नवीन लेखन...

शुक्राचे अधिक्रमण – आकाशविश्वातील एक विस्मयकारक अविष्कार



पृथ्वी ही चमत्कारांची जननी आहे. जसे असंख्य चमत्कार पृथ्वीच्या गर्भात, व मानवव्यापित पृष्ठभागावर घडत असतात, त्याचप्रमाणे आपल्या वर अमर्याद पसरलेल्या अवकाशातसुध्दा असे आश्चर्यात टाकणारे, डोळे दिपविणारे तर काही वेळा अनेक रहस्यांचा उलगडा करणारे हजारो चमत्कार घडत असतात. हे चमत्कार बर्‍याच वेळेला पुर्वकथित असतात, अटळ असतात व विश्वाच्या नियमांनुसार ते घडत असतात. परंतु ते आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडे असल्याने त्या घटनांना आपण चमत्कारांचे नाव देतो. यातील बर्‍याच चमत्कारांचा विशेष गवगवा होत नाही, तर काही चमत्कार त्यांचा विपुल प्रेक्षकवर्ग राखून असतात. रात्रीच्या आकाशात लुकलुकणार्‍या हजारो चांदण्यांना मोजण्याचा छंद लहान मुलांसाठी नवा नाही. तारूण्यात मात्र काही जणांच्या या सवयीचे अभ्यासपुर्ण निरीक्षणामध्ये परिवर्तन होते, व आकाशदर्शनाचा चौकस प्रवास सुरू होतो. बुध्दीची वेगवेगळी दालने खुली करणार्‍या या प्रवासामध्ये काही टप्पे व काही घटना अशा असतात, की ज्या घटनांना पाहण्याचे सुख हे सर्वांसाठी तितकेच रोमांचकारी व आनंददायी असते. अशा प्रसंगांमध्ये इतरांना सहभागी करून घेतले तर आकाशदर्शनाचे समाधान कितीतरी पटींनी वाढते. कारण या घटना बुध्दिपेक्षा आपल्या डोळयांनी उपभोगायच्या असतात. ग्रह-तार्‍यांची, मुलभूत माहिती अशा घटनांसाठी पुरेशी असते. अशीच एक पुर्वकथित, परंतु सध्या असंख्य मानवी मनांच्या दुर्बिणींवर कोरली गेलेली घटना, म्हणजे शुक्राचे अधिक्रमण. सूर्याच्या तापलेल्या अशा विशाल लाल गोळयाला, मोठया दिमाखात भेदून जाणारा इवलासा शुक्र व त्याची सूर्याच्या दर्शनी भागावर दिसणारी रेखीव गोल आकृती पाहाण्यासाठी, व हे विलोभनीय दृष्य आपल्या दुर्बिणींमध्ये टिपण्यासाठी, पृथ्वीवरील असंख्य संशोधक, वैज्ञानिक, छायाचित्रकार, व आकाशप् ेमी एव्हाना सज्ज झाले असतील. केवळ एक कुतूहल म्हणून, अवकाशामधला ‘अ’ देखील माहित नसलेल्या नवख्या व्यक्तींना हा क्षण, त्याच्या सौंदर्यामुळे व ऐतिहासिक महत्वामूळे, त्यांच्या आठवणींच्या कप्प्यामध्ये चिरंतन जपता येईल. काहीतरी वेगळे, व सर्वांगाला स्तिमीत करणारे दृष्य पाहिल्याचे समाधान त्यांना मिळेल. आकाश अभ्यासणार्‍या व न अभ्यासणार्‍या सर्व वयोगटाच्या मुलामुलींसाठी पर्वणी ठरावी, अशी ही अवकाशीय घटना दिनांक ५ व ६ जून रोजी सकाळी घडणार आहे. याआधी शुक्राचे अधिक्रमण २००४ सालच्या आठ जून रोजी घडले होते. त्यावेळी ही घटना न बघितलेल्या आकाशप्रेमींना, या शतकातले शेवटचे अधिक्रमण बघण्याची ही नामी संधी उपलब्ध झाली आहे. आकाशातील असे दुर्मीळ व दुर्लभ क्षण अनुभवण्याचे भाग्य, आपल्याला तब्बल दोनदा मिळत आहे. त्यानंतर ही घटना थेट साडे एकवीसशे वर्षांनंतर म्हणजे २११७ साली, पृथ्वीवर वावरणार्‍या आपल्या पुढच्या पिढयांच्या नशिबास येईल. मानवजातीच्या इतिहासामध्ये, हा शुक्राने सूर्याच्या बिंबाला छेदून वर सरकण्याचा प्रसंग केवळ सात वेळा पाहिला गेला आहे. अशा प्रकारची एका महाकाय तार्‍याची एका तुलनेने चिमुकल्या ग्रहाशी झालेली भेट अतिशय गुप्तच म्हणायला हवी. कारण तंत्रज्ञानाच्या व विज्ञानाच्या क्रांतिशिवाय या भेटीचे दर्शन अनुभवणे पृथ्वीवासीयांना शक्य नव्हते. या घटनेची माहिती जर आधीच नसेल तर, ही घटना गेलेली कळणार नाही एवढया सराईतपणे ती घडत असते.

