नवीन लेखन...

शिक्षा पद्धती – एक दृष्टीक्षेप

आधुनिक शिक्षा शास्त्रज्ञांना एक महत्वाचा प्रश्न सतावीत असतो की, जुन्या काळच्या शिक्षा नवीन गुन्हेगारांनादेखील चालू ठेवणे योग्य ठरेल का? त्यात आवश्यक बदल करता येतील का? बदल कोणत्या प्रकारच्या गुन्हेगारांना करता येईल? गुन्हेगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात कशा प्रकारे सामील करावे आणि त्यांचा गुन्हेगारीचा डाग नाहीसा करून ते समाजाचे चांगले घटक

कसे बनतील?

जगातील सर्वच देशांचे गुन्हेगारांना शिक्षा करणे हे प्रमुख कर्तव्य असते. समाजात वाईट कृत्ये घडतच राहणार आणि त्यांचेवर नियंत्रण ठेवून समाज सुधारणे हे अव्यहत चक्र चालूच आहे. गेल्या 200 वर्षांपासून या बाबतीत अभ्यास होत आहे.कारण समाजाच्या कल्पना बदलत आहेत. सामाजिक मूल्ये बदलत आहेत. अलीकडे समाजामध्ये मंथन होत आहे की, गुन्हेगारास नाहीसे करायचे की त्याला एखादा रुग्ण, आजारी समजून औषधाप्रमाणे उपाययोजना करायची की, एखादे लहान मूल समजून त्याला कडक शिस्त लावणे जरूरीचे आहे? का सरळ कडक शिक्षा देऊन इतरांना धडा शिकवायचे की, अपराध करणे चांगले नसते. सर्व जगाला हा प्रश्न भेडसावित आहे की, गुन्हेगार, अपराध आणि शिक्षा यांची संगती कशी लावायची आणि त्यामधून काय साध्य करायचे? तत्त्वज्ञ श्रीयुत् सामंड म्हणतात की,’अपराध (crime) म्हणजे कायद्याने मान्य केलेले घोकादायक कृत्य होय. अपराधी हे त्याचे भक्ष्य ठरते. एकाने खून केला तर दुसऱ्याचा जीव जातो पण त्या कुटुंबाचे मोठे नुकसान होते. भरपाई मिळत नाही. कायमचे नुकसान होते. सरकारतफेर् आरोपीला शिक्षा होते. फाशी अगर जन्मठेप आणि दंड शिक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. अपराधाच्या स्वरूपानुसार शिक्षा दिल्या जातात.’

शिक्षेच्या वेगवेगळ्या पद्धती : मुख्यता चार प्रकारच्या आहेत.

1 – कडक (Deterrrent) 2 – निरोधक. 3 – दुष्कर्म फलदायक (Retributive) अपराधाच्या मानाने सूडात्मक. 4- प्रतिबंधात्मक (Preventive)

समाज कल्याणाकरता प्रत्येक देशामध्ये आरोपीला शिक्षा दिली आहे. परंतु बदलत्या परिस्थितीत शिक्षा शास्त्रज्ञांचे विचार पण सुधारित झाले आहेत. प्राचीन काळातील शिक्षा आधुनिक नवीन विचाराचा परिणाम होऊनदेखील मुख्यत: पुढील चार प्रकारच्या शिक्षा मान्य झाल्या आहेत.

