावी लागेल, ज्या वस्तुंचे, पिकांचे उत्पादन या देशात होते, अशा सगळ्याच वस्तुंच्या आयातीवर बंदी घालावी लागेल, संसदेपासून ते प्राथमिक शाळेपर्यंत सगळीकडे इंग्रजीला कायम तृतीय किंवा त्याही खालचे स्थान द्यावे लागेल, क्रिकेटसहीत सगळ्या विदेशी खेळांची हकालपट्टी करावी लागेल आणि त्यासाठी आधी आपल्या मनात खोलवर रूजलेली गुलामीची पाळेमुळे निखंदून काढावी लागतील. ते सगळ्यात आधी होणे महत्त्वाचे!जुने प्रहार वाचण्याकरिता:

www.prakashpohare.marathisrushti.com प्रतिक्रियांकरिता: Email: prakash.pgp@gmail.com, Mobile No. +91-9822593921

रविवार:6 नोव्हेंबर 2011

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..