पुस्तक परिचय
वॉर्ड नंबर पाच, के. ई. एम. : डॉ. रवी बापट यांचे आत्मकथन.
परिचय लेखनः निरंजन घाटे
डॉ. रवी बापट यांचे नाव सुरेश भट आणि पंढरीनाथ सावंत यांच्या तोंडून वारंवार ऐकले होते. डॉक्टरांची हे दोघेही कायम स्तुतीच करीत. माझा आणि मुंबईचा तसा संबंध नाही आणि मुंबईतल्या डॉक्टरांचा तर त्याहून नाही. त्यामुळे बापट हे कोणी तरी बडे डॉक्टर आणि अधूनमधून साहित्यिकांवर उपचार करतात, असा एक समज माझ्या मनात होता. या पूर्वग्रहासह मी डॉ. बापट यांचे हे आत्मकथन वाचायला घेतले आणि डॉ. बापट यांच्याबद्दल माझे दोन मित्र जे बोलत त्यातले अक्षरही खोटे नव्हते, हे लक्षात आले.
डॉ. बापट हे मध्य प्रदेशात वाढलेले आणि शिकलेले. ते पुढे मुंबईत शिकायला आले. के.ई.एम.मध्ये त्यांनी आयुष्यभर नोकरी केली आणि रीतसर निवृत्त झाले. त्यांच्या आयुष्याचे सार असेही सांगता येऊ शकेल; पण डॉक्टर हा केवळ एक व्यक्ती नसतो, तर त्याच्या व्यवसायामुळे त्याचा समाजातल्या अनेक वर्तुळांमध्ये समावेश होत असतो. लोकांच्या अगदी खासगी बाबी त्यांना कळत असतात. रुग्णांचा डॉक्टरवर नुसता विश्वासच नसतो, तर पराकोटीची श्रद्धादेखील असते. हे आपल्याकडेच घडते असे नाही, तर ज्यांनी ए. जे. क्रोनिन आणि जॉर्ज सावा यांची वैद्यकीय अनुभवाची पुस्तके वाचलेली आहेत, त्यांच्या हे लक्षात येऊ शकते. अलीकडे डॉक्टरी पेशातील गैरव्यवहारांची अनेक उदाहरणे वृत्तपत्रांतून गाजत असताना (ती खरे तर डॉ. लागू खटल्यापासून गाजताहेत.) डॉ. बापट यांचे प्रामाणिक अनुभव वाचणे हा एक आनंदाचा भाग वाटतो.
डॉक्टरांच्या स्काल्पेलखालून अनेक लोक गेले. मोठमोठे कलावंत, राजकारणी, पुढारी आणि नावाजलेले गुन्हेगारही त्यात होते. याचे डॉक्टरांना बरेच भांडवल करता आले असते; पण त्यांनी ते केलेले नाही.हे महत्त्वाचे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे रुग्णालयाशी संबंधित छोट्या छोट्या व्यक्तींनाही ते विसरलेले नाहीत, तर त्यांच्या मैत्रीला डॉक्टर मनापासून दाद देतात. मग तो वॉर्डमध्ये काम करणारा भोलासारखा स्वच्छता कामगार असो किंवा गोवर्धन असो. रुग्णालयाच्या समोर राहणारा लाँड>ाऩवाला आणि त्याचा मित्र धोंडू पांडू शिंदे अशी समाजाच्या दृष्टीने किरकोळ समजल्या जाणाऱया मित्रांच्या ओळखी डॉक्टर विसरत नाहीत, हे महत्त्वाचे वाटते.
डॉक्टर स्वतच्या- आता समाजाच्या दृष्टीने अयोग्य अशा धूम्रपान आणि मद्यपान य सवयींबाबतही मोकळेपणाने बोलतात. फक्त ते गुन्हेगारांबद्दल बोलताना स्वतच्या भूमिकेचे समर्थन का करतात, ते कळले नाही. ते डॉक्टर होते. त्यांच्याकडे रुग्ण आले त्यांनी त्या गुन्हेगारांवर रुग्ण समजून उपचार केले. पण, तरीही डॉक्टरांना वाचकांबद्दल हवा तेवढा विश्वास नसावा. असे हे समर्थन वाचताना वाटून जाते. हे सगळे व्यक्तींविषयी झाले; पण बापट या डॉक्टरांचे आत्मकथन म्हणजे त्यांच्या कुटुंबीयांचे, समाजातल्या वेगवेगळ्या स्तरींतील मित्र परिवारांचे वर्णन नाही. ते डोके वापरून वैद्यकीय व्यवसाय हा सार्वजनिक सेवा मानून कार्यरत राहिलेल्या डॉक्टरांचे आत्मकथन आहे. त्या दृष्टीने डॉक्टरांचे कार्य वाचकापुढे आणण्याचे महत्त्वाचे कार्य या आत्मकथनाने केले आहे. त्यातून त्यांचा स्वदेशी बाणाही जागोजाग प्रकट होताना दिसतो. डॉ. बापट यांनी काही नवी शस्त्रक्रिया तंत्रे निर्माण केली. याविषयी पाश्चात्यांनीही त्यांचे कौतुक केले. त्यांनी डॉ. शरदिनी डहाणूकर यांच्याबरोबरीने आयुर्वेदामधील औषधांवर संशोधन केले. या प्रकरणात त्यांना जे अनुभव आले त्याबद्दलही ते सांगतात.
या पुस्तकातील सर्वांत महत्त्वाची आणि वाचकाला अंतर्मुख करणारी प्रकरणे म्हणजे `सार्वजनिक रुग्णालये आणि समाजाभिमुखता हे होय आणि त्यानंतरच `वैद्यकीयक्षेत्र उदात्त राहिले का हे अखेरचे प्रकरण. बदलत्या काळामुळे डॉक्टर विव्हळ झाल्याचे त्यात जाणवते; पण त्याच्यावर डॉक्टरांनी उपाय मात्र सुचवला नाही, हेही बरे. जिथे आभाळच फाटले तिथे बापट किती ठिगळे लावतील, असा प्रश्न मनात येतो. राजकारणाने जनहितावर मात केल्याने हे असे घडले, हे स्पष्टच आहे; पण हे पुस्तक वाचून प्रत्येक मराठी वाचक थोडासा तरी अंतर्मुख होईल असे वाटते. डॉक्टरांचे मित्र सुरेश भट म्हणतात त्याप्रमाणे `गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या! अशी स्वतच्या मनाची समजूत घालून मी पुस्तक खाली ठेवले. या पुस्तकावर एकदा हे पुस्तक हातात घेतले आणि बाकीच्या कामांकडे दुर्लक्ष झाले. तर त्यास प्रकाशक जबाबदार नाही, असा इशारा छापणे आवश्यक होते. पुस्तक अतिशय देखण्या स्वरूपात सादर केल्याबद्दल प्रकाशक अभिनंदनास पात्र आहेत.
वॉर्ड नंबर पाच, के. ई. एम. :
डॉ. रवी बापट यांचे आत्मकथन.
प्रकाशक : रोहन प्रकाशन,
शब्दांकन : सुनीती जैन,
पाने : ३००,
किंमत : रुपये २००/-
Leave a Reply