कोणतेही काम वेळच्या वेळी केले तरच त्याचे फळ चांगले मिळते. संत कबीरांनी म्हटले आहे, ‘कल करे सो आज कर, आज करे सो अब! पल मे परलय होगी बहुरि करेगा कब ?’ ‘ चांगल्या कामाच्या बाबतीत तर मुळीच चालढकल करून चालणार नाही, कारण ‘ उद्याच्या भविष्यात काय दडले आहे हे कोणीच सांगू शकत नाही. एक शेतकरी होता. त्याला एकच मुलगा होता. मुलाच्या मदतीने तो आपली शेती करायचा. आपले अनुभव अनेकदा मुलाला सांगून त्याच्याकडून योग्य ती कामे करून द्यायचा. एके वर्षी पावसाळा जवळ आला. शेतकऱ्याने मुलाच्या मदतीने शेताची नांगरणी केली. त्यानंतर चांगला पाऊसही झाला. शेतकऱ्याने पेरणी केली. त्यानंतर शेतात वेळेवर निंदणी नि खुरपणीही केली. पाऊस त्यामानाने बरा पडला होता. त्यामुळे पीक चांगले आले. शेतकरी व त्याचा मुलगा दोघेही सुखावले. काही दिवसांनी पीक काढायचे ठरविले. शेतात खळे पडले. त्या दिवशी शेतात सकाळपासूनच शेतकरी व त्याचा मुलगा राबत होते. सायंकाळपर्यंत धान्याची चांगली रास पडली. फक्त ते गोळा करून घरात ठेवायचे होते. सकाळपासून काम करत असलेला मुलगा कंटाळला. तो म्हणाला, बाबा, आता हे काम आपण उद्या करू. त्यावर शेतकरी म्हणाला, नको हेही काम आजच करू. वाटल्यास तू थोडी विश्रांती घे आणि नंतर माझ्याबरोबर कामाला ये. मुलाला ते योग्य वाटले नाही, तो शेतकऱ्याबरोबर कामाला लागला. सगळे धान्य भरून झाल्यानंतरच ते थांबले. काही वेळाने अचानक आकाशात ढग जमून आले. पाठोपाठ सोसाट्याचा वाराही सुटला. पाहता पाहता मुसळधार पाऊससुरू झाला. तेव्हा मुलगा शेतकऱ्याला म्हणाला, बाबा, आपण जर काम अर्धवट सोडून उद्यावर टाकले असते तर संपूर्ण धान्याची नासाडी होऊन आपले खूप नुकसान झाले असते. शेतकरी म्हणाला, म्हणून तर तुला सांगत होतो हे काम आजच करून टाकू. कारण उद्यावर जो कोणी विसंबून राहील त्याला कोणते फळ मिळेल याची हमी देता येत नाही.
वेळ अमूल्य आहे.
तो कुणासाठीही थांबत नाही
जो वेळेला ओळखतो
तो यशस्वी होतो.