आमच्या शेजारी वयोवृद्ध ताराबाई, ज्याना आम्ही मावशी म्हणत असू,रहात होत्या. निवृत्त शिक्षिका, वय ९८ पूर्ण. जीवनाचे शतक पूर्ण करण्याचा आत्मविश्वास. ह्या वयांत देखिल आनंदी व समाधानी राहण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असे. स्मरणशक्तीपण त्याना साथ देत होती. वर्तमानपत्रातील फक्त ठळक हेडलाईन्स त्या वाचीत असे.
मी अनेक वर्षे पूजाअर्चा व ध्यानधरणा ह्या दैनदिन विधी करीत असतो. ईश्वरी साक्षात्कार म्हणजे काय ? त्याची अनुभूती, व फळ हे सारे संस्काराने मनावर बिंबवलेले विचार होते. बालपणीच संस्कारांनी रक्तांत शिरकाव केला व शरीराचे एक गुणधर्म म्हणून स्थित झालेले होते. फळाची आशा करु नकोस. कर्म करीत रहा. हा भगवंताचा संदेश तंतोतंत पाळण्याचे व्रत अनुसरीत होतो. पण चंचल मन हे जेवढे संशयी आणि दृढनिश्चयाला बाधा आणते, इतके बाह्य जगांतले कोणतेच विचार कार्य करणार नाही.
एकदा तारामावशी आल्या. त्यावेळी मी पूजा करीत होतो. एक विचीत्र व अफलातून विचार मनात चमकून गेला. मन जसे चपळ, तसेच संशयी पण असते. ते काय व कसा विचार करील हे कुणालाही सांगता येत नाही.
“हे आई जगदंबे, श्रीमती तारामावशी वयाची ९८ वर्षे जगल्या. अत्यंत सरळ व साधी बाई. त्यांच्या जीवनांत अद्यापी कोणतीही घटना अशी ऐंकवांत नाही, की ज्याचा विचार करतां तुझ्या अस्तित्वाची कल्पना मनाला वाटू शकेल. पण तू असे छोटेसे कां होईना, कांही तरी करून दाखव की ज्यामुळे ताराबाईना धन्यता वाटेल. व इतकी आयुष्याची वर्षे घलविली त्याचे समाधान होइल. ”
हे जग ईश्वराच्या श्रद्धेसाठी, विजेच्या चमकण्याप्रमाणे एखाद्या चमत्काराची का अपेक्षा करते हे कळत नाही. दुसरय़ाच क्षणी मी माझ्या तंद्रितून जागा झालो. मला हंसू आले. श्रद्धा ठेवत जा. चमत्कार वा कांही प्राप्त होईल हा स्वार्थ तुझी तप साधना कवडीमोल करेल. मी चंचल मनाला आवरत ईश्वराची क्षमा मागीतली.
कांही दिवस गेले. अचानक दोन प्रतिष्ठीत माणसे माझ्या घरी आली. त्यांत एक ठाणे जिल्हा पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष, जे माझे जवळचे मित्र होते. व दुसरे नवोदित ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे याचे संस्थापक/संचालक होते. जे माझ्या परिचयाचे नव्हते. त्यांच्याकडून कळले की ठाण्यामध्ये १५० कोटीहून जास्त बजेट असलेल्या ज्युपिटर रुग्णालयाची संकल्पना पूर्ण झालेली आहे. सामुग्रीने सुसज्ज व ज्येष्ठ डॉक्टर्स तज्ञ मंडळीनी परीपूर्ण असे अद्यावत हॉस्पिटल उभारले गेले आहे. त्यांच्या मँनेजमेंटने सामुहीक सल्ल्याने असे ठरविले आहे की ठाण्यातील जी सर्वांत वयोवृद्ध ज्येष्ठ व्यक्ती असेल, तीच्याकडून त्या हॉस्पिटलच्या उदघाटनाची फित कापली जावी. त्या व्यक्तीचे प्रथम पाऊल तेथे पडावे. हाती असलेल्या यादी प्रमाणे, श्रीमती ताराबाई यांचे नांव आम्हास कळले. त्या ठाण्यामध्ये ५० वर्षाहून अधीक काळ आहेत. सध्या त्या तुमच्या शेजारी राहतात. कृपया त्यांची अनुमती घेऊन द्याल कां ? त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, ह्याची काळजी घेतली जाईल.
आश्चर्य आणि कौतूकाने माझे ह्रदय भरुन आले.स्वप्नांत देखील ज्याचा विचार मनाला स्पर्ष करणार नाही, ती अघटीत घटना घडू पहात होती. अशा भव्य आणि दिव्य वास्तूचा उदघाटन सोहळा कदाचित् राष्ट्रपती यांच्या हस्ते पार पडेल हे ऐकत होतो. कारण त्या महाराष्ट्राच्याच म्हणून. अथवा पंतप्रधान वा मुख्यमंत्री यांच्या हस्ते. परंतु विधात्याने साऱ्याना एका वैचारीक लाटेमध्ये सहज बाजूस सारुन, श्रीमती ताराबाई ह्या ९८ वर्षाच्या शिक्षिका, एक सामान्य ज्येष्ठ नागरीक म्हणून त्यांच्या हाती उदघाटनाची फीत कापण्याची कात्री द्यावी, हे परम भाग्य सोपवावे, ह्याला काय म्हणणार ? एक दैवी चमत्कारच नव्हे ?
सारे ऐकून ताराबाईंच्या डोळ्यांत पाणी आले होते. आणि त्यांच्या भावना बघून, माझे ह्रदय भरुन आले. मी पाणावलेल्या डोळ्यानी देव्हाऱ्यातल्या मुर्तीकडे बघूं लागलो. पुन्हा मनाने संदेश दिला. श्रद्धा ठेवीत जा, फळाची अपेक्षा करु नकोस. माझा प्रत्येक क्षण मुळी चमत्कारानी भरलेला असतो. त्याला फक्त जाणत रहा. ईश्वरी प्रचिति तेथेच येईल.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
Leave a Reply