पूर्वी घरा-घरात भक्तीगीते ऐकू यायची. पंडीत भीमसेन जोशी, प्रल्हाद शिंदे, लता दीदींच्या आवाजातील विविध संतांच्या भक्तीगीतांनी अनेकांचा दिवस सुरू व्हायचा. आता मात्र घरा-घरात शिला की जवानी, मुन्नी बदनाम हुई असे ऐटमसॉंग वारंवार ऐकू येत आहेत. नाविन्याची आवड असायला हवी, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. मात्र नाविन्याच्या नावाखाली कोणी काहीही ऐकवतो आणि आम्हीही ते एक वेगळी मजा म्हणून ऐकता, पहातो. त्यामुळे शिला आणि मुन्नीच्या बदनामीला आपणच खरे जबाबदार आहोत, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.समाजात चांगलं आणि वाईट हे दोन्ही एकमेकांच्या हातात हात घालून येत असतात. त्यापैकी कशाचा स्विकार करायचा, हा जरी ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी आपल्या घरातील उद्याच्या पिढीवर त्याचा काही विपरीत परिणाम होणार नाही ना, याची काळजीही घेणे आवश्यक आहे. अशा ऐटमसॉंगमुळे घराघरातील शिला आणि मुन्नी नावाच्या मुलींची मोठीच कुचंबना झाली. त्यामुळे त्यांच्यात चीडखोरपणा निर्माण झाला. ऐटमसॉंगचे समर्थन करणारा एकजण त्याच्या मित्राला म्हणाला, यार, बायकोबरोबर मेहुणी, गाडीबरोबर स्टेपनी तशाचप्रकारे अशा गाण्यांची गरज आहेच बरका. त्याचा मित्र सुधारणावादी होता. तो त्याला म्हणाला, तुझी विचारसरणी बदल आता. आयटम सॉंगचे समर्थन करणारा काही वेळाने आपल्या घरी गेल्यानंतर त्याची सात ते आठ वर्षांची पाचवीत शिकणारी मुलगी केबलवरील शिला की जवानी आणि मुन्नी बदनाम हुई या गाण्यावर धरून नाचत असल्याचे त्याने पाहिले. तेव्हा रागाने त्या छोट्या मुलीला धपाटा लावीत, नाचायला तु काय डान्सर आहे का? असे म्हणत त्याने तिचा समाचार घेतला. हा प्रसंग काही काल्पनिक नाही किंवा कुठल्याशा दुसर्या देशात घडलेली नाही. तर आपल्याच ऐतिहासिक नगर शहरातील एका घरात घडलेला आहे. यातून एकच स्पष्ट होते, की आपल्याला ए
कीकडे अशी गाणीही हवीत आणि दुसरीकडे आपली भावी पिढी बिघडणार नाही, याचीही काळजी वाटते. हे
दोन्हीही एकाचवकळी कसे शक्य होईल? असे प्रसंग घरा-घरात घडत आहेत. कोणी मुलींची नावे बदलाहेत, कोणी शिक्षक हे गाणे गुणणार्या निरागस मुलांना छड्या मारीताहेत. हे सारे का आणि कोणामुळे घडले, याला आपण सारेच जबाबदार नाहीत का? याचे कुठेतरी चिंतन होणे गरजेचे आहे.आपली आवड बदलली हे मान्य करावेच लागेल. मात्र, आपल्या या बदलत्या आवडीचा भावी पिढीच्या विचार आणि आचरणावर विपरीत परिणाम होतो, हे विसरून कसे चालेल? एक मात्र खरे, की जी सात्विकता भक्तीगीतांत ठासून भरलेली असते, ती शिला आणि मुन्नीच्या गाण्यांत येणार नाही. अशा ऐटमसॉंगमुळे समाजात काही वैचारिक क्रांती होत नाही, कुठले समाज प्रबोधन होत नाही. तरीही अशी गाणी आपण आवडीने ऐकतो आणि अशा गाण्यांमुळे पोरे बिघडली असा गाळा काढतो. तेव्हा भावी पिढी बिघडण्याऐवजी अशा गाण्यांवर आपणच सामुहिक बहिष्कार घालण्याची गरज आहे. हे करीत असतानाच आपल्या मुलांना श्रीमद्भगवद्गीता, श्रीमद्भागवत, रामायण, महाभारत अशी कृष्णभक्ती वाढीस लावणारे सोप्या भाषेतील ग्रंथ वाचायला द्यावेत. टी. व्ही. आणि केबलवरील मालिका आणि आयटम सॉंग ऐकून, पाहून समाजाची अध्यात्मिक प्रगती होण्याऐवजी अधोगती होत आहे. याची प्रत्येक सुजान नागरिकांनी जाणीव ठेवणे ही काळाची गरज बनली आहे.
बाळासाहेब शेटे माझा मोबाईल- ९७६७०९३९३९
— बाळासाहेब शेटे
Leave a Reply