1) कडक शिक्षा (Deterrent):यामध्ये शिक्षा कडक स्वरूपाची असावी हा विचार आहे. त्याचा उद्देश असा असतो की, गुन्हेगाराने पुन्हा गुन्हा करण्यापूर्वी विचार करावा. त्याला धडा मिळाला पाहिजे. त्या शिक्षेचा परिणाम इतरांवरदेखील होतो की, ज्यामुळे ते अपराध करण्यापासून परावृत्त ह्वावेत. गुन्हेगारास आणि इतर गुन्हा करणाऱ्यांना त्यातून भीती आणि चेतावणी मिळते. परंतु निर्ढावलेल्या अट्टल गुन्हेगारांवर त्याचा परिणाम होत नाही. इतर नवीन गुन्हेगारांवर त्याचा फारसा परिणाम होत नाही; कारण पुष्कळ अपराध अचानक पूर्वनियोजन न करता क्षणिक भावनेत घडतात. निर्ढावलेले अपराधी त्या शिक्षा भोगून परत अपराध करतात. शिक्षा होऊन परत तुरुंगात येतात! त्यांना तुरुंगातील जीवनच आवडते. बाहेर मोकळेपणे समाजात काम करायची इच्छा नसते. त्यामुळे शिक्षेचा उद्देश सफल होत नाही. कारण असा अनुभव आहे की, जाहीर फाशी देत असता त्या गर्दीमध्येच पिक पॉकेटिंगचे अपराध घडत. इतकेच नव्हे तर मारामाऱ्या, खून देखील पडत. पूर्वीच्या काळी समज होता की, गंभीर अपराध करणाऱ्या व्यक्तीमध्ये एक प्रकारची दुष्ट प्रवृत्ती असते, भूतपिशाच्चवृत्ती संचारत असल्याने अपराध केलेला आहे या कल्पनेने कडक शिक्षा दिली जात असे.

2) दुष्कर्म फलदायक (Retributive) :या शिक्षेमागे हेतू हा की, दुष्ट विचारांचा नायनाट करण्याकरता तशाच प्रकारची धडा शिकवणारी शिक्षा असावी. मग त्याचे परिणाम विचारात घेऊ नयेत. अपराध्याला अपराध करून जर सुख मिळाले असेल तर त्याची अद्दल त्यास घडविणे होय. समाजाचा त्या शिक्षेमधून तिरस्कार दिसला पाहिजे. आरोपीने जे कृत्य केले त्याप्रमाणात त्याने ते फेडावे ही कल्पना यामागे आहे.या प्रकारची शिक्षा म्हणजे आरोपीवर सूड उगविण्यासारखे आहे. त्यामुळे अशी शिक्षा उपयोगी नाही. अशा प्रकारची शिक्षा म्हणजे गणिती सूत्रासारखी होय. ‘म्हणजे अपराधाचे इक्वेशन असे तयार होते की, शिक्षा = निरपराधित्व’ बहुतेक शिक्षा शास्त्रज्ञांना मान्य नाही की, ‘अपराध्यांना शिक्षा झालीच पाहजे म्हणजे ती त्यांनी केलेल्या कृत्याची भरपाई केलीच पाहिजे.’ कारण की, पुष्कळ अपराधी असे मानतात की, दिलेली शिक्षा भोगून झाली की माप पुरे झाले. आता पुन्हा नवीन अपराध करण्यास हरकत नाही. म्हणूनच तत्त्वज्ञ श्रीयुत् हेगल म्हणतो की, ‘अशी शिक्षा म्हणजे एक प्रकारचा सूड घेणेच होय’ तो पुढे म्हणतो की ‘तू मला इजा दुखापत केली म्हणून मी अता तुला करणार. वास्तविक शब्दश: याचा अर्थ हाच होतो आणि मी जर दुखापत करू शकलो नाही तर मी इतरांकडून तुला दुखापत करवीन.’

3) प्रतिबंधात्मक (Preventive): यामागे तत्व असे आहे की, ‘अपराध घडू नये तर तो थांबला पाहिजे’ या संदर्भात तत्वज्ञ श्रीयुत् किरटे म्हणतो की,’ ‘प्रत्यक्षात फौजदारी कायदे अमलात आणायचे नसतात. उदा: जेव्हा जमिनीचा मालक त्याच्या जमिनीत सूचना फलक लावतो की जमिनीत अतिक्रमण करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर इलाज केला जाईल’ यामागे जमीन मालकाचा उद्देश असतो की, प्रत्यक्षात कोणी अतिक्रमण करू नये आणि मग जमीन मालकास केस देणे, कोर्टात जाणे याचा त्रास होऊ नये. लावलेला सूचना फलक गुन्हेगारास धमकी देईल की त्यापासून तो परावृत्त व्हावा. म्हणजे भविष्यात त्याने गुन्हा करू नये. यालाच प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) म्हणतात. म्हणजेच सूचना फलक लावण्याचा उद्देशच असा आहे की, अपराध घडू नये. आधीच सूचना केली आहे. त्यामुळे अतिक्रमणाचा अपराध करण्यापासून सर्वसाधारण जनतेला आधीच सूचना केली आहे.

सुधारणा करण्याकरता (Reformative) पद्धत :अपराध्यांना शिक्षा देणे बाबत अधिक नवीन विचारसरणी पुढे येऊ लागली. त्यातूनच गुन्हेगारांना सुधारावे, त्यांचे जीवनात नवीन आशा निर्माण कराव्यात

हा विचार पुढे येऊ लागला आणि गुन्हेगारास शिस्तबद्ध नागरिक बनवावा हा विचार मूळ धरू लागला. गुन्हेगाराचा कायदा पाळणारा नागरिक तयार व्हावा या विचारास चालना मिळू लागली. म्हणजे शिक्षेचा उद्देश आरोपीस जाच-त्रास देण्याचा नसून त्याला सुधारून समाजात चांगला नागरिक बनविणे हा आहे. त्याचे समाजात पुनर्वसन करणे हा आहे. तुरुंगातदेखील गुन्हेगारांना सुधारणे हाच उद्देश असावा असे या पद्धतीचे पुरस्कर्ते म्हणतात. कायद्यामधील तरतुदी ‘पॅरोल’ आणि ‘प्रोबेशन’ यांची शिफारस केली जाते. कारण त्याचा वापर केल्याने गुन्हेगार चांगले नागरिक बनतील आणि त्यांना समाजात चांगले स्थान मिळेल. आरोपींना शिक्षा द्यावी पण त्याचा उपयोग त्याचे भविष्य सुधारण्याकरता असून त्याने केलेल्या भूतकाळातील कृत्यांना शिक्षा देणे हे योग्य नाही. शिक्षेचा उद्देश आरोपीचा जुना हिशेब मिटावा हा नसावा तर नवीन खाते उघडण्याचा असावा. या पद्धतीप्रमाणे आरोपी जरी तुरुंगात शिक्षा भोगत असला तरी त्या काळात त्याला एकटेपणा नसावा, तर त्याची सुधारणा कशी होईल ते पाहावे आणि तो तुरुंगामधून सुटल्यावर त्याचे पुनर्वसान चांगल्या पद्धतीने होईल याकडे लक्ष द्यावे. शिक्षा देणे हाच अंतीम उद्देश नसावा तर तो एक मार्ग असावा की ज्यामुळे त्याची सुधारणा होत राहील.रशिया – फ्रान्स देशांमधील तुरुंगाबाबत तत्त्वज्ञ श्रीयुत पिटर क्रोपोकीन म्हणतो, ‘येथील तुरुंग म्हणजे मागासलेपणाचा नमुना आहे. अपयशाचे मूळ कारण दारिद्र्य, विषमता, बेकारी, अज्ञान, लोकसंख्या वाढ ही आहेत. त्याचा विचारच केला जात नाही.’ सुधारणा करणे या पद्धतीत प्रत्यक्ष शिक्ष
नसातेच. त्यामुळे ही शिक्षा नसतेच असे काही म्हणतात. तर त्याला या काळात मानसिक तणाव असतात त्यामुळे ती एक प्रकारची शिक्षाच असे मानावे. जुन्या काळातील भगवद्गीतादेखील म्हणते: ‘काही प्रसंगी ठार मारणे म्हणजे योग्यच ठरते. तसे न करणे म्हणजे पाप होय. भित्रेपणा होय. खून करणाऱ्यास ठार मारणे धर्मशास्त्राप्रमाणे आपले कर्तव्य आहे. मग तो खून करणारा म्हातारा, तरूण, मुलगा अगर विद्वान ब्राह्यण असो अशा प्रकारचे तत्त्वज्ञान जुन्या हिंदुधर्मात सांगितले आहे. त्यावरून जुन्या काळातील हिंदू कायदेकर्ते किती दूरदृष्टीचे होते याची स्पष्ट कल्पना येते. म्हणजेच त्यांनी आत्मसंरक्षणाचा अधिकार मान्य केला होता. त्याला कायद्याने संमती दिली होती.’ वरील प्रकारचे मत प्रदर्शन माननीय न्यायमूर्ती (ओरिसा उच्च

