नवीन लेखन...

शाळेतला पावसाळा

रैनाने पटापट आवरलं तरी आता तिला शाळेत जायला उशीर होतंच होता. सकाळी बरोब्बर आठ वाजून पाच मिनिटांनी तिची स्कूल बस येते. आठ वाजले तरी रैनाची आंघोळ व्हायची होती. त्यातच तुला “हे करायला नको, तुला ते करायला नको’ अशी आईची आरती सुरू होतीच. आता ऊशीर झाल्याने शाळेत मार खावा लागेल त्यापेक्षा प्रेमळ भुताला बोलावलेलं बरं, असा रैनाने विचार केला.

रैनाने डाव्या हाताची मूठ घट्ट बंद केली. उजव्या हाताच्या तळहातावर डाव्या हाताची मूठ ठेवली. उजव्या हाताच्या चार बोटांनी ही मूठ पकडली पण अंगठा मात्र सरळ ठेवला. मग डोळे बंद करुन मुठीमधे तीन वेळा फुंक मारत, दोन वेळा हळूच म्हणाली,“प्रेऽऽऽमळ भूऽऽत.. .. प्रेऽऽऽमळ भूऽऽत”
त्याक्षणी रैनाच्या मानेवरुन एक बर्फाचा खडा घरंगळत गेला. आणि खिशिफिशी हसत प्रेमळ भूत म्हणालं, “बोल रैना काय मदत कर? तुझी शाळा नदीत नेऊन ठेवू? की तुझ्या शाळेत वाघ सिंह पाठवू?”
“अरे तू पाहतो आहेस ना.. मला ऊशीर होतोय.. मला मदत कर.”

“ओके..बोके..पक्के.. काम शंभर टक्के” प्रेमळ भूत खुसफूसलं.
पाचच मिनीटात रैनाची स्कुल बस आली आणि तिथेच बंद पडली. ड्रायव्हरने खूप प्रयत्न केले पण गाडी सुरूच होईना.
स्कुल बस पाहताच आई रैनाला ओरडू लागली,“चल आटप लवकर.”
पण रैनाने अजिबात घाई गडबड केली नाही. तिने सावकाश आवरलं. आणि ती बस जवळ गेली. रैना बसमधे चढताच बस सुरू झाली. रैनाची सॅक आपोआप हवेत तरंगत वर गेली. रैनाला कळलं,सॅकमधे प्रेमळ भूत बसलं आहे.

ती मनातल्या मनात भुताला म्हणालि,“तू शाळेत नको येऊस. तिथे वर्गातल्या सरांचं ऐकावं लागतं.”
प्रेमळ भूत गयावया करत म्हणालं,“येतो ना गं प्लीज. मी सरांनी सांगितलेलं सगळं ऐकीन. आणि तुला मदत पण करीन.”
बस बिघडली असल्याने शाळेत पोहोचायला ऊशीर होईल असं वाटलं होतं. पण बस अशा काही तुफान वेगाने गेली की ड्रायव्हर चक्कर येऊन पडला तरी बस वेळेवर पोहोचली. ज्या मुलांना भीती वाटली त्या मुलांना झोप आली व शाळा आल्यावर जाग आली.
सगळे वर्गात गेले.
शाळा सुरू झाली. जोशी सर वर्गात आले. सगळी मुले उठून उभी राहिली. पाठोपाठ रैनाची सॅकपण हवेत ऊंच गेली. सरांनी मानेनें खूण केली. सगळी मुले बसली पण सॅक मात्र हवेतच तरंगत राहिली.

सरांनी काही प्रेमळ भुताला बसायला सांगितलं नाही म्हणून ते हवेतल्या हवेत उभंच होतं.
हवेत तरंगणारी सॅक पाहून सर दचकले. पण पटकन रैनाने सॅक खालि ओढली.
आज भूगोलाचा तास होता. हवामान व पाऊस असा विषय होता. इतक्यात मुलांनि काहीतरी गडबड करायला सुरुवात केली.
सर वैतागून म्हणाले,“आधी मी सांगतो ते ऐका..”
प्रेमळ भुताला वाटलं आता सर जे जे सांगतील ते ते ऐकलं पाहिजे.
सर म्हणाले,“समुद्राच्या पाण्याची वाफ होते.”
त्याक्षणी खिडकीतून गरमागरम वाफेचे लोटच्या लोट वर्गात येऊ लागले.
मुले घाबरली. त्यांनि खिडक्या बंद करण्याचा प्रयत्न केला, पण छे!
जरा घाबरुनच सर म्हणाले,“याच वाफेचे ढग बनतात.”
आणि काय चमत्कार, वर्गात वाफेचे ढग तरंगू लागले. इकडे तिकडे फिरू लागले.मुले आरडा ओरडा करू लागलि. ढगांना हात लावू लागलि. बाकावर उभं राहून ढगात जाऊ लागली. हातांनी ढग इकडे तिकडे ढकलू लागली. वर्गात अंधारुन आलं.
सरांना ही कळेना हा काय प्रकार सुरु आहे? त्यांनी घाबरत थरथरत विचारलं,“इथे काही भुताटकी तर नाही ना?”
त्याक्षणी वर्गात ढगांचा गडगडाट होऊ लागला. एक ढग हसत-हसत गडगडला, “होऽऽऽ आहे भुताटकी.. पण प्रेमळ भुताटकी..”
सरांचे पाय लटपटू लागले. त्यांच्य हाता-पायाला कंप सुटला. जीभ तोंडात लडबडू लागली.
मुले म्हणाली,“सर शिकवा.. पुढे बोला..”
सर कसंबसं म्हणाले,“या ढगांना गार हवा लागली की..”
वर्गात गार हवा वाहू लागली. वाऱ्याचा वेग वाढला. गारवा अंगाला झोंबू लागला. ढग गरागरा फिरु लागले. मुले चेकाळली. धमाल आरडओरडा करू लागली.
सरांना चक्कर येऊ लागली. असं कसं होतंय तेच त्यांना कळेना.
मुले म्हणाली,“सर शिकवा.. पुढे बोला..”
सर लडबडत म्हणाले,“ढगांना गार हवा लागली की मग पाऊस पडतो.. ..”
वर्गात मुसळधार पाऊस पडू लागला.
वर्गात मुलांच्या कंबरेपर्यंत पाणी तुंबलं. वर्गाचा दरवाजा उघडा असूनही पाणी काही बाहेर जाईना. मुले बाकावर उभं राहून पावसात नाचू लागली. पाण्यात डुंबू लागली. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवू लागली. मुलांच्या वह्या, पुस्तकं आणि सॅक वर्गात तरंगू लागल्या.
जोशी सरांना कापरं भरलं. त्यांची पँट भिजली. शर्ट भिजला. हातातले पुस्तक भिजले.
पावसात भिजत आणि पाण्यावर तरंगत मुले म्हणाली,“सर शिकवा.. पुढे बोला..”

