लास व्हेगासमध्ये पार पडलेल्या ‘मिस युनिव्हर्स २०१०’ स्पर्धेच्या झगमगत्या सोहळ्यात मेक्सिकोच्या जेमिना नवारते विश्वसुंदरी ठरली. ८३ स्पर्धकांना मागे टाकत आत्मविश्वास, जिद्द, चुणूक, सौंदर्य आणि बुद्धिचातुर्य या निकषांवर सरस ठरत नवारतेने बाजी मारली. या आधी तिने २००९ मध्ये ‘न्युएस्ट्रा बेलेझा मेक्सिको’ ही स्पर्धा जिकली होती. ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिकल्यानंतर नवारतेचा
आनंद गगनात मावत नव्हता.
दर वर्षी भरणार्या वेगवेगळ्या सौंदर्यस्पर्धा हा एक ‘ग्लोबल इव्हेंट’ झाला आहे. केवळ बाह्यसौंदर्याचे प्रदर्शन न करता अशा स्पर्धांमधून बुद्धीमत्तेची चमकही स्पष्ट दिसते, असा दावा स्पर्धांच्या आयोजकांकडून नेहमीच केला जातो. ‘मिस युनिव्हर्स’ ही अशा स्पर्धांपैकी सर्वात महत्त्वाची स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेतून विश्वसुंदरीचा शोध लावला जातो. तिच्या नावाची जगभर चर्चा होते. प्रसारमाध्यमांतून तिच्याबद्दल, या स्पर्धेबद्दल विपुल प्रमाणात लिहिलं-बोललं जातं. सुश्मिता सेनच्या रुपाने या स्पर्धेत भारताने प्रथमच बाजी मारली. तेव्हापासून आपल्याकडे या स्पर्धेची विशेष चर्चा होते. नुकतीच झालेली मिस युनिव्हर्स स्पर्धाही त्याला अपवाद
नव्हती.
नेहमीप्रमाणे यंदाही ‘मिस युनिव्हर्स २०१०’ चा सोहळा लास व्हेगासमधील मंडाले बे रिसॉर्ट आणि कॅसिनोमध्ये दिमाखात पार पडला. ब्रेट मायकेलच्या स्टार परफॉर्मन्सने सोहळ्याची शोभा द्विगुणित केली. या झगमगत्या सोहळ्यामध्ये आणि सुरूवातीपासून रंगलेल्या स्पर्धेमध्ये मेक्सिकोच्या जिमेना नवारतेने ‘मिस युनिव्हर्स २०१०’चा किताब पटकावला. स्पॉटलाईटमध्ये आणि पारंपरिक नृत्याने रंगलेल्या या सोहळ्यात जेमिना रंगून गेली होती. पांढर्याशुभ्र रंगाचा इव्हिनिग गाऊन घातलेल्या जेमिना नवारते हिचे टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन करण्यात आले. ‘मिस युनिव्हर्स २०१०’चा मानाचा किताब पटकावल्यानंतर आनंद शब्दात व्यक्त करता येत नसल्याची प्रतिक्रिया नवारतेने दिली.
‘मिस युनिव्हर्स २०१०’ च्या स्पर्धेमध्ये जमाईकाच्या येंडी फिलिप्सने दुसरा तर ऑस्ट्रेलियाच्या जेस्टिना कॅम्पबेलने तिसरा क्रमांक पटकावला. मिस युक्रेन आणि मिस फिलिपाईन्स या युवतींना चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. स्विमसूट, इव्हिनिग गाऊन आणि क्विक थिकिग इंटरव्ह्यू अशा तीन विभागात सौंदर्यवतींना परिक्षकांवर आपली छाप पाडायची होती. सौंदर्यस्पर्धेमध्ये एकूण ८४ सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये आत्मविश्वास, जिद्द, चुणूक, सौंदर्य आणि बुद्धिचातुर्य या सर्व निकषांवर सरस ठरत जेमिना नवारतेने बाजी मारली. २००९ ची मिस युनिव्हर्स ठरलेल्या व्हेनेझुएलाच्या स्टेफिना फर्नांडीसच्या हस्ते जेमिनाला झगमगता मुकूट प्रदान करण्यात आला. या प्रसंगी दोन बहुचर्चित सौंदर्यवतींना मंचावर एकत्र पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळाली.
