शब्द म्हणजे नाही केवळ समूह अक्षरांचे ।ते आहे एक प्रभावी माध्यम भाव प्रगट करण्याचे ।।१।।
शब्द असती का स्वयंभू ज्यांना रूप असे उपजतची ?कुशलतांच वा असावी कीती कवी-लेखकांची ? ।।२।।
मातेचे ते शब्द जसे मृदु अंतरबाह्य नवनीत ।वात्सल्याचे जणू फिरवती पाठीवरुनी हात ।।३।।
बोल बोबडे शब्द बनुनी येती बाळ मुखातुनी ।कौतुक होऊनी तरळती मग ते माता-पित्याचे वदनी ।।४।।
कुणी कोपिष्ट आग ओकितो बेभानसा होऊनी ।शब्द तयाचे जाळिती काळिज जणू अंगार बनुनी ।।५।।
दुष्ट बुद्धीने कोणी जेव्हा दुर्वचने मग करी ।चिरती हृदया शब्द तयाचे बनुनी शस्त्र दुधारी ।।६।।
कौतुक करिती जन कला-गुणांचे, बुद्धी वैभवाचे ।स्तुती-सुमने होऊनी वर्षती शब्द प्रशंसेचे ।।७।।
प्रभुचरणी कुणी विनम्र होऊनी मनोभाव अर्पिती ।भक्ती फुलांचा सुवास होऊनी शब्द पहा दरवळती ।।८।।
कोणी नेता देई भाषण वारि बुरखा लोकहिताचा ।त्या शब्दांना दर्प येई पण सत्तेच्या धुंदीचा ।।९।।
गंधहीन ते शब्द वाटती जणू कागदी सुमने ।अर्थहीन ती खोटी वचने, पोकळ अश्वासने ।।१०।।
त्या शब्दांचे सामर्थ्य आगळे, तेज तमावे गगनी ।प्रसवलेचि जे लोकमान्य अन् स्वातंत्र्यवीरांचे वदनी ।।११।।
ऐकताच ते शब्द वाटे जणू चमके सौदामिनी ।त्या शब्दांच्या सामर्थ्य येई मृतास संजीवनी ।।१२।।
खरे मोल त्या शब्दांचे जे संतमुखातुनी आले ।अभंग बनुनी अमर जहाले जनमानसी ठसले ।।१३।।
तीच अक्षरे, उकार, मात्रा, वेलांट्या, “आ” कार ।रूप तयांचे भिन्न
भिन्न परि असे तुम्ही देणार ।।१४।।
जसे घ्यावे पात्र, त्यापरी जलास येई आकार ।जसा
घ्यावा रंग जलाला तसा रंग येणार ।।१५।।
शब्द असे बहुउपयोगी साधन जणू असावी सुरी ।भोपळा चिरा वा गळा चिरा सर्वस्वी हे तुमच्यावरी ।।१६।।
— किशोर रामचंद्र करवडे
Leave a Reply