वर्गातली टेबल खूर्चि आता पाण्यावर तरंगू लागली होती. मुलांची बाकं बाजूला तरंगत जाऊन मधल्या हौदात मुले धुमाकुळ घालत होती.
सरांची भीतीने बोबडी वळली होती. तरी ते पुटपुटले,“पाऊस पडल्यावर गवत उगवतं..झाडं उगवतात..”
त्याक्षणी वर्गात गवत उगवू लागलं. चिकूची, आंब्याची, सफरचंदाची, जांभळाची, डाळींबांची झाडं वर्गात उगवली.
मुले आता झाडावर चढून पाण्यात उड्या मारू लागली.
काही मुले छोटे चिकू, छोटे आंबे खाऊ लागले. एकमेकांना फळं फेकून मारू लागले.
वर्गात धमाल कल्ला सुरु होता.
इतक्यात लांबून मुख्याध्यापकांचा आवाज ऐकू आला, “काय दंगा चाललाय त्या वर्गात..?”
जोशी सर भिजले होते तरी त्यांच्या तोंडचं पाणी पळालं!
रैना भुताला म्हणाली,“अरे आम्हा मुलांना पहिल्यासारखं नीट कर. नाहीतर मुख्याध्यापक आमची धुलाई करतील.”
“ओके..बोके..पक्के.. काम शंभर टक्के” प्रेमळ भूत खुसफूसलं.
वर्गातली झाडं व गवत गायब झालं. पाणी उडून गेलं. टेबल, खुर्ची व बाकं जागेवर आली. मुले चक्कं कोरडी झाली. मुलांच्या वह्या, पुस्तकं व सॅक एकदम कोरड्या ठणठणीत.
फक्त जोशी सर चिंब भिजलेले होते.
इतक्यात रागीट मुख्याध्यापक वर्गात आले. त्यांनी पाहिलं तर, सगळी मुले शांत बसलेली पण सर मात्र भिजलेले.
मुख्याध्यापक भडकले. रागाने लालेलाल झाले. ते सरांवर गुरकावत म्हणाले,“तुम्ही असे भिजलात कसे? वर्गात काय आंघोळ करता काय?”
जोशी सर भीतभीत म्हणाले,“आधी वर्गात वाफ आली. मग त्या वाफेचे ढग झाले. त्या ढगांना गार हवा लागली. त्यातून पाउस पडला. त्याच पावसात मी भिजलो.”
मुख्याध्यापक हळूच पुटपुटले,“मला काय मूर्ख समजता का?” मग ते सावकाश चालत जोशी सरांच्या जवळ गेले. त्यांच्या डोळ्यात काही वेडाची झांक दिसते का, ते पाहू लागले.
त्यांच्या ओल्या पाठीवरुन हात फिरवत म्हणाले,“मग काय झालं पाऊस पडल्यावर..?”
सर थरथरत म्हणाले,“वर्गात झाडं उगवली..”
हे ऐकताच मुख्याध्यापक खो खो.. ठो ठो.. हसू लागले. मोठमोठ्याने हसू लागले.
इतक्यात अचानक छतातून नळ सुटल्याप्रमाणे मुख्याध्यापकांच्याच अंगावर बदाबदा पाणी पडलं. तरिपण फक्त त्यांचि पँटच भिजली शर्ट मात्र सुका!!
आणि कशी कुणास ठाऊक, पण शाळेची घंटा जोरजोरात वाजली.
शाळा सुटली. मुले पळाली.
घरी जाताना रैनाने भुताला विचारलं,“काय रे, तु आम्हा सर्वांना कोरडं केलंस, मग सरांन का नाही केलंस?”
“अगं तू मला काय सांगितलं होतंस ते आठव ना..ठ प्रेमळ भुताने असं म्हणताच रैनाला आपली चूक कळली.
“नंतर तू त्या मुख्याध्यापकांना का भिजवलंस रे?”
खिशिफीशी हसत भूत म्हणालं,“अगं नाहितर आपल्या बिचाऱ्या जोशी सरांना.. .. ..”

काऽऽय? प्रेमळ भुताचं हे वाक्यं तुम्ही पुरं करू शकाल? तसं भुताला कळवाल? त्याला इमेल कराल?
आणि,
तुम्हाला काय वाटतं, शाळेची घंटा कुणी वाजवली असेल?
न भीता भुताला कळवा. त्याला इमेल करा. भूत तुम्हाला नक्की उत्तर पाठवेल.
कारण,
आपलं प्रेमळ भूत लहान मुलांना कधीच त्रास देत नाही. पण जी मोठी माणसं लहान मुलांना त्रास देतात त्यांना मात्र फटके देतं. किंवा आणखी काही गमती करतं.
प्रेमळ भूत तुम्हा मुलांच्या पत्रांची किंवा इमेलची नेहमीच वाट पाहात असतं.

– राजीव तांबे.

Avatar
About राजीव तांबे 45 Articles
श्री राजीव तांबे हे गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. ते मुलांसाठी गंमतशाळा, शिबिरे वगैरेंचे नियमित आयोजन करत असतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून विविध वृत्तपत्रांमध्ये ते नियमितपणे लेखन करत असतात. मुलांसाठी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक खेळणी बनविलेली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..