शनिवार, २ ऑक्टोबर, २०१०
धागा धागा विणूया म्हणत त्यांच्या हातातल्या कापसातून टकळीवर धागा निघायला लागला..समोर बसलेल्या चिमुकल्या शाळकरी मुलींचा चेहरा खुलला..बाजूलाच चरखे फिरायला लागले आणि धाग्यांच्या लडी दिसायला लागल्या…वर्धेतील बापू कुटी.. सकाळपासून सर्वांची एकच धावपळ चालू.. आज बापू अर्थात आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती.
खास दिवस आणि तो साजरा करण्याची पद्धतही वेगळी.. सेवाग्राम आश्रमात आज दिनचर्या बदलण्याचा हा दिवस… धागा पिळ घेत होता आणि त्याच गतीनं मन इतिहासाकडे धावत होतं…
बापू या ठिकाणी १९३६ ते १९४५ या काळात या राहत होते. १९४१ साली त्यांचा वाढदिवस आहे म्हणून त्यांच्या पत्नी कस्तुरबा यांनी तुपाचा दिवा लावला. यावर गांधीजींनी विचारणा केली त्यावेळी आज तुमचा वाढदिवस म्हणून दिवा लावलाय असे उत्तर कस्तुरबा यांनी दिले, देशातील जनतेला तुप पहायलाही मिळत नाही, देश गुलामगिरीत आहे त्यामुळे आपण कोणाताही क्षण आनंदात घालवू शकत नाही असे गांधीजींनी कस्तुरबांना सांगितले.काही करायचेच तर आश्रमाला दान म्हणून या दिवशी आपण सूत कताई केली पाहिजे असे त्यांनी पुढे सांगितले अशी नोंद इतिहासात आहे.. हाच धागा पकडून आज बापूंच्या जयंतीनिमित्ताने १२ तास सूत कताई करायला आरंभ झाला होता..
आजचा दिवस आश्रमासाठी दिनक्रम बदलाचाही दिवस असतो… १ एप्रिल ते आजपर्यंत संध्याकाळची प्रार्थनेची वेळ ६.३० ची असते ती बदलून आजपासून ती ६ वाजताची होते.. दक्षिणायण चालू झाल्याने हा बदल आजच्या दिवशी करण्यात येतो. सायंकाळच्या जेवणाची वेळही याचप्रमाणे बदलली जाते.. आश्रमाच्या विस्तीर्ण प्रांगणात शाळकरी मुलांसोबतच आश्रमात राहणारी मंडळी आणि अनेक गांधीवादी सामील होतात.
समस्त वर्धेकर बापूंना येथलेच मानत असल्याने इथं गांधी जयंती निमित्तानं कार्यक्रमांना कालच आरंभ झाला..एनसीसीच्या कॅडेटसनी काल मुख्य मार्गांलगत स्वच्छता अभियान राबवले. हा आणि असे अनेक उपक्रम आजपासून इथं
चालू झाले… आश्रमात सकाळनंतर अभिवादनासाठी नागरिक यायला आणि परिसर गजबजायला सुरवात झाली होती.. १० वाजेच्या सुमारास मुख्य सोहळा सुरु झाला…वैष्णवजन तो तेणे कहिये जे पी़ड परायी जाणे रे… आश्रम परिसर नादानं भरुन गेला… बापूंची आठवण करणारी भाषणं एका बाजूला चालू होती… स्थानिक आमदार सुरेश देशमुख, आश्रमाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अँड. गडकरी आदींची भाषणे झाली. अभिवादनाला येणारे आपापला वेळ काढून येथे दाखल होत होते.. पालकमंत्री रणजीत कांबळे, नितीन राऊत, माणिकराव ठाकरे आदीसोबतच राजकीय अभिनिवेष बाजूला सारत सर्व बापुंच्या कुटीत येत होते…
उपक्रम आणि कार्यक्रम शहरात देखील होते मात्र सेवाग्रामला भेट दिल्याखेरीज इथे कुणीही राहत नाही हे विशेष.. बापूंच्या नावाने असलेल्या हिंदी विद्यापीठात सलग दोन दिवस कार्यक्रम आहेत..
हा सारा परिसर पाहताना बापुंच्या साध्या राहणीची जाणीव होते आणि त्यांच्या कार्यासमोर आपण नकळत नतमस्तक होतो…. त्यांच्या प्रतिमेसमोर उभं राहिलो त्यावेळी प्रतिमेतल्या या महामानवाच्या प्रतिभेचा अंकूर मनात रुजावा असं मन प्रार्थना करत होतं… त्याच भारावलेल्या स्थितीत मी वर्धेला परत निघालो
लेखकः प्रशांत दैठणकर (`महान्युज’ मधून साभार)
— प्रशांत दैठणकर
Leave a Reply