न्यायालय) यांनी पुरी येथे झालेल्या जागतिक धर्म परिषदेत ‘सनातन धर्म आणि कायदा’ यावर बोलताना 1 डिसेंबर 1974 रोजी व्यक्त केले होते. मिळकतीचे नुकसान केल्यास त्याची भरपूर भरपाई दिली जात असे.

मध्ययुगीन काळ (A.D. 550 To A.D. 1450) : पाश्चिमात्य देशात धार्मिक संस्कारांचे वर्चस्व होते. त्याचा न्यायदानावर मोठा पगडा होता. अपराध म्हणजे पाप समजले जात असे. एकांतवास शिक्षेचा एक प्रकार असे. भारतामध्ये आत्मशुद्धी प्रकार होता.मध्ययुगीन काळात तुरुंगाची स्थिती फारच वाईट होती. त्यांचे जीवन नरकासारखे हते. शिक्षा म्हणजे गुन्हेगारास सतावणे, त्रास देणे हा असे.

आधुनिक नवीन शिक्षाशास्त्र : केलेल्या अपराधाच्या गांभिर्याप्रमाणे शिक्षा त्याच प्रमाणात व्हावी हा आधुनिक विचार आहे. गुन्हेगाराचे पुनर्वसन करण्याकरता त्याचे सुधारीकरण जास्त महत्वाचे आहे. त्याला समाजातून दूर करणे योग्य नाही. आजकाल गुन्हेगारांना जुन्या काळातील रानटी शिक्षा देणे बंद करण्याकडे कल आहे. दगडांनी ठेचून मारणे, जाळपोळ करणे, फाशी देणे, अवयव तोडणे, उपाशी ठेवून मारणे वगैरे अयोग्य असल्याचे मानले जाते. आधुनिक विचारांचा पाठपुरावा शिक्षाशास्त्रज्ञ श्रीयुत बेकारिया, गॅरोफेलो फेरी, तारडे, बेंथाम यांनी केला. त्यामुळे आरोपीला कडक शिक्षा न देता त्याला सुधारणे आणि समाजात चांगला नागरिक तयार करणे या विचारांचा प्रचार केला. दंड-नुकसानभरपाई, तडीपार करणे, तुरुंगात काही काळ अलग एकांतवासपणा देणे वगैरे सुधारणा करण्यावर भर देण्यात आला आहे. मध्ययुगीन काळात तर फारच रानटी शिक्षा दिल्या जात असत. उदा: चोरीकरता हात तोडणे, खोटे बोलण्यावर जीभ तोडणे, बलात्काराकरता पुरुषाचे लिंग कापणे अगर इतर प्रकारे त्याचे पुरुषीकरण खच्ची करणे वगैरे शिक्षा दिल्या जात असत. आधुनिक जगातील नवीन विचार म्हणजे आरोपीला सुधारण्याकरता शिक्षेचा विचार व्हावा. फ्रन्स देशात सन 1787 मध्ये मानवाचे अधिकार जाहीर झाले आणि त्याबरोबरच जुन्या रानटी शिक्षा देणे याचा अंत झाला आणि शिक्षाशास्त्र हे नवीन विज्ञान सुरू झाले आणि आरोपीला कडक शिक्षा दिल्यास तो जास्त धोकादायक समाजाला होतो म्हणून सुधारणा करण्याकडे कल वाढू लागला आणि समाजात आरोपीला स्थान देऊन त्याचे पुनर्वसन करणे समाजाच्या हिताचे आहे हे तत्त्व मान्य होऊ लागले आहे. आता तर दीर्घ मुदतीच्या शिक्षा झालेल्या आरोपींना खुल्या तुरुंगात ठेऊन त्यांना उदरनिर्वाह करण्याची साधने आणि संधी देण्यात येत आहे. श्रीयुत
ॅकेरिया यांनी आवाज उठवून जुन्या रानटी शिक्षेविरुद्ध मतप्रदर्शन करून सर्व गुन्हेगारांना समान अपराध असल्यासारखी शिक्षा द्यावी असे सूचित केले आहे. आरोपीची व्यक्तिगत माहिती विचारात न घेता त्याचे पूर्वचरित्र, कौटुंबिक परिस्थिती यांची पाहणी करून शिक्षा देणे योग्य ठरेल असे स्पष्ट मत मांडले आहे.

नवीन आधुनिक विचार : अपराध रोखणे, प्रतिबंध करणे आणि समाजाचे संरक्षण करणे हेच मुख्य उद्देश शिक्षा देण्यामागे असावेत. एकूण विचार करता निश्चितपणे कोणती पद्धती योग्य आहे हे सांगणे कठीण आहे. यावर न्यायमूर्ती श्रीयुत काएडवेल म्हणतात ‘गुन्हेगारास शिक्षा देणे ही एक कला आहे. सर्व गोष्टीचा विचार करून समतोलपणे तराजूप्रमाणे चारही प्रकारच्या शिक्षांचा विचार करून निर्णय द्यावा.’ डॉ. पी.के. जैन भारतीय शिक्षा शास्रज्ञ : भारतीय शिक्षाशास्त्रावर तज्ज्ञ व्यक्ती असून, त्यांनी भारताच्या जुन्या आणि नवीन शिक्षा पद्धतीवर भाष्य केले आहे.सरकार शिक्षेचा विचार करून त्यावर न्यायदानाचा विचार करत असते. त्यांच्या मते शिक्षा निश्चितपणे कल्पना देत नाही. कारण मानवी स्वभाव-वर्तन बदलत असते. हा बदल परिस्थितीनुसार होत असतो. त्याकरता पूर्वनिर्णयावर (Case Law) आधारित असा निर्णय घ्यावा. त्यांचे मताप्रमाणे अगदी प्राचीन भारतामध्ये मनू आणि कौटिल्याचे काळात राजाला राजधर्म माहीत असणे आवश्यक असते. कारण कर्म आणि दंड यांची सांगड घालून शिक्षा आवश्यकच असते. वरवर गुन्हे घडत असता त्यावर नियंत्रण आवश्यक असते; कारण सर्व शिक्षापद्धतींचा उद्देश एकच असतो. तो समाजाचे अपराधांपासून आणि गुन्हेगारांपासून संरक्षण करणे होय. यामुळे शिक्षा करणे म्हणजे समाजाचा बचाव होता, तर आता नवीन विचार आरोपीला सुधारणे आणि समाजात चांगला नागरिक कसा बनेल हा आहे.

आदर्श शिक्षा पद्धतीचे आवश्यक घटक :समाजाच्या रक्षणाकरता शिक्षा देणे तर आवश्यकच आहे. त्यामुळे ्प्रत्येक राष्ट्राला निश्चितपणे त्याची आदर्श शिक्षापद्धती पाहिजे. त्यात पुढील गोष्टी आवश्यक आहेत.

1) समाजाचे रक्षण करणे हा प्रमुख हेतू शिक्षा देण्यामागे असावा. प्रतिबंधक कारवाई महत्वाची आहे. संपूर्ण अपराधाचे उच्चाटन अशक्य आहे. अपराध्यांना गुन्हा करण्याची संधीच मिळणार नाही याची काळजी घ्यावी. कायद्यामध्ये परिस्थितीनुसार शिक्षेकरता जुळवून घेण्याची तरतूद असावी.

2) प्रसिद्ध इंग्लिश तत्त्वज्ञ श्रीयुत बेथाम म्हणतो ‘शिक्षा देण्याचे धोरण अखेर दु:ख आणि सुख’ याचेशी समतोल असावे. आरोपाचे गांभिर्य लक्षात घेऊन शिक्षा आणि परिणामकारक होण्याकरता त्या दृष्टीने प्रमाणबद्ध असावी.

