मराठी ब्लॉगची पध्दत, संगणाकावर नुकतीच सुरु झाली होती. थोडक्यांत वर्णन करायाचे म्हणजे हे एक प्रकारे आपल्या नावाचे एक खाते काढणे असते. ह्य़ाला करआकारणी वा फी नव्हती. आपल्या नावाचा ई-मेल काढून ब्लॉग काढणे. एक प्रकारे वेबसाईट काढण्यासारखेच आहे. ह्य़ा खात्यावर तूम्ही लेख, कविता, माहिती, फोटो इत्यादी देऊ शकतात. वाचक वर्ग ती वाचतात. जर कुणी प्रतिक्रीया दिल्या तर त्या तुम्हास कळतात. कोणता लेख, वा साहित्य किती जणानी वाचले, ह्य़ाची जाणीव येते. मी हे सर्व जाणल्या नंतर आपणही आपल्या नावाने एक ब्लॉग काढवा ही ईच्छा प्रदर्षीत केली. वाचन लेखन ह्य़ांची आवड मनाच्या विरंगुळ्या बरोबर उतारवयांत वेळ घालविणे व ते कारणी लागणे हा हेतू.
” आता वय सत्तरीच्यापुढे गेलेले, तेव्हां ह्या गोष्टींत कशाला अडकवून घेता, मनाला अशांत कराल. ” मुलानी माझ्या हलचाली बघून टोकले.
ईश्वरी चिंतन व वाचण्याचा मार्ग सुचविला.
कोणत्या वयामध्ये कोणते काम करावे ह्य़ाचे नियम नसले तरी शारीरिक क्षमता न मानसिक संतूलन हे त्या कार्यावर मर्यादा टाकतात. हे एक सत्य असते. त्या सर्वांचा विचार होवूनच कोणतेही कार्य हाती घ्यावे. मी माझ्या जीवन आराखड्यातील अनेक छोट्या मोठ्या कर्याचा आढावा घेवू लगलो. तरुणपणी कोणतीही गोष्ट मनांत येतांच ती केली जात असे. तीची योजना, कारवाई, व परिणाम ह्याचा कोणताच गंभीरतेने विचार केला नव्हता. तडफ होती, धडपड होती. प्रौढत्व आले, तेव्हां कोणतीही गोष्ट करायची म्हणजे प्रथम त्या विचारावरच खूप विचार केला जायी. योजना आखल्या जात होत्या. सर्व अंगानी म्हणजे शारीरिक,मानसिक,आर्थिक, कौटुंबीक आणि सामाजीक, तो होइ. केव्हां यश केव्हां अपयश येत होते. मात्र हे सत्य होते की काम, प्रयत्न आणि यश ह्य़ाविषयी एक जिद्द मनात होती. त्या धडपडीत त्या कामाचे अपेक्षीत परिणाम मिळवीण्याचीच चेतना होती. त्यामुळे समाधान व निराशा ह्याना सामोरे जावेच लागत असे. एक कथा वाचली होती. कुण्या एका नव्वदीच्या माणसाने झाडाचे बी शेतांत लावले होते. हे महीत असून की तो स्वतःचे वय व आयुष्य मर्यादा जाणून त्याचे फळ उपभोगणार नाही. स्वतःसाठी नाही तर इतरासाठी, हीच त्याची प्रेरणा होती. फळाची अपेक्षा नसल्यामूळे फक्त आनंद होता.
सत्तरीच्या पुढे गेलेल्या वयांत संगणकावर ब्लॉग काढणे, लिखाण करणे, त्यासाठी वाचन करणे, हे सारे सर्व साधारण अपेक्षित नसले तरी ते गैर वाटत नव्हते. येथे कोणतीही गोष्ट, वा यश मिळवण्याची धडपड नव्हती, अपेक्षा नव्हती. आगदी फळाची इच्छा न बाळगता केले जाणारे काम. ह्य़ात मला मिळणार होता फक्त एक आनंद, समाधान आणि व्यस्त राहण्याची कला वा सवय. शरीर ज्येष्ठत्वाकडे झुकताना त्याच्या गुणधर्मा प्रमाणे ते व्याधींचे शिकार बनणारच. वेळ पुढे ढकलता येते, परंतु काळाला कुणीच रोखू शकत नाही. हे सत्य आहे.
जे कराचचे होते, ज्याची क्षमता होती, ते पुर्ण झाले ही भावना ज्येष्ठ म्हणून पक्की करावी. जे होवू शकले नाही, त्या बद्दल आपण कमी पडलो कां ? हे समजले पाहीजे.
ज्याना काळ-वेळेचे भान, स्वताः च्या क्षमतेची आणि वयाच्या मर्यादाची जाण, हे सारे समजते, तोच जीवनांत खूपसे साध्य करतो. गरीबाना पैशाची किम्मत कळते, असे म्हणतात. त्याच प्रमाणे ज्येष्ठांना वेळेच महत्व कळलेले असते. ते आपल्या उर्वरीत आयुष्याचे अंदाज वर्षे, हाताच्या बोटावरुन हेरतात. दिनदर्शीकेकडे त्यांचे लक्ष नसते. जे राहून गेले त्याबद्दल खंत न करता, उरलेल्या आयुषांचा काळ कोणत्याही चांगल्या योजनेत व्यतीत करण्याचा प्रयत्न व्हावा. नामस्मरण, ईश्वरी चिंतन, ध्यान धारणा, चांगले वाचन, लेखन, अहार, निद्रा (विश्रांति ), आणि बौद्धिक चर्चा, व्यायाम ह्य़ा अपेक्षित कार्यक्रमा शिवाय एखादा छंद जोपावा. जो मनास आनंद, समाधान, व शांतता देणारा असेल. त्यांत कोणतेही ध्येय वा फलाशा नसावी. मराठी ब्लॉग, त्यावरचे लिखाण, चर्चा, आणि रसगृहण हे मजसाठी असेच असणार नाही कां ? तो फक्त व्यस्त राहण्याचा मार्ग असावा.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply