नवीन लेखन...

वृत्तपत्रात अस्सल मराठी वापरावी का

लोकमतच्या औरंगाबाद (मराठवाडा) आवृत्तीचे निवासी संपादक चक्रधर दळवी यांचे ‘मराठीच्या पिंडावरील कावळे’ हे भाष्य नुकतेच वाचण्यात आले. त्यात ते म्हणतात, एखाद्या प्रसंगात एखाद्या व्यक्तीने अविवेकी भाषा वापरली असेल, आणि त्या प्रसंगाची बातमी करायची असेल तर वृतपत्रांनी काय करावे? बातमीत ही भाषा वापरावी का ‘फुल्या-फुल्या’ मारून वेळ मारून न्यावी? परवा एका वाचकाचा फोन आला होता, तेव्हा हा प्रश्न उपस्थित झाला. जे काही घडले ते जसेच्या तसे कळणे, हा वाचक या नात्याने आमचा हक्क आहे. इंग्रजी वृतपत्रे असभ्य ठरविलेल्या शब्दांचे रिपोर्टिंगही करतात. मराठीत ते का घडू नये, असे या वाचकाने ठणकावून सांगितले. याला निमित्त ठरले लोकमत मध्ये प्रसिद्ध झालेली एक बातमी. जनगणना कर्मचाऱ्यावर चिडलेल्या एका महिलेने या कर्मचाऱ्याला ‘भाड्या’ म्हनून शिवी हासडली. लोकमतने हे वाक्य जसेच्या तसे उचलले. त्यावर या वाचकाने फोन करून लोकमतचे अभिनंदन केले.

या भाष्यात पुढे ते काय म्हणतात त्याचा थोडक्यात सारांश असा, वृतपत्रांनी मराठी भाषेला पार मिळमिळीत आणि निरस करून टाकले आहे. वृतपत्रांच्या पानावर दिसते ती खरी मराठी भाषा नाहीच. हे मराठीचे कलेवर आहे. खरे मराठी लोकांच्या ओठावर आहे, ते पानावर आणण्याची जबाबदारी वृतपत्रांची आहे. आजचे प्रमाण मराठी लज्जेच्या शेल्याआड गुदमरते आहे.

अस्सल देशी शब्दांचे सांस्कृतीकीकरण करण्याच्या नादापायी मराठीला ही अवकळा अली आहे. मराठी भाषेचे स्वयंघोषित ‘शिवाजी’ विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी हा नाद प्रमाण मराठीला लावला. ‘भले तरी देऊ गांडीची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी’ ही संत तुकारामांची अभंगपंक्ती चिपळूणकरांनी स्वतःच्या अखत्यारीत अश्लील ठरविली आणि ‘भले तरी देऊ कांसेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी’ असे रुपांतर करून त्यातील प्राण काढून घेतला. वारकऱ्यांच्या गाथ्यात आजही तुकारामांचे मुळ शब्द कायम आहेत. प्रमाण मराठीला मात्र ते पेलवत नाहीत. प्रसारमाध्यमामध्ये आज चिपळूणकरी चेल्या-चपाट्यांची चलती आहे. प्रमाण मराठीचा संसार सांभाळणाऱ्या संस्थावरही याच वंशावळीचे अघोषित राज्य आहे. मराठीला ठार मारून तिच्या पिंडावर उड्या मारणारे हे कावळे आहेत. वगैरे वगैरे…असो, तर एकूण लेखकाचा कल वृत्तपत्रात ‘अस्सल’ मराठीचा वापर व्हावा याकडे दिसत आहे. चांगली गोष्ट आहे. पण एका वाचकाच्या आग्रहाखातर, एका संपादकाच्या मते अथवा कुण्या एकाच्या विरोधाखातर आपल्याला याविषयीचा निर्णय घेता येणे अशक्य आहे. त्यावर व्यापक विचारमंथन होणे आवश्यक आहे. आणि याची सुरुवात आपल्याला स्वतःच्या कुटुंबापासून करावी लागेल. आपल्या घरात येणारं ‘मराठी’ वर्तमानपत्र हे कुटुंबातील आजोबापासून ते नातवंडापर्यंत प्रत्येकजण वाचत असतो. तेव्हा सर्वप्रथम आपल्या आपल्या घरात येणाऱ्या वर्तमानपत्राने अस्सल स्वरूपातील मराठी (उदा. ‘भाड्या’ आणि तत्सम शिव्यांनी युक्त) भाषेत बातम्या द्यायला तुमची काही हरकत आहे का? हा प्रश्न विचारावा लागेल. लेखकाचा कोणत्या मंडळीवर कशासाठी रोष आहे याचा विचार करण्याऐवजी, आपण आपल्याच कुटुंबातील प्रत्येक वाचक घटकांचा या अस्सल मराठीला होकार आहे का आणि ते त्याचा यापुढे स्वीकार करायला तयार आहेत का? हे तपासून पहणे गरजेचे वाटते.मला वाटते की, मराठीला घटकाभर जर जलाची उपमा दिली तर, आज आपण ज्या मराठी भाषेचे जलपान करत आहोत, त्या जलातील गढूळपणा (आपण ठरवलेला का असेना) खाली बसलेला आहे. आणि वरचे नितळ आणि स्वच्छ आणि शुद्ध अशा या जलाचे आपण जलपान करत आहोत. ते पाणी ढवळून जलपान करणे आपल्याला पचेल का ओकाऱ्या काढण्याची पाळी येईल याचा विचार व्हावा.शिमग्यादिवशी जेव्हा आपली ही मराठी भाषा लज्जेचा शेला फेकून देते, आणि आपल्या मूळ स्वरुपात प्रकट होऊन आपले ‘अस्सल शब्दालंकार’ प्रदर्शित करते तेव्हा कितीजणांचे कान तृप्त होतात? आणि कितीजण सहकुटुंब याचा श्रवणानंद घेतात? अशी ढवळलेली भाषा पचविणे ज्यांना शक्य वाटते त्यांनी, शिमग्यादिवशी आणि घराबाहेर ‘अस्सल मराठीतून’ भांडणे सुरु असताना आपण घराची दारे घट्ट बंद करून मुलाबाळांच्या कानावर ही अस्सल मराठी पडू नये याची पुरेपूर काळजी का घेतो हे आधी तपासून बघावे.आणि जर आपल्याला ही मराठी अस्सल आणि मूळ झणझणीत अशा ठसकेबाज स्वरुपात स्वीकारायची असेल तर ती मुद्रित, दृक्‌श्राव्य अशा सर्वच माध्यमातील स्वरुपातून स्वीकारावी लागेल, की ज्यामुळे आपले कान, नाक, डोळे, ओठ या सर्वच पंचेंद्रियांची तृप्ती होईल. त्याचसोबत लहान मुलाच्यावर असलेली ‘झोपडपट्टीतल्या मुलांशी बोलू नकोस, त्यांच्याशी खेळू नकोस त्यांची भाषा चांगली नसते’ ही बंधनेही सैल होतील. आणि भाषेच्या बाबतीत ‘अवघाची रंग एक झाला’ याची अनुभूती घेता येईल.

— रमण कारंजकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..