मेक्सिकोच्या जेमिना नवारतेचा जन्म २२ फेब्रुवारी १९८८ मध्ये झाला. ती गुडालाजारामध्ये लहानाची मोठी झाली. चुणचुणीत आणि हुशार जेमिना लहानपणापासूनच कौतुकास पात्र ठरत होती. तिच्या सौंदर्याचीही अनेकदा वाहवा झाली. सौंदर्यस्पर्धांमध्ये सहभागी होण्यापूर्वी तिने न्युट्रिशन या विषयात शिक्षण घेतले. राज्यस्तरीय सौंदर्यस्पर्धा जिकल्यानंतर तिच्यातील चुणूक ओळखून या भव्य सौंदर्यस्पर्धेसाठी तिची निवड करण्यात आली. न्युएस्ट*ा बेलेझा मेक्सिको २००९ या स्पर्धेत ती सहभागी झाली. या सौंदर्यस्पर्धेत ती सरस ठरणार अशा सर्वांच्या अपेक्षा होत्या. त्या सार्थ ठरवत नवारतेने ३३ स्पर्धकांना मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला. कर्ला करिलोनंतर हा किताब जिकणारी जलिस्कोमधील ती दुसरी सौंदर्यवती ठरली. या स्पर्धेच्या वेळी नवारते न्युट्रिशन या विषयात पदवी घेत होती. तिने मॉडेलिगमध्येही कारकीर्द सुरू केली होती. दोन्ही क्षेत्रातील वाटचाल संतुलित राखत तिने स्पर्धेमध्ये यश मिळवले. त्यानंतर ‘मिस युनिव्हर्स २०१०’ च्या स्पर्धेकडे नवारतेची वाटचाल सुरू झाली. यासाठी तिने खूप मेहनत घेतली. याच मेहनतीचे फळ नवारतेला किताबाच्या रूपाने मिळाले. ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिकणारी ती मेक्सिकोची दुसरी युवती आहे. याआधी १९९१ मध्ये लुपिटा जोन्सला हा किताब मिळाला होता.
आपण स्पर्धेत उतरल्यानंतर करोडो प्रेक्षकांची मने जिकू अशाही नवारतेला विश्वास होता. स्पर्धेत उतरल्यावर सर्व स्पर्धकांपेक्षा आपला वेगळा ठसा उमटवायचा अशी खूणगाठ तिने मनाशी बांधली होती. मेक्सिकोचे नाव उंचावण्याचा निश्चयही नवारतेने केला होता. या निश्चयामुळेच आपला विजय झाल्याचे मत तिन व्यक्त केले. या यशामध्ये कुटुंबियांचा सिंहाचा वाटा असल्याचेही तिने सांगितले. ‘माझ्या घरच्यांशिवाय मी जगू शकत नाही. मला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची मोलाची साथ लाभली आहे’ असे सांगताना तिचे डोळे पाणावले होते. नवारतेमुळे मेक्सिकोला तब्बल १९ वर्षांनी ‘मिस युनिव्हर्स’च्या किताबावर शिक्कामोर्तब करता आले. ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिकल्यानंतर जेमिनाला शिक्षणातून काही काळ विश्रांती घ्यावी लागणार आहे. तरी आपल्या न्युट्रिशन क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करणार असल्याचे तिचे म्हणणे आहे.
अलीकडच्या काळात सौंदर्यस्पर्धा हा मोठा इव्हेंट झाल्यामुळे सार्या जगाचं लक्ष त्याकडे आहे. निवडणुकीच्या काळात घेतल्या जातात तशा जनमत चाचण्या या सौंदर्यस्पर्धांच्या निमित्तानेदेखील घेतल्या जातात. यंदाच्या मिस युनिव्हर्सच्या ऑनलाईन जनमत चाचणीमध्ये फिलिपाईन्सच्या व्हिनस राजला सर्वात जास्त मते मिळाली होती तर अमेरिकेच्या रिमा फाकिहला दुसर्या
क्रमांकाची पसंती देण्यात आली होती. भारताची उशोशी सेनगुप्ता हीसुद्धा लोकांची
हॉट फेव्हरेट स्पर्धक होती. पण, प्रत्यक्ष स्पर्धेत उशोशीने भारतीयांची निराशा केली. तिला पहिल्या १५ सौंदर्यवतींमध्येही स्थान मिळवता आले नाही.
‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिकल्यानंतर जेमिना नवारतेला भरगच्च पगार, डायमंड नेक्सस लॅब्जकडून कोट्यवधी रूपयांचे दागिने, फारौक सिस्टिम्स चि लाईनकडून एका वर्षासाठी हेअर केअर प्रोडक्ट्स, डार बी दारकडून डिझायनर स्विमसूट, शेरी हिलकडून डिझायनर वॉर्डरोब, क्रायोलॉनकडून मेकअपचे महागडे साहित्य अशी भरगच्च बक्षिसे मिळणार आहेत. याचबरोबर नवारतेला न्युयॉर्क फिल्म अॅकेडमीकडून एक वर्षाची शिष्यवृत्तीही मिळणार आहे. पुढील कारकिर्दीसाठी जेमिनाला या यशाचा फायदा होईल यात शंका नाही. एकीकडे जेमिनावर अभिनंदनाचा वर्षाव होत असताना निदान पुढील वर्षी तरी भारतीय सुंदरी ‘मिस युनिव्हर्स’चा किताब पटकावून आणेल अशी आशा करायला हरकत नाही.
— प्रज्ञा केळकर
Leave a Reply