नवीन लेखन...

शहिद अफझल गुरूचे मित्र आणि राष्ट्रीय सुरक्षा

हुर्रियतची गरळ

पाकिस्तानच्या तालावर नाचणार्‍या हुर्रियत परिषदेच्या नेत्यांना अफजलच्या फाशीचे हत्यार, राज्यात पुन्हा असंतोषाचा वणवा पेटवायला उपयोगी पडेल, असे वाटते. अफजल काही राष्ट्रभक्त नव्हता. तो देशद्रोही होता. पाकिस्तानातल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तो सदस्य होता. पाकिस्तानात जाऊन त्याने दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले होते. संसदेवर हल्ला चढवून प्रचंड रक्तपात आणि काही लोकांचे, विशेषत: मोठ्या नेत्यांचे मुडदे पाडायचा कट त्याने रचलेला होता. पण हुर्रियतवाल्यांना मात्र तो नायक वाटत होता. त्याला फाशी दिल्यावर देशभरात जनतेने आनंद व्यक्त केला. पण लाहोर आणि रावळपिंडीत मात्र या फाशीच्या निषेधार्थ निदर्शने झाली. काश्मीरमध्ये बंदी हुकूम मोडून, निषेध मोर्चे काढायचा प्रयत्न झाला. भारताशी खुलेआम शत्रुत्व करणार्‍या अफजलला माफी द्यावी, अशी मागणी करणार्‍या हुर्रियतवाल्यांनी केली. भारताच्या विरोधात सतत गरळ ओकणार्‍या हुर्रियतवाल्यांच्याकडून अन्य काही अपेक्षा करता येणार नाही.

पण ओमर अब्दुल्ला यांनीही हुर्रियतवाल्यांच्या सुरात सूर मिसळून, देशविरोधी गरळ ओकावी, हे महाभंयकर होय! ओमर अब्दुल्ला आणि त्यांचे वडिल डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी काश्मीरची सत्ता आपल्याच घराण्यात रहावी, यासाठी यापूर्वीही कोलांट्या उड्या मारलेल्या आहेत. काश्मिरी जनतेच्या भावना अफजलच्या फाशीमुळे दुखावल्याचे ओमर अब्दुल्ला सांगतात. संसदेवर हल्ला चढवणार्‍या महंमद अफजल गुरुला फाशी द्यायच्या निर्णयाची मोठी किंमत मोजायला लागेल, अफजलला फाशी दिल्यामुळे काश्मीरच्या जनतेत फुटिरतेची-अलगतेची भावना अधिक बळकट होईल, राष्ट्रीय प्रवाहापासून मुळातच बाजूला असलेल्या काश्मीर खोर्‍यातल्या जनतेला चिथावणी देणार्‍यांना या घटनेचे भांडवल करायची संधी मिळाली, शी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. काश्मिरी नेते केंद्र सरकारचे समर्थन तर सोडाच; पण चिथावणी देत आहेत.

अलिगढ मुस्लिम विद्यापीठात झुंडशाही

होय! आम्ही सारेच अफजल आहोत…अफझलच्या वारसदारांच्या रूपात आम्ही जिवंत आहोत…आम्हा सार्‍यांनाच फासावर लटकवा…भारत मुर्दाबाद!’ राष्ट्रद्रोहाच्या विखाराचे दर्शन घडविणारी व भारतीय न्यायव्यवस्थेला आव्हान देणारी ही नारेबाजी झाली…फलकबाजी झाली! मात्र कुठे? काश्मीरमधील फुटीरवाद्यांच्या बालेकिल्ल्यात नव्हे… भारताला नेहमीच पाण्यात पाहणार्‍या पाकिस्तानातही नव्हे… तर ही नारेबाजी झाली उत्तरप्रदेशातील ज्ञानगंगेचे पाठ पढविणार्‍या चक्क अलिगढ मुस्लिम विद्यापीठात! ‘अफझल तेरी याद मे रो रही ये जमी, रो रहा आसमॉं,’ असे फलक झळकवत शेकडो तरुण अफजलविषयीच्या पुळक्याने अंगात भूत संचारल्यागत नारेबाजी आज करीत राहिले. ज्या देशात आपण राहात आहोत, ज्या देशाची घटना भारतीय म्हणून आपण अंगिकारली आहे, ज्या घटनेने आपल्याला न्यायव्यवस्था दिलेली आहे, त्या न्यायव्यवस्थेवर लाथाळ्या हाणण्याचे कृत्य दांडगाई करणार्‍या या तरुणांनी आज केले. जगातील लोकशाहीचे सर्वांत मोठे मंदिर असलेल्या भारतीय संसदेवर पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी चाल करून येतात…त्या दुश्मनांना अफजल गुरू मदत करतो…त्यांच्या कटात सहभागी होऊन तो देशाविरुद्ध युद्ध पुकारतो…या उप्परही न्यायव्यवस्थेत त्याला त्याची बाजू मांडण्याची परवानगी देण्यात येते…त्यात तो दोषी सिद्ध होतो…सर्वोच्च न्यायालय त्याला फाशीची शिक्षा ठोठावते…राष्ट्रपती त्याची दया याचिका फेटाळून लावतात….एवढ्या सार्‍या प्रक्रियेतून त्याला फाशी झाल्यानंतरही या सर्व प्रक्रियेकडे डोळेझाक होते, झुंडशाही, दांडगाई होते… आपल्याच देशाविरुद्ध ते नारेबाजी करतात, हे देशाच्या सुरक्षेसाठी गंभीर असल्याचीच प्रतिक्रिया देशभरातून उमटली आहे. दिवसभर हा प्रकार सुरू होता. मात्र, त्याची जराही गंभीर दखल विद्यापीठाने घेतली नाही अन् अखिलेश यादव यांच्या सरकारनेही घेतली नाही!

