आपल्या देशातील विवाह संस्थेचं अस्तित्व धोक्यात आलय की काय असं वाटायला आता वाव आहे. लोकांचा विवाह संस्थेवरचा विश्वास आता दिवसेन-दिवस उडायला लागलाय. विवाह संस्था अनाहुतपणे आपल्या देशातील गुन्हेगारी आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढायलाही काही प्रमाणात कारणीभूत ठरू लागलेय हे नक्की. त्यातही स्त्री गुन्हेगारीचं प्रमाणही अधिक वाढतय. आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्या नवर्याचा काटा काढण्याचे गुन्हे वाढताना दिसतायत. स्त्रिया एका पुरूषाचाच दुसर्या पुरूषाचा काटा काढण्यासाठी शस्त्रासारखा वापर करत आहेत. पूर्वी पुरूषांच्या विवाह्बाह्य संबंधांचं प्रमाण अधिक होत पण आता त्यात स्त्रियाही मागे नाहीत आणि आता येथे ग्रामिण आणि शहरी भागातील स्त्रिया असा भेद करण्याचीही गरज उरलेली नाही. स्त्री- पुरूषांच्या विवाह्बाहय संबंध निर्माण होण्याला आता कसलीच सीमा रेषा उरलेली नाही. तीन-चार मुलांची आई असणारी स्त्री ही ह्ल्ली विवाह्बाहय संबंध प्रस्थापित करते ते ही लग्नाला दहा- पंधरा वर्षे झाल्यानंतरही आणि काही ठोस कारण नसताना. मग विवाह संस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण होणारच. आपल्या देशातील प्रसारमाध्यमे ज्यात टेलिव्हिजनचा विचार करता नियमित दाखविल्या दैनदिन मालिका ज्यात विवाहबाहय संबंध, विवाह्बाह्य प्रेमप्रकरणं ती ही स्त्री-पुरूष दोहोंचीही मोठ्या प्रमाणात दाखविली जातात. त्याचा बळी मोठ्या प्रमाणात स्त्रियाच ठरतात त्यात मोठया प्रमाणात विवाहीत मध्यमवर्गीय स्त्रियांचा भरणा अधिक असतो. या मालिकातील स्त्री पात्रांचे गुण उचलता उचलता त्या त्यांच्यातील दुर्गुण ही उचलू लागतात. विवाह्बाह्य संबंध प्रस्थापित करणं आणि ते समाजापासून लपवून ठेवणं फार सोप्प असतं असा गैरसमजही त्यामुळे कित्येकांचा झालेला दिसतो.
आपल्या देशात स्त्री-पुरूष समानता प्रत्यक्षात येण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. पण ती प्रत्यक्षात येईल त्यानंतर विवाह्संस्थेचं अस्तित्व लयाच्या दिशेने प्रवास सुरू करेल की काय अशी भिती आताच वाटू लागलेय. आपल्या देशातील विवाह संस्था ही त्याग, समर्पण, आणि विश्वास यांच्या पायावर उभी होती आणि आहे तो पायाच जर नाहीसा झाला तर विवाह संस्था नष्ट व्हायला वेळ तो किती लागणार. पूर्वी जर एखाद्याची बायको पर पुरूषासोबत पळून गेली, कोणा स्त्री –पुरूषांचे विवाह्बाह्य संबंध असतील, कोणाचा काडीमोड झाला तर ते समाजात चर्चेचा विषय ठरत पण आता तसं काहीच होत नाही याचा अर्थ समाजालाही आता या गोष्टी सरावाच्या झाल्यात. भविष्यात समलिंगी संबंध ठेवणार्यांच्या बाबतीत ही समाज असाच उदासिन झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. विवाह संस्था विनाकारण निरपराधी माणसांचा बळी घेण्याला कारणीभूत ठरण्यापेक्षा ती अस्तित्वात नसलेलीच बरी या मतापर्यंत काही लोक पोह्चल्याची शक्यता ही नाकारता येत नाही. उच्चवर्गाने तर विवाहाचं अस्तित्व कधीच नाकारलय , मध्यमवर्ग विवाह संस्था प्राणपणाने जोपासतोय आणि सर्वात खालच्या स्तराला त्याच्याशी फारसं काही देणं घेणं नाही कारण आपल्या पोटाची खळ्गी भरण्यापलिकडे बाकीच्या गोष्टींना त्यांच्या आयुष्यात फारसं महत्वच नसतं. विवाह संस्था आपल्या देशात अजून किती वर्षे तग धरून उभी राहील यावर आताच प्रश्न चिन्ह निर्माण झालय की काय अशी भिती वाटू लागलेय.
— निलेश बामणे
Leave a Reply