3) न्यायालायीन तत्त्व ‘न्यायास उशीर म्हणजे न्याय नाकारणे होय.’ मान्य केलेच पाहीजे. त्यामुळे निकाल देण्यास उशीर झाला म्हणजे शिक्षेचे गांभिर्य / परिणाम नाहीसा होतो. भारतामध्ये केसेसचा निकाल उशीरा होतो त्यामुळे सर्वसाधारण जनतेचा न्यायसंस्थेवरील विश्वास कमी होऊ लागला आहे.

4) विशिष्ट मानवी कृत्याचा तिरस्कार व्यक्त करणे म्हणजे शिक्षा तर आवश्यकच असते. कायदा मोडणाऱ्यांना शिक्षा दिल्यानेच समाजाला संरक्षण मिळत असते. तत्त्वज्ञ श्रीयुत बॅकेरिया म्हणतो त्याप्रमाणे ‘शिक्षेचा उद्देश अपराध्याला जाणीव करून देत असते की त्याने केलेले कृत्य

योग्य नव्हे.’

5) समान अपराधास समान शिक्षा हे तत्व सर्वच गुन्हेगारांना लागू पडत नाही. तरुण प्रथम अपराध्यास इतर जास्त वयाच्या निर्ढावलेल्या अपराध्यापेक्षा वेगळी वागणूक पद्धत आवश्यक आहे. आरोपीचे वय, पुरुष अगर स्त्री, त्याची मानसिकता, समाजातील परिस्थिती वगैरे घटक लक्षात घेऊन शिक्षेचे स्वरूप वेगवेगळे असते. याचकरता गुन्हेगारांचे वर्गीकरण आवश्यक आहे.

6) शिक्षेच्या संदर्भातील महत्वाचे घटक पोलीस आणि न्यायाधीश यांचेबद्दल समाजात आदराची भावना निर्माण होईल अशा पद्धतीने निर्णय व्हावा म्हणजे त्यांची विश्वासाची भावना वाढेल.

7) गुन्हेगाराची सुधारणा व्हावी हा शिक्षा देण्यामागे उद्देश असावा म्हणजे अल्पवयीन आरोपी, स्त्रिया, प्रथमच अपराधी यांच्या संदर्भात शिक्षा सौम्य असावी, तर निर्ढावलेल्या अपराध्यास कडक शिक्षा द्यावी.

8) कमी शिक्षा द्यावी, सुधारणा करावी या धोरणाचा फार अतिरेक होऊ नये, ते जास्त ताणले जाऊ नयेत. अलिकडे खुले तुरुंग – भरपूर सुविधा दिल्या जातात त्याचा विचार होणे फार गरजेचे आहे. कारण तुरुंगामधील सुविधा सोई म्हणजे पृथ्वीवरीस स्वर्गच झाले आहेत. त्यामुळे अपराधी लोक आराम करण्याकरताच येथे जीवन घालवितात. त्यामुळे कडक शिस्त, श्रम येथे आवश्यक आहेत. अशा सुखसोईमुळे अपराध्यांवर वचक राहत नाही. अशा अतिरेकी सुधारणा वेडामुळे (Reformative) शिक्षेचा परिणाम होत नाही. गुन्हेगाराची प्रतिमा जास्त भव्य करू नये. खुनासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्यांना पकडून देणाऱ्यास रोख बक्षिसे जाहीर करणे म्हणजे शिक्षाशास्त्राचा अवमान करण्यासारखे आहे. प्रत्यक्ष उदाहरण द्यावयाचे म्हटले तर श्रीयुत कल्याण मुखर्जी यांच्या पुस्तकामध्ये (”The story of Bandid King”)

दरोडेखोर मलखान याला दिलेली अवास्तव प्रसिद्धी. तसेच (Bandid Queen) फुलनदेवीला दिलेली प्रसिद्धी आणि तिच्यावर काढलेले पिक्चर म्हणजे गुन्हेगारांचे उदात्तीकरणच होय. मध्यप्रदेशातील भिंड येथे 12 फेब्रुवारी 1983 रोजी मुख्यमंत्र्यांसमोर तिने पत्करलेली शरणागती आणि त्याला दिलेली प्रसिद्धी आणि नंतरची प्रखर टीका हे ज्वलंत उदाहरण आहे. फुलनदेवीवर काढलेला चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर बराच गाजला. प्रसिद्धी मिळाली. तिच्या पूर्वीच्या खुनांचे, गंभीर अपराधाचे जणू कौतुक केले गेले. विशेष म्हणजे सेन्सॉर बोर्डाने सन 1995 सप्टेंबरामध्ये संमती दिली. काही राजकीय पक्षांनी तिला भरपूर महत्व दिले आणि एक सेनेची अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि बहुजन समाज पार्टीतर्फे, ब.स.पा.तर्फे 11 आणि 12 व्या लोकसभेला खासदार म्हणून निवडून देखील दिले. हा इतिहास म्हणजे शिक्षेच्या मूलभूत तत्वांची पायमल्लीच केली असे दिसते.

भारतीय शिक्षाशास्त्र धोरण: (Penal Panel Policy In India) : आता भारताचा नवीन दृष्टिकोन ‘गुन्हेगारास कडक शिक्षा न देता सुधारणे’ हे धोरण आहे. अँग्लो अमेरिकन धोरण स्वीकारले आहे. भारताची तशी स्वत:ची शिक्षा यंत्रणा पुरातन कालापासून स्वतंत्र आदर्शच आहे. ‘बृहस्पती शास्त्र’ या ग्रंथात योग्य त्या मार्गदर्शक सूचना आहेत. त्याप्रमाणे लोकनीती काय म्हणते याचा विचार करणे सुचविले आहे. कौटिल्याने त्याचे अर्थशास्त्रात उपयुक्त सूचना, मार्गदर्शन केल आहे. कौटिल्याने म्हटले आहेच की, ‘कडक शिक्षा माणसाला भीती दाखवते, तर मवाळ, सौम्य शिक्षा त्याची मानसिक चौकट बिघडवून निराशावादी बनवितो. पण योग्य शिक्षा दिल्यास अपराधी धार्मिक चांगला बनतो.’ गुन्हेगारास योग्य मार्गावर आणणे हे ध्येय असते. ब्राह्यणवर्गास श्रेष्ठत्व दिले होते. त्यांच्या शिक्षेत सवलत, सूट असे कारण त्यांना आध्यात्मिक पुढारी (Spiritual Leader) आदर्श मानले जात असे. ब्राह्यण आरोपीस फाशी न देता त्याचे डोक्याचे फक्त मुंडण केले जात असे. त्यानंतर ब्रिटिश काळात काही वर्षे शिक्षेत सवलत मिळत असे पण त्यानंतर भेदभाव रद्द झाला.

मानवी स्वभाव वर्तन प्रत्येकाचे अलग, वेगळे असते. त्यामुळे एखाद्या अपराध्याला दिलेली वागणूक दुसऱ्याला सोयीची, लागू पडेलच हे सांगता येत नाही. आजकाल तुरुंग म्हणजे डांबून ठेवण्याची केंद्रे राहिली नसून (Custodial) सुधारण्याची केंद्रे झाली आहेत. प्रथम गुन्हेगारांना शिक्षा न करता सौम्य शिक्षा/सुधारणा होईल अशी वागणूक देणे महत्वाचे आहे. त्यांच्या अपराधाप्रमाणे वर्गीकरण करणे जरूर आहे. सुधारित राष्ट्रांमध्ये आता शिक्षाशास्त्रात बरीच प्रगती झाली आहे. शिक्षा न देता तो गुन्हेगार कसा सुधारेल आणि इतर व्यक्तीप्रमाणे समाजाच्या मुख्य प्रवाहात कसा स्थिर होईल हे पाहणे फार महत्वाचे आहे. अशी आशा करण्यास हरकत नाही की, ‘सुधारित शिक्षाशास्त्र कल्याणकारक होईल.’

अॅड. प.रा.चांदे,सार्थक, (बापू मार्ग), इंदिरा नगर, नाशिक ४२२००९फोन: ०२५३-२३२२७११

— ऍड. प.रा. चांदे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..