सुंदर, टॅनिंग फ्री त्वचेसाठी वॅक्सिंग हा चांगला व सहज अजमावता येणारा पर्याय आहे. मात्र तरीही वॅक्सिंग करताना कांही गोष्टींची काळजी अवश्य घ्यायलाच हवी अन्यथा त्वचा सुंदर दिसण्याऐवजी भलतेच काही तरी होऊ शकते. साधारणपणे मुली मुले वयात येऊ लागली की अंगावर केस येऊ लागतात. त्यातही मुलींना हाता पायावर अथवा ओठांवर केस येऊ लागले की सौंदर्याला बाधा निर्माण होते व त्यासाठी वॅक्सिंग करून हे नको असलेले केस काढून टाकता येतात. शिवाय उन्हात सतत फिरल्याने त्वचा काळी पडते म्हणजे टॅन होते तो टॅनही वॅक्सिंगच्या सहाय्याने कमी करता येतो. वॅक्सिंग घरच्याघरीही करता येते मात्र प्रथमच वॅक्सिंग करत असाल तर चांगल्या पार्लरमध्ये ते करावे हे उत्तम. एखाद्या कार्यक्रमासाठी जायचा प्लॅन असेल तर दोन दिवस आधीच वॅक्सिंग करावे कारण अनेकांना त्याची अॅलर्जी येऊ शकते व अॅलर्जी बरी होण्यासाठी दोन दिवस हाताशी असलेले केव्हाही चांगलेच. वॅक्स लावून ते स्ट्रीप्सच्या सहाय्याने खेचून काढणे हा वॅक्सिंगचा सर्वात चांगला मार्ग आहे. मात्र त्यासाठी वॅक्सिंग करण्याअगोदर वॅक्सच्या डब्यावरच्या सूचना लक्षात घ्यायला हव्यात. वॅक्सिंग करण्याअगोदर त्वचेवर बर्फ फिरवला तर त्वचा थोडी बधीर होते व त्यामुळे वेदना कमी होतात. घरात वॅक्सिंग करताना त्वचा, हातपाय स्वच्छ करा व मगच वॅक्सिंग करा. त्यामुळे जंतूसंसर्गाचा धोका राहणार नाही. वॅक्स गरम केल्यावर कोमट पाण्यात ठेवले म्हणजे ते लगेच घट्ट होत नाही तसेच वॅक्सवर लावण्यासाठी सुती कपड्याच्या ४ इंच रूंदीच्या पट्ट्या वॅक्स स्ट्रीप म्हणून वापरता येतील. वॅक्सिंक करून झाल्यावर पुन्हा एकदा त्वचा स्वच्छ करणे व मॉईश्चरायझर लावणे आवश्यक आहे. पायावर हातावर लावताना वॅक्स वरून खाली लावा व स्ट्रीप ओढताना केसाच्या वाढीच्या विरूद्ध बाजूने ओढा. ओठावर अथवा हनुवटीवर वॅक्सिंग करताना कटोरी वॅक्सचा प्रयोग करा. या भागातली त्वचा जास्त संवेदनशील असते. त्यामुळे या भागाचे वॅक्सिंग करताना ३-४ छोटे छोटे भाग करून वॅक्सच्या केळ्याच्या सालीएवढा जाड थर द्यावा व ७ -८ सेकंदानंतर तो थर खेचून काढावा. त्या जागी लगोलग अँटीसेप्टीक क्रिम लावण्याची खबरदारी घ्यावी. वॅक्सिंग केलेली जागा कापसाने स्वच्छ पुसून कोरडी करावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply