नवीन लेखन...

वैभव भागवत : इंदूरी सुपुत्राची वीरगाथा

( हुतात्मा ‘वैभव भागवत’ यांनी यावर्षी वयाची ५० वर्षे पूर्ण केली असती, त्यानिमित्ताने त्यांचे कृतज्ञ स्मृतीरंजन)


“शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती? देव, देश अन् धर्मापायी प्राणं घेतलं हाती” हे शांता शेळके लिखित मराठी मनाला वर्षानुवर्षे स्फूर्ती देणारे वीररसयुक्त गीत. हे गाणं केवळ सुश्राव्य स्फूर्तिदायी गीत म्हणून ऐकून सोडून न देता, ते प्रत्यक्ष आयुष्यात जगणारा शूर मराठी सरदार म्हणजे इंदूरचा सुपुत्र ‘वैभव भागवत’. देशासाठी सर्वस्व देणाऱ्या ‘शौर्य चक्र’ विजेत्या ‘पायलट ऑफिसर’ वैभवची कहाणी युवा पिढी आणि समस्त नागरिकांसाठी अत्यंत प्रेरणादायी अशीच.

वैभवचा जन्म ११ फेब्रुवारी १९७४ रोजी इंदूर येथे सौ. लता आणि श्री. प्रल्हाद भागवत यांच्या पोटी झाला. प्रल्हाद भागवत मूळ पुण्याचे असले तरी नोकरीनिमित्त त्यांचे वास्तव्य बराच काळ दिल्लीत झाले.

त्यांची पत्नी लता यांचे माहेर ‘इंदूर’ इथले असल्याने त्यांचा थोरला चिरंजीव ‘वैभव’ याचा जन्म इंदूरात झाला. दिल्लीत सर्व वास्तव्य आणि शालेय शिक्षण झालेला वैभव लहानपणापसूनच अतिशय गुणी, खेळकर होता. ‘सेंट मेरी’ शाळेत अभ्यास, खेळ व इतर उपक्रमांमध्ये तो कायमच चमकत असे. अश्यातच वैमानिक बनण्याची आवड त्याच्या मनात निर्माण झाली आणि पुढे ते त्याचे वेड, स्वप्न बनले. शैक्षणिक प्रगती कायम राखत तो उत्तम मार्कांनी दहावी पास झाला आणि त्याच्या शाळेतून पहिला आला. कनिष्ठ महाविद्यालयातदेखील त्याने सर्वांगीण चमक दाखवली आणि ‘हेड-बॉय’ होण्याचा मान त्याला मिळाला. उत्तम गुण मिळवत आणि कॉलेजचा ‘टॉपर’ होत बारावीतसुद्धा वैभवने घवघवीत यश मिळवले.

आतापर्यंत वैमानिक होण्याच्या वैभवच्या इच्छेला सैन्यात / हवाईदलात पायलट ऑफिसर होण्याच्या आकांक्षेची जोड मिळाली. वैमानिकांची जीवनपद्धती आणि सैन्याच्या थरारक कहाण्या त्याला रोमांचित करत असत. या ध्येयपूर्तीसाठी तो अकरावीपासूनच गांभीर्यपूर्वक प्रयत्न करू लागला. त्यामुळे बारावी करतानाच त्याने ‘यु.पी.एस.सी.’तर्फे घेतली जाणारी ‘एनडीए’ (राष्ट्रीय संरक्षण अकादमी) प्रवेशासाठीची परीक्षा दिली. त्यातही तो उत्तम गुणांनी पास झाला. आतापर्यंत वैभवचे पालक त्याच्या या सैन्यात पायलट होण्याच्या स्वप्नाकडे कौतुकाने पण काहीश्या त्रयस्थ अनास्थेने बघत होते. कारण त्यांच्या कुटुंबांपैकी कोणीच आतापर्यंत सैन्यात नव्हते. आपल्या हुशार मुलाने प्रतिष्ठित अभियंता व्हावे असेच सर्वसाधारण पालकांप्रमाणे त्यांनाही वाटत होते. त्यामुळे ते वैभवच्या स्वप्नाला उघड विरोध करत नसले तरी प्रोत्साहनही देत नव्हते. जेव्हा वैभवने ‘एनडीए’च्या मुलाखत व शारीरिक चाचणीसाठी बंगलोर व म्हैसूरला जायचे आहे सांगितले तेव्हा प्रल्हादरावांनी त्याची मानसिक तयारी पहाण्यासाठी एक अट ठेवली. त्याला सांगितले की दिल्लीहून बंगलोरला त्याला स्वत: तिकीट काढून रेल्वेच्या द्वितीय श्रेणीने प्रवास करावा लागेल आणि त्यासाठी घरापासून दिल्ली स्थानकापर्यंत सार्वजनिक बसमधून जावे लागेल. (खरे म्हणजे सुस्थितीतील प्रल्हादराव त्याला दिल्ली ते बंगलोर विमानप्रवास सहज घडवू शकले असते.) पण जिद्दीला पेटलेल्या वैभवने एप्रिलच्या कडक उन्हाळ्यात ह्या अटींची सहज पूर्तता केली.

मुलाखतीत उत्तीर्ण झाला तरी कोवळा वैभव ‘एनडीए’ प्रवेशासाठीची खडतर शारीरिक चाचणी पार करू शकणार नाही अशी वैभवच्या आईला भाबडी आशा होती. पण वैभवने ती खोटी ठरवत दोन्ही टप्पे सहज पार केले आणि जून १९९१ मध्ये त्याचा खडकवासला, पुणे येथील ‘एनडीए’ मध्ये प्रवेश झाला. इकडे त्याचा बारावीचा निकाल उत्तम लागल्याने ‘बिट्स पिलानी’सारख्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात त्याला सहज प्रवेश मिळू शकला असता. त्यासाठी त्याचे मन वळवण्याचा आई-वडिलांनी एक शेवटचा प्रयत्न करून बघितला. परंतु वैभवने त्यास नम्र पण ठाम नकार देत आपल्या स्वप्नपूर्तीसाठी पुण्याकडे प्रयाण केले. मग मात्र आई-बाबांनी आढेवेढे न घेता वैभवला ध्येयप्राप्तीसाठी मनोमन आशीर्वाद दिले. तिथे हवाई दलाचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम त्याने मन लावून, उत्कृष्ट प्रकारे पूर्ण केला. अखेरच्या ‘पासिंग आऊट परेड’ मध्येही वैभवने सर्व उपस्थितांवर छाप सोडली. यानंतर दंडिगल (तेलंगाणा) येथील हवाई दल अकादमीच्या केंद्रावर त्याचे हेलिकॉप्टर उड्डाणाचे एक वर्ष प्रशिक्षण झाले. ते पूर्ण झाल्यावर जुलै १९९५ मध्ये वैभव ‘पायलट ऑफिसर’ झाला आणि त्याने मनोभावे पाहिलेले स्वप्न पुरे झाले.

यानंतर प्रत्यक्ष ‘फील्ड’वरील वैभवची कामगिरी सुरू झाली. सुरुवातीला त्याची नियुक्ती हैद्राबाद येथील हवाई दलाच्या तळावर ६ महिन्यांसाठी झाली. पुढील सहा महीने बंगलोर येथील ‘येलहंका’ तळावर कामाचा अनुभव घेतला. मग त्याची बदली जम्मू येथे झाली. इथे येईपर्यंत तो ‘एमआय-८’ प्रकारची हेलिकॉप्टर्स चालवत असे. त्याच्या कौशल्यावर खूश होऊन मग आधुनिक ‘एमआय-१७’ बनावटीची हेलिकॉप्टर्स चालवण्याच्या प्रशिक्षणासाठी त्याला राजस्थान मधील जोधपुर येथे पाठवण्यात आले. ते सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेऊन तो पुन्हा जम्मू इथे कामावर रुजू झाला. जम्मूत ‘हेलिकॉप्टर युनिट-१३०’ मध्ये तो कार्यरत झाला. सियाचीन हिमखंडाच्या ताब्यासाठी व शत्रूपक्ष पाकिस्तानपासून त्याच्या संरक्षणासाठी एप्रिल १९८४ पासून ‘ऑपरेशन मेघदूत’ अंतर्गत ह्या युनिटचे काम चालते.

सियाचीनच्या सीमावर्ती बर्फाळ प्रदेशात आपले सैनिक ‘उणे २५’ पर्यंतच्या तापमानात २-३ किलोमीटरच्या अंतरावर एकएकटे पहारा देत उभे असतात. त्यांना अन्न, शस्त्रात्र व इतर जीवनावश्यक जिन्नस यांचा गरजेप्रमाणे पुरवठा करणे हे या युनिटचे प्रमुख काम असते. सियाचीनच्या बर्फाळ पृष्ठभागावर हेलिकॉप्टर उतरू शकत नाही, त्यामुळे ते जमेल तेवढे सैनिकांच्या जवळ खाली आणून त्यांना आवश्यक ते अन्नपदार्थ व चिजवस्तू देण्याचे (air dropping) कौशल्याचे काम या हेलिकॉप्टर चालकांना करायचे असते. ही जिकिरीची कसरत वैभवला कामाचा एक भाग म्हणून करावी लागत असली तरी त्यात त्याला थराराबरोबरच समाधानपूर्तीचा आनंद लाभत असे. सैनिकांना विविध प्रकारची रसद पुरवणे हे ठराविक कालावधीतील पूर्वनियोजित काम नसून, गरज पडेल तशी अनेकदा छोट्या छोट्या उड्डाणांद्वारे ज्याला लष्करी भाषेत ‘सॉर्टी’ (sortie) असे म्हणतात, ही कामगिरी करावी लागते. वैभव थोड्याच कालावधीत या कामातही तरबेज झाला. त्याच्या उड्डाणातील कौशल्यामुळे आणि मनमिळाऊ स्वभावामुळे अल्पावधीतच वैभव सहकाऱ्यांमध्ये लोकप्रिय झाला.

ऑगस्ट १९९६ शत्रूने दक्षिण ग्लेशियर भागात सैन्य पुन्हा तैनात केले होते आणि कमांडिंग पोझिशनवर नवीन बंकर स्थापित केले होते ज्यामुळे थेट भारतीय लष्कराच्या चौक्यांना धोका निर्माण झाला होता. लष्कराच्या चौक्यांपर्यंत पोहोचणेही अत्यंत अवघड झाले होते कारण हेलिकॉप्टरने चौक्यांकडे जाण्याचा मार्ग शत्रूच्या सतत देखरेखीखाली आणि माऱ्याच्या टप्प्यात होता. सियाचिन ग्लेशियरच्या नैऋत्येला ‘साल्तोरो रिज’वरील ‘एजीपीएल’ (अॅक्चुअल ग्राऊंड पोझिशन लाइन) पर्यंत पुरवठा मोहिमांमध्ये हवाई दलाची तुकडी सातत्याने गुंतली होती. या विस्तारीत मिशनमध्ये आपल्या हवाई दलाच्या बेस कॅम्पवरून सामग्री घेऊन ती शत्रूच्या ठाण्यांजवळील आपल्या सैनिकांच्या चौक्यांवर पोहोचती करण्याची जबाबदारी वैभवच्या युनिटवर आली. २६ ऑगस्टला विमानभेदी बॅटरीसह काही साहित्य आपल्या ‘होशीयार’ नामक चौकीवर पोहोचवण्याची कामगिरी वैभवच्या टीमवर होती. शत्रूच्या वर्चस्व असलेल्या क्षेत्रातून त्यांच्या रडारविरोधी यंत्रणेतून मार्ग काढून, त्यांच्या हल्ल्यांना चुकवत या वस्तु पोचवण्याचं अत्यंत जोखमीचं काम त्यांच्याकडे आलं होतं. मुख्य वैमानिक फ्लाइट लेफ्टनंट संदीप जैन आणि सह-वैमानिक वैभव यांना या जोखमीची पूर्ण जाणीव होती, पण शत्रूच्या हस्तक्षेपानंतरही त्यांनी हे आव्हानात्मक काम धाडसाने आणि निर्भीडपणे पार पाडले.

