वेंकटेश प्रसाद
5 ऑगस्ट 1969 रोजी बंगळुरात बापू कृष्णराव वेंकटेश प्रसादचा जन्म झाला. [अंती प्रसाद असलेला आंध्राचा एक यष्टीरक्षकही भारताकडून काही काळ खेळलेला आहे – मन्नवा श्रीकांथ प्रसाद] जवागल श्रीनाथचा नव्या चेंडूचा भिडू म्हणून उंचापुरा प्रसाद जास्त परिचित आहे. शिवणीचा वापर करून चेंडूला डूल देण्यात प्रसाद वाकबगार होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डर्बनमध्ये 1996-97च्या हंगामात त्याने दोन्ही डावात 5-5 गडी बाद केले होते. 1996च्या विश्वचषकात त्याचा एक चेंडू सीमापार धाडल्यानंतर पाकिस्तानच्या आमीर सोहेलने त्याला उद्देशून काही अ-प-शब्द उच्चारले होते. पुढच्याच चेंडूवर वेंकीने त्याच्या यष्ट्या तीनताड उडवून दिलेला ‘दांडेतोड’ जवाब अनेकांना आठवत असेल. 1999मध्ये विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानविरूद्ध ओल्ड ट्रॅफर्डवर त्याने बाद केलेले फलंदाज होते – सलीम मलिक, सईद अन्वर, मोईन खान, इंझमाम-उल-हक आणि वसिम अक्रम. एदिसांमध्ये तो अधिक उपयुक्त गोलंदाजी करायचा. त्याच्या शिकारीच पुरावा आहेत – 1969मध्ये जन्मून 1996मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या वेंकीने कसोट्यांमध्ये त्याने 96 गडी बाद केले आहेत आणि एदिसांमध्ये 196. (डर्बनमधील उपरोल्लेखित सामन्यात त्याचे पहिल्या डावातील पृथक्करंण होते 19-6-60-5! याला म्हणतात योगायोग.) ऑक्टोबर 2001मध्ये केनियाविरुद्ध खेळलेला ‘एदिसा’ (एकदिवसीय सामना) त्याचा अंतिम आंतरराष्ट्रीय सामना ठरला गोलंदाज म्हणून. 2007मध्ये बांग्लादेश दौर्यावर गेलेल्या भारतीय संघातील गोलंदाजांच्या प्रशिक्षणाची त्याच्यावर होती. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज चमूचा गोलंदाजीतील प्रशिक्षक म्हणूनही त्याने जबाबदारी सांभाळली आहे.
भारी सोबर्स<>
थोडी शिकवणी : कसोटी सामन्यातील एका दिवसाचा खेळ हा प्रारंभ ते उपाहार, उपाहार ते चहापान आणि चहापान ते खेळ समाप्त अशा सत्रांमध्ये ‘तिभागलेला’ असतो. एका षटकाला ढोबळमानाने 4 मिनिटे अशा दराने प्रत्येक सत्रात दोन तासांमध्ये 30 षटके टाकली जाणे
अपेक्षित असते. यापैकी कुठल्याही ‘एकाच’ सत्रात अर्थात दोनच तासांच्या खेळात शतक काढणे हे कौशल्याचे आणि
म्हणूनच मानाचे समजले जाते.
5 ऑगस्ट 1966 रोजी उपाहार ते चहापानादरम्यान शतक ठोकून कर्णधार गॅरी सोबर्सने हेडिंग्लेवर वेस्ट इंडीजला मालिकाविजय मिळवून दिला. या संपूर्ण मालिकेत बॅट, चेंडू आणि नाण्यासह गॅरी सोबर्सने भारी वर्चस्व गाजवले होते. तब्बल 103.14च्या सरासरीने त्याने 722 धावा काढल्या; 20 गडी बाद केले आणि पाचही सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकली.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply