माझ्या विहीणाई बाई
तुम्हा बहीण मानते
जपली जी अमानत
तुम्हा हाती सोपवते
द्यावी मायेची सावली
पुन्हा पुन्हा विनवते
कधी सोसलेना तिने
उन्हातान्हाचे चटके
तिच्या सोनपावलांची
दारी उमटली नक्षी
आनंदाने भारारला
गगनात तेव्हां पक्षी
अशी अंगणी खेळता
कधी झाली पहा मोठी
अजूनही सान बाळी
तिच्या बाबा दादासाठी
कन्या परक्याचे धन
किती सांगू या मनाला
हृदयाच्या हुंदक्याला
आता बांध मी घातला
कांही चुकले माकले
माय सांभाळून घेई
आता माझी न राहिली
तुम्हीच व्हा तिची आई
— सौ. सुधा मोकाशी
Leave a Reply