कसे दिसेल शुक्राचे अधिक्रमण सकाळच्या लख्ख आभाळामध्ये, सुर्याच्या लाल पिवळ्या साम्राज्यावर, मराही कवींचा व गीतकारांचा लाडका शुक्र आक्रमण करेल. पृथ्वीपासून भरपूर लांब असल्याने चंद्राच्या व्यासाच्या तुलनेत चौपट असणारा शुक्र, चंद्राप्रमाणे सूर्याला झाकोळणार नसला तरी या धीट ग्रहाची सूर्यमूखावर (ज्याला वैज्ञानिक भाषेत फेस ऑफ द सन म्हणतात) दिसणारी व अतिशय हळूहळू पुढे सरकणारी वर्तुळाकार सुंदर प्रतिमा पहाणे, हा नक्की एक अविस्मरणीय अनुभव असेल. सौंदर्यवादी व्यक्तींना, सूर्याच्या नारिंगी पार्श्वभूमीवरील हा शुक्राचा काळा ठिपका, व त्यायोगे पाहायला मिळणारा रंगछटांचा अद्वितीय खेळ निश्चीतपणे नेत्रसुखद वाटेल. आभाळाची ओढ असणार्‍या तरूणांना पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल, तर नसणार्‍यांना या क्षेत्रामध्ये रस वाटायला लागेल. सुर्याच्या पृष्ठभागावरून होणारी शुक्राची मार्गक्रमणा ही द्रुतगतीने होणार नसून ती कुर्मगतीने होणार असल्याने, भरपूर वेळ या दृष्याचा आस्वाद घेणे आकाशप्रेमींना शक्य होणार आहे. काही क्षण नव्हे तर चांगले काही तास, ही शुक्र व सूर्याची सुखद जुगलबंदी लांबण्याची शक्यता आहे. ८ जून २००४ मध्ये झालेले शुक्राचे अधिक्रमण, आकाशामध्ये तब्बल चार तास रंगले होते. अर्थात उघडया डोळ्यांनी, या दृष्याचे दर्शन धोकादायक ठरू शकते. त्यामुळे योग्य सुरक्षेचे काटेकोर नियम पाळून, व सुरक्षा उपकरणांचा वापर करून या दुर्मिळ घटनेचे साक्षीदार झाल्यास आपला आनंद अजून द्विगुणित होईल, यात शंका नाही. शुक्राचे अधिक्रमण ही सामान्य माणसाच्या मनात आकाशाच्या विशेष घडामोडींविषयी रूची निर्माण करण्यास हातभार लावणारी घटना असल्याने ज्याप्रमाणे सामान्य जनतेला, या दृष्याविषयी उत्कंठा आहे, तेवढीच उत्कंठा किंवा त्याहून जास्त तीव्र उत्कंठा ही संशोधकांना व खगोलशास्त्रामधील तज्ञ वैज्ञानिकांना आहे. कारण अशा काही घटनांच्या शास्त्रीय अभ्यासातून अनेक गहन कोडी व रहस्ये उलगडत जातात, न जुळणारे धागे चपखल जुळत जातात. मागील काही अधिक्रमाणांच्या अभ्यासातून पृथ्वी व सूर्यामधल्या नेमक्या अंतराचा अंदाज बांधण्यात शास्त्रज्ञांना यश आले होते. व विशेष बाब म्हणजे या अंतराचे शास्त्रज्ञांनी निष्कर्शित केलेले आकडे वास्तविकतेच्या अगदी जवळ जाणारे होते. सहा जूनला दिसणार्‍या शुक्राच्या अधिक्रमणाचा अभ्यास करून, अवकाशात दडलेले काही एक्सोप्लॅनेट्स (एक्स्ट्रा सोलार प्लॅनेट्स) शोधून काढण्यासाठी लागणार्‍या तंत्रांची दुरूस्ती व पुनर्विकास करण्याचा ‘नासा’ मधील संशोधकांचा मानस आहे. त्यामुळे या अधिक्रमणामुळे एक्सोप्लॅनेट्स शोधून काढण्याच्या मोहिमेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे बळ व दिशा मिळेल. सूर्यग्रहणामध्ये व शुक्राच्या अधिक्रमणामध्ये फारसा फरक नाही. पण त्यांच्या उपलब्धतेमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. २००४ आधीचे शुक्राचे अधिक्रमण डिसेंबर १८७४ व डिसेंबर १८८२ साली झाले होते. त्यानंतर हा प्रसंग पाहण्यासाठी २००४ पर्यंत प्रतीक्षा करावी लागली होती. त्यामुळे या प्रसंगाला अचूक टिपण्याकरिता जगातल्या कित्येक ‘आकाशदर्दी’ लोकांचे कॅमेरे आतापासूनच सरसावले आहेत. या घटनेची निर्धोक मजा घेण्यासाठी सूर्यग्रहण पाहण्याच्या वेळी आपण जी काळजी घेतो, ती काळजी येथे घेणे आवश्यक आहे. नाहीतर डोळयांना गंभीर इजा पोहोचू शकते. अलिबाग मधील नागरिकांना या घटनेचा आनंद घेता यावा, या करिता वरसोलीमधील विठोबा मंदिरा शेजारील विस्तीर्ण शेतामध्ये दुर्बिणीची व्यवस्था करण्यात आली आहे. सूर्य जेव्हा पृथ्वीवर उगवेल व शुक्राचा काळा ठिपका आपल्या दृष्टीक्षेपात पडेल त्यावेळी शुक्राची बरीचशी मार्गक्रमणा झाली असेल. कारण सहा जून रोजी पहाटे सहा वाजून तीन मिनीटांनी पृथ्वीवर, प्रकाशसम्राटाचा (म्हणजेच सूर्याचा) उदय होईल. त्याआधी दोन तास तरी शुक्राचा रथ आपल्या लक्ष्याकडे कूच करण्यास सुरूवात करेल. सकाळी सातच्या सुमाराला शुक्राची ही बहुचर्चित वाटचाल निम्म्यावर आली असेल. पुढच्या तिन तासांनंतर जेव्हा दहा वाजून वीस मिनीटांनी शुक्राचा काळा ठिपका सूर्यबिंबाला चौथा बाहयस्पर्श करेल, तेव्हा या अप्रतिम खगोलनाटयाची शेवटची घंटा वाजेल, आणि सर्व रसिकांना नकोसा वाटणारा शेवट होईल. अशा प्रकारे पहाटे सहा ते सकाळी दहा वाजेपर्यंत शुक्राचा हा मनाला थक्क करणारा प्रवास निरंतर सुरू राहिल. सकाळी दहा वाजून वीस मिनीटांनी शुक्र सूर्याच्या परिघाला स्पर्श करेल. याला खगोलशास्त्रात तीसरा स्पर्श असे म्हणतात.