यासिन मलिकचा देशद्रोह

अफझल गुरूला फासावर चढविल्यानंतर दोन दिवसांत ‘जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट’ चा नेता यासिन मलिकने इस्लामाबादेत हफीज सईदच्या मांडीला मांडी लावून व्यासपीठावर बसावे, हा योगायोग असूच शकत नाही. हफीज सईद हा मुंबईवर झालेल्या दहशती हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे. इस्लामाबादेतली ही शोकसभा अफझल गुरूसाठीच होती. मलिक हा पाकिस्तानचा नागरिक असणार्‍या आपल्या पत्नीला भेटण्यासाठी तिथे अनेकदा जातो. त्याने, अफझल गुरूला फाशी होणे, हा भारतीय लोकशाहीवरचा कलंक आहे, असे तारे या सभेत तोडले. पाकिस्तानात गेल्यावर भारतावर दुगाण्या झाडायच्या, ही मलिकची जुनी सवय आहे. मात्र, यावेळी त्याने भारताचा कट्टर वैरी असलेल्या हफीज सईदसोबत व्यासपीठावर बसून देशद्रोही वर्तनाच्या सीमा ओलांडल्या. हफीज सईद त्या सभेत केवळ १५ मिनिटेच होता, असे सांगत सारवासारव मलिकनी केली. काश्मीर पाकिस्तानमध्ये विलीन करून टाका, असे म्हणणारे इतर दहशती गट व यासिन मलिकची ‘जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट’ यांचे मतभेद आहेत. फ्रंटला जम्मू-काश्मीरचे स्वतंत्र राष्ट्र हवे आहे. भारत हा दोघांचा समान वैरी आहे. त्यामुळेच, सईदच्या शेजारी बसण्यात मलिकचा हेतू सरळ नाही हे स्पष्ट आहे.

कोण आहे यासिन मलिक?

यासिन मलिक भारतविरोधी दहशतवादी आहे. जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा हा नेता. त्या संघटनेतही या माणसाने आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी उभी फूट पाडली. जेकेएलएफच्या एका फुटलेल्या तुकड्याचा हा प्रमुख आहे. मात्र आपले महत्त्व वाढविण्यासाठी तो भारत सरकारसोबत मवाळ होऊन चर्चा करण्याचे नाटक करतो. याची ही दुटप्पी नीती वारंवार चालू असूनही भारत सरकार पुन्हा पुन्हा त्याच्याशी लाडेलाडे वागू लागते. यासिन मलिकवर १९८७ मध्ये भारतीय वायुसेनेच्या चार जवानांची हत्या केल्याचा गंभीर आरोप होता. या आरोपाखाली याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो एक वर्ष जेलमध्ये होता. भारतीय लष्करातील अधिकार्‍यांचे जीव भारत सरकारला फारच स्वस्त वाटतात की काय? मग चार अधिकार्‍यांचे खून करणार्‍या या देशद्रोह्याची त्या प्रकरणातून सुटका कशी झाली? त्यानंतर १९९४, १९९९, २००२ या वर्षी त्याला अटक झाली आणि अर्थात सुटकाही झाली. २००२ साली तर त्याला पोटा लावला होता. मात्र तरीही तो त्यातून सुटला.

यासिन मलिक एका आजाराचे कारण दाखवून कितीतरी गंभीर आरोपातून जेलमधून सुटू कसा काय शकतो ? देशात सर्वसामान्य माणूस तुरूंगात असेल तर त्याने आजारपणाचे सोंग केले तर सरकार त्याला सोडेल काय? मग यासिन मलिकवर सरकारने मेहेरनजर का केली? सरकारच्या या मेहेरनजरेमुळेच हा माणूस खतरनाक गुन्हे करूनही वारंवार तुरुंगातून सुटला आहे. केवळ तुरुंगातून सुटला नाही तर नातेवाईकांना भेटण्याचे निमित्त करत पाकिस्तानात गेला. हा माणूस देशविरोधी आहे, पाकिस्तान धार्जिणा आहे हे सर्व माहिती असूनही सरकारने याला पाकिस्तानला जाण्याचा परवाना दिलाच कसा? देशातील सामान्य माणूस पासपोर्ट मागतो तर सरकार आणि पोलिस खाते त्यांच्या सतराशे साठ चौकशा करते, शंभर कागदपत्रे मागते. मग या उघड उघड देशद्रोही आणि लष्करी अधिकार्‍यांच्या खुनाचे आरोप असलेल्या माणसाला सरकारने पासपोर्ट दिलाच कसा? तोही पाकिस्तानात जाण्याचा पासपोर्ट दिला कसा? वारंवार देशविरोधी गंभीर गुन्हे करणार्‍या या माणसावर सरकारने मेहेरनजर ठेवल्यानेच हा शिरजोर झाला आहे. याच्याशी कसलीही चर्चा करता कामा नये. याला कसलीही सवलत देता कामा नये. गुडघे टेकविणार्‍या सरकारने असे इतके दिवस का चालू दिली? यापुढेही हे चालू देणार काय? या प्रश्‍नांची उत्तरे भारतीय जनतेला दिली पाहिजेत. सरकारच्या कृपेने हे जर भारताचेच वाईट चिंतणार असतील तर यांची मस्ती निर्दय होऊन उतरवली पाहिजे!

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..