अशा दोन मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्यावर तिसऱ्या उड्डाणाच्या आधी हवामान खराब झाले आणि दृश्यमानता कमी झाली. याचाच फायदा बहुदा शत्रूपक्षाला मिळाला आणि तिसऱ्या उड्डाणादरम्यान शत्रूने जमिनीवरून केलेल्या हल्ल्यात त्यांचे हेलिकॉप्टर सापडले. मागाहून समजले की त्यांनी आधी डागलेले एक मिसाईल हेलिकॉप्टरच्या शेपटाला लागले तर नंतर दुसरे थेट कॉकपिटमध्ये घुसले. दुसरे मिसाईल आपल्या या हीरोंसाठी कर्दनकाळ ठरले आणि वैभवचे हेलिकॉप्टर बर्फाळ डोंगरात कोसळले. या दुर्घटनेत संदीप जैन आणि वैभव यांच्याबरोबर आणखी चार क्रू मेंबर्स (सार्जंट मुरीगप्पा, सार्जंट कृष्णा झा आणि इतर दोघे) हुतात्मा झाले. अश्या प्रकारे शत्रूहल्ल्यात आपल्या शूर कथानायकाने मातृभूमीसाठी वीरमरण पत्करले. ही दुर्दैवी घटना सैन्यदलाकडून वैभवच्या घरी त्या रात्रीच कळवण्यात आली आणि परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यातून कसेबसे सावरत ते हवाईदलाच्या सूचनेनुसार दुसऱ्या दिवशी जम्मूला पोहोचले आणि तेथेच त्याची क्रियाकर्मे उरकण्यात आली.

आज वैभवच्या आठवणींसह जगताना त्याच्या कुटुंबियांच्या मनात दु:खाच्या वेदनेबरोबरच सार्थ अभिमान असतो. कारण देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या त्यांच्या सुपुत्राला भारत सरकारने त्याच्या शौर्य, धाडस आणि सर्वोच्च कर्तव्यनिष्ठेप्रती कृतज्ञता दाखवत मानाच्या ‘शौर्य चक्रा’ने सन्मानित केले. ते स्विकारताना त्याच्या पालकांना राष्ट्रपती भवनामध्ये अत्यंत आदराने गौरवण्यात आले. पुढे ऑगस्ट २०२३ मध्ये जम्मू येथील हवाई दलाच्या ‘१३० हेलिकॉप्टर युनिट’ने आपला कॉन्फरन्स हॉल वैभवच्या नावाने समर्पित केला. या छोटेखानी समारंभाला वैभवच्या कुटुंबियांना अतिशय आदरपूर्वक आमंत्रित केले गेले होते. वैभवच्या प्रत्येक जन्मदिनी आणि शहीददिनी साहजिकच वैभवच्या परिवाराला शोक अनावर होतो, पण सैन्यदलाने आणि सरकारने त्यांच्या लाडक्या सुपुत्राचा केलेला गौरव त्यांच्या दु:खावर दिलाश्याची हलकीशी फुंकर टाकतो.

वैभवचे बाबा नंतर एकदा आसाममध्ये गेले असताना तेथील एका शहीद स्मारकावर त्यांना एक इंग्रजी वचन कोरलेले आढळले – Do not mourn the death of a soldier who die for Motherland, because  such brave men are honoured by God in Heaven” (मातृभूमीसाठी प्राणार्पण करणाऱ्या सैनिकाच्या मृत्यूचा शोक करू नका, कारण अश्या शूरवीरांना स्वर्गामध्ये देवांकडून गौरविण्यात येते). कधी वैभवच्या स्मृतीत व्याकूळ झाले तर वैभवचे कुटुंबिय या शब्दांना आठवून स्वत:ची सांत्वना करतात. अवघ्या २२ व्या वर्षी देशासाठी हुतात्मा झालेला वैभव आज असता तर या वर्षी ११ फेब्रुवारीला वयाचे अर्धशतक पूर्ण केले असते. त्यानिमित्ताने भारतमातेच्या या सुपुत्राचे कृतज्ञ स्मरणरंजन. वैभवसारख्या देशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या वीरांमुळे आपण सामान्यजन दिवाळी व इतर सर्व सण आनंदाने, निर्धोकपणे साजरे करू शकतो. त्या पुण्यात्म्याला त्रिवार अभिवादन !

जय हिंद !!

– गुरुप्रसाद दि पणदूरकर.

(माहीम, मुंबई)

Avatar
About गुरुप्रसाद दिनकर पणदूरकर 5 Articles
माजी बँकर, मुक्त लेखक. विविध संकेतस्थळे, दिवाळी अंकांतून क्रिकेटविषयक, बँकिंगसंबंधी व व्यक्तिचित्रणात्मक लेखन. विशिष्ट संकल्पनांवर आधारित शब्दकोडी रचण्याचा छंद. या शब्दकोड्यांना विशेषत: अनेक दिवाळी अंकांमधून प्रसिद्धी. मराठी साहित्य, खेळ (क्रिकेट), भारतीय इतिहास यांमध्ये विशेष रुची.
Contact: Twitter

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..