अधिक्रमण म्हणजे काय? शुक्राचे अधिक्रमण जर एकाग्रचित्ते पहावयाचे असेल व इतरांनादेखील या घटनेचा पूर्ण आनंद द्यायचा असेल तर अधिक्रमणाविषयी जुजबी माहिती असणे आपणास आवश्यक आहे. अधिक्रमण म्हणजे सूर्यबिंबासमोरून एखादया ग्रहाची झालेली मार्गक्रमणा पृथ्वीवरून पाहता येणे. शुक्र व बुध हे दोनच ग्रह असे आहेत की ज्यांचा सूर्यावरून झालेला प्रवास आपण जमिनीवरून पाहू शकतो. सूर्यमालेत घडणारा हा सृष्टी चमत्कार सूर्यमालेच्या निर्मीतीपासून अव्याहतपणे सुरू आहे. पृथ्वीवासियांना अशाप्रकारे सूर्यबिंबावरून प्रवास करताना बुध व शुक्र हे दोनच ग्रह दिसू शकतात, कारण या दोन्ही ग्रहांच्या कक्षा पृथ्वीपेक्षा लहान आहेत. कोणतेही अधिक्रमण होण्याकरिता दोन गोष्टींची आवश्यकता असते. पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे त्या ग्रहाची सूर्याबरोबर अंतर्युती होणे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्या वेळेला तो ग्रह त्याच्या कक्षेतील पातबिंदूच्या जवळ असणे. शुक्राची सूर्याबरोबरची युती दर ५८४ दिवसांनी होते. सूर्य आणि पृथ्वीच्या केंद्रातून जाणार्‍या प्रतलाला आयनीक प्रतल असे म्हणतात. सर्व ग्रहांच्या कक्षा या आयनिक प्रतलाला थोडासा कोन करून असतात. त्यामूळे कोणत्याही ग्रहाची कक्षा आयनिक प्रतनाला छेदून वर म्हणजे उत्तर दिशेला जाते त्या बिंदूला उर्ध्वपात बिंदू असे म्हणतात., तर ग्रहाची कक्षा ज्या बिंदूतून खाली म्हणजे दक्षिणेला जाते, त्या बिंदूला अधोपात बिंदू म्हणतात. पृथ्वी आपल्या कक्षेत फिरताना १० डिसेंबरला शुक्राच्या उर्ध्वपात बिंदूसमोर पोहोचते तर आठ जूनला अधोपात बिंदूसमोर पोहोचते. याचा अर्थ असा की जर या तारखांच्या आसपास जर शुक्र तिथे पोहोचला तर म्हणजेच अंतर्युती झाली तर शुक्र अधिक्रमण होऊ शकते. शुक्राची सूर्याभोवतीची फेरी, पृथ्वीची सूर्याभोवतीची फेरी, णि शुक्राच्या अंतर्युतीचा कालावधी या गोष्टी एकमेकांशी फार गंमतीदारपणे जोडल्या गेल्या आहेत. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या आठ फेर्‍या म्हणजे आठ वर्ससे. या काळात शुक्राच्या तेरा फेर्‍या होतात, तर याच आठ वर्षांत शुक्र सूर्याची पाच वेळा अंतर्युती होते. म्हणजेच एकदा अधिक्रमण झाले की परत आठ वर्षांनी त्याच पातबिंदूजवळ अधिक्रमण होते. उर्ध्वपातबिंदूशी दोन अधिक्रमणे झाली की पुढची दोन अधिक्रमणे अधोपातबिंदूशी होतात. त्यांच्यात एकशे एकवीस वर्षांचे अंतर पडते. अधोपातबिंदूशी अधिक्रमणे झाले की पुढची दोन अधिक्रमणे एकशे पाच वर्षांनी उर्ध्वपात बिंदूपाशी होतात. अशा प्रकारे ८+१२१.५+८+१०५.५=२४३ वर्षे एवढया कालावधीत अधिक्रमणांची चक्रियता अनुभवता येते. शुक्राची अधिक्रमण या घटनेची नोंद मानवाने चारशे वर्षांपूर्वी घेतली असावी असा अंदाज असला तरी ही घटना आपल्या सूर्यमालेइतकीच जुनी आहे.

इतिहासावर फिरवलेली नजरजोहान्सन केप्लर या खगोल आभ्यासकाने इ. स. १६२७ मध्ये शुक्राच्या अधिक्रमणाचे गणित मांडले. ४ डिसेंबर १६३९ रोजी शुक्र सूर्याच्या अगदी जवळून जाईल, असे केप्लरने वर्तविले होते. हेरॉक्स ने त्याच्या गणितामध्ये सुधारणा करून चार डिसेंबर १६३९ ला अधिक्रमण होईल असे जाहीर केले. पण त्याचे वेळेचे गणित थोडे चुकले. हेरॉक्सने ते अधिक्रमण सूर्यास्ताच्या थोडा वेळ आधी पाहिले. या निरीक्षणाच्या मदतीने त्याने सूर्य व पृथ्वी अंतर अंदाजे नऊ कोटी अठावन्न लाख किमी तर शुक्राचा कोनीय व्यास एक कोनीय मिनिटापेक्षा लहान आहे असे जाहीर केले. इ.स. १७१६ मध्ये एडमंड हॅलेने शुक्राच्या अधिक्रमणाच्या मदतीने सूर्य पृथ्वी अंतर शोधण्याचे गणित मांडले. त्यामुळे ६ जून १७६१ आणि ४ जून १७