19 ऑक्टोबर, शांताबाईं चा जन्मदिवस….. ज्यांचं साहित्यही व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच स्वच्छ, निर्मळ, नितळ, प्रसन्न, स्निग्ध, आनंददायी व शालीन आहे अशा ज्येष्ठ साहित्यिक! खरंतर मी आज शांताबाईंबद्दल लिहितेय म्हणजे खरंतर सूर्य नि काजवा असंच काहीसा होईल पण फक्त त्यांच्या माझ्यातील ‘शब्दबंध’ या एका गोष्टीवर भिस्त ठेवून मी बिनधास्त लिहितेय…. आशा आहे खुद्द शांताबाई या वेड्या प्रयत्नाला चालवून घेतील… 🙂 शांताबाईंशी प्रत्यक्ष परिचय होणं हे तर काही भाग्यात नव्हतं पण अगदी शालेय जीवनात…..पाठ्यपुस्तकातून ‘आजीची पैठणी’ घेऊन भेटलेल्या शांताबाई मग निरंतर भेटत राहिल्या ते त्यांच्या समृद्ध लेखणीतून…. प्रत्येक प्रसंगात… वयाच्या प्रत्येक टप्प्यावर…. त्यांची सोबत म्हणजे एक स्नेहल आश्वासक असा मायेचा स्पर्शच जणू…त्या कधी चिमण दातांनी वाटून खाल्लेल्या चिंच बोरांपासून ते अगदी चांदणगप्पा वाटून घेणाऱ्या सखी प्रमाणे भासल्या तर कधी अल्लड उनाडणाऱ्या सावरीच्या कापसाप्रमाणे मनमोहक वाटल्या….. कधी प्रेमाच्या गोड-गुलाबी दुनियेच्या मुशाफिरीत हमसफर बनल्या तर कधी याच प्रेमाच्या खोल डोहाचे अंतरंग ही उलगडून दाखवले. त्यांच्या शब्दफुलांचा हा सुगंध रायआवळ्याच्या आंबट-गोड चवी सारखा मनात झिरपत जातो…. ‘लाडकी बाहुली’ या कवितेत सहा-सात वर्षांच्या चिमुरडीच्या आपल्या बाहुलीबद्दलचा जिव्हाळा असो की पहिल्यांदा मातृत्वाची चाहूल लागलेल्या स्त्रीचं भावविश्व असो बाई मनाचा ठाव घेत जातात हे निश्चित…. “भरुन, भरुन, आभाळ आलंय भरल्या वटीनं जड जड झालंय शकुनाचा आला वारा, माझ्या मनात ओल्या धारा आला वास ओला, मातीचा सोयरा तुला चिंचा बोरं देऊ का ही, देऊ का ही गं काय मनात कानात सांगून दे तू माझ्या बाई गं पान पानाला सांगून जाई, कणी सुखानं भरली बाई गळूनी फूल आता, फळ आलं मोहरा भर दिसा कशाची चाहूल आली आली बाई गं जीव उगाच वेडा हसतो, पुसतो काही बाई गं कशी इकडचं घेऊ नावं, माझं गुपित मजला ठावं फिरत्या पावलांचा झाला गं भोवरा कालची अल्लड पोर आज स्वतः माय होणार… निसर्गानं आपलं गोड गुपित तिच्या ओंजळीत टाकलंय…. दिलाय तिला वर त्याच्याशी आत्मरूप होण्याचा… अशावेळी मग ती त्याच्यात स्वतःला बघते… हे गुज आणखी सांगणार तरी कोणाला….:) तोच तिचा सखा बनतो नि वाटाड्याही… त्यांच्या कवितेची नायिका ही बंडखोर नाही… उगा आव आणून स्वतःला गरीब बिचारी म्हणवणारी ही नाही… तिच्यात आहे एक उत्फुल्लपणा जो निसर्गदत्त आहे.. सलज्जतेच्या अवगुंठनातला तिचा वावर कुठेही बटबटीत वाटत नाही…. तिचं असणं हे सहजच वाटत राहातं…. त्यात कृत्रिमता नाही… तिचा वावर मनात घरंगळत राहतो… माजघरातल्या बांगडीच्या नाजूक किणकिणीसारखा किंवा मग रुणझुणत्या पैंजणासारखा…. “तुझे हात या क्षणी माझ्या हातांत आहेत, तुझं गरम श्वास चेहऱ्यावर जाणवतो आहे मला आणि तरीही तू मैलोगणती दूर माझ्यापासून आपापल्या ग्रह-गोलांवर वस्ती करून आहोत आपण…. आशा वेळेस मग शब्दांचेच बनते धुके मनातले उत्कट आशय राहतात मुके…” सहज प्रेमाची अभिलाषा धरणारी ही नायिका किती आपल्यातलीच वाटून जाते… पण त्याचवेळी त्यांची नायिका ही फक्त गुडी-गुडी न वाटता एक हळव्या पण खंबीर मनोवृत्तीच्या स्त्रीच्या रुपानं तितक्याच ताकदीनं आपल्यापुढे येतं ते त्यांच्या ‘मौनातून’ ह्या कवितेतून…. “आतल्या हळवेपणावर तिने आता चढवले आहे एक भरभक्कम चिलखत, मनात नसेल तेव्हा अतिपरिचित स्नेह्यांनाही ती नाही देत प्रतिसाद, नाही ओळखत तिच्यासमोर अनेक प्रश्नचिन्हे डोळे वटारुन बघणा-या समस्या ज्यांच्याशी करायचा आहे तिचा तिलाच मुकाबला, आता कुठे तडजोड नाही लाचार माघार नाहीच नाही तिचा लढाच आहे मुळी इतरांहून वेगळा” नातेसंबंधातली नाजूक गुंतागुंत… आपल्या मनाच्या तळाशी खोलवर गुंतलेली एखादी प्रतिमा कधी कधी एवढी वेगळी भासते की आपल्या मनात ठसलेलं रूप खरं की जे समोर दिसतंय ते खरं मानावं??? सगळाच गुंता…. तरिही काही चांदणस्पर्श मनात रुतून बसलेले असतातच की… “गाढ स्नेह असला तरी कधी येतात असे क्षण व्यक्तित्वाचा गूढ मुखवटा त्याच्यामागे विराट पोकळी गर्द राने, एकाकी वाटा, चांदण्यात न्हालेली तळी….” अशावेळी विफल नात्यांचे ठुसठुसणारे बंध जगणंच नाकारू बघतात… आला क्षण आपला…. जे आपलं नाहीच त्याचा शोक ही वृथाच…हे समजवावं त्यांनीच…. “जाणार्याची वाट अडवू नये… तेव्हा त्याचे डोळे वेध घेत असतात दूरच्या फसव्या क्षितिजाचा… तेव्हा परतवू नये टी नजर माजघरातल्या उबदार काळोखाच्या आश्वासक अंधारात… कधी हात सुटण्यासाठीच जुळतात… आपण कोरड्या डोळ्यांनीस्वतःलाच निरखावे पुढे पडणारे प्रत्येक पाऊल नीट जोखावे कदाचित हेच असेल प्राक्तन आणि असेलही हेच सुंदर भविष्याचे आश्वासन…” नातं जोपासता नं आल्याची खंत बाळगायला त्या ठाम नकार देतात… तो ही श्वास घ्यावा इतका सहज…नात्यांचा सहज स्वीकार मनात रुजवणार्या शांताबाई मागे उरू पाहणारा वेदनेचा हुंकार सुसह्य बनवतात आणि म्हणूनच खूप आश्वासक वाटतात… संबंधांचे अर्थ कधीच लावू नयेत त्यांचा फक्त नम्र कृतज्ञतेने स्वीकार करावा जसा पाण्याचा झुळझुळनितळ जिव्हाळा जुळलेल्या समंजस ओंजळीत धरावा. संबंधांचे धागे कधीच उलगडू नयेत ते फक्त प्राणांभोवती सहज घ्यावेत लपेटून, जसे हिवाळ्यातल्या झोंबर्या पहाटगारठ्यात अंगांगी भिनवीत राहावे कोवळे धारोष्ण ऊन्ह. संबंध तुटतानाही एक अर्थ आपल्यापुरता…. एक धागा… जपून ठेवावा खोल हृदयात एखादे रखरखीत तप्त वाळ्वंट तुडवताना माथ्यावर आपल्यापुरती खासगी बरसात…” आयुष्य आपल्या वाटेनं जात राहीलं, कधी सरळ रस्ता तर कधी वळणवेड्या वाटा येत राहिल्या मार्गात… पण प्रवास थांबला नाही… आता मुक्कामाचा ठिकाण जवळ येतंय.. डोळे लागलेत पैलतीराकडे…परतीच्या प्रवासाचं काउंटडाऊन सुरु झालंय… अशावेळी…. “घेरीत आल्या काळोखाच्या वत्सल छाया दुःखाचीही अशी लागते अनवट माया आक्रसताना जग भवतीचे इवले झाले इवले झाले आणिक मजला घेरीत आले” सुख काय नि दुःख काय सारच एक सारखं…. आताशा सुखाने हुरळून जन होत नाही की दुःखाचे कढ पापण्या भिजवत नाहीत…. आता दुःखाची ही माया वाटायला लागते… आजवरच्या वाटचालीत असंख्य वेळा ठेचकाळलो, खूप वेळा डाव मांडला नि मोडला, घाव बसत राहिले तसे सोसायला बळ देणारी ठिकाणंही सापडली, आता या क्षणी मात्र सुख-दुःखाची सीमारेषाच पुसली गेलीय…. आजवर ज्या ज्या गाठी बसल्यात त्या मोकळ्या होतायत…. आणि मग “मी दुःखाच्या कुपीत आता मिटते आहे एक विखारी सुगंध त्याचा लुटते आहे सुख-दुःखाच्या मधली विरता सीमारेषा गाठ काळजातली अचानक सुटते आहे” किती सहज…. एकदम पटून जातं….एकांगीपणाचा कसलाही छाप न मिरवता त्यांनी ज्या वाटा चोखाळल्या त्यावरून त्यांच्या अनुभवसंपन्न प्रतिभेचं गारुड जाणवत रहातं….. मानवी आयुष्यातली अनिवार्यता ज्या सहजतेनं त्या शब्दांकित करू जातात त्याला तोड नाही….. “आता पाण्यातून उठे एक निःश्वास व्याकूळ ऐल बुडणारे घर पैल अलभ्य गोकुळ…” अनेक प्रसंगात जाणवलेली अगतिकता तितकीच सच्ची वाटत रहाते… “कसे न तेव्हा कळ्ले काही की तो होता आवच सार अनुभुतीच्या आधाराविण पोकळ नुसता शब्दपसारा ! नव्हती झाडे, नव्हत्या फांद्या मातीमधली मुळेहि नव्हती, तरारलेल्या ताठ तुर्यांचा डौल तेवढा होता वरती !” मोठा गोल चेहरा, भव्य भालप्रदेशावर ठळक कुंकू, चष्मा, डोक्यावरून पदर, बोलण्यात अदब, स्निग्धता आणि मार्दव. या अशा व्यक्तिमत्त्वातून त्यांच्यातला खानदानीपणा दिसून येई. त्यांचा व्यासंग, बुद्धिमत्ता व अफाट स्मरणशक्ती यांमुळे त्यांचं लिहिणं खळाळत्या प्रवाहासारखं ओघवतं राहिलं.. एका लेखात मावण्या इतक्या शांताबाई सान खचितच नाहीत ना त्यांना शब्दबद्ध करू शकण्याइतकी मी मोठी…. पण तरीही ही शब्दओंजळ खास त्यांच्यासाठी. एक ऋणानुबंध जपण्याचा छोटासा प्रयत्न जो जडलाय आपल्या नि त्यांच्या मध्ये… जो या साऱ्या रीतीभाती पल्याडचा आहे… असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे अगदी नक्की….. श्रद्धा
— श्रद्धा कुलकर्णी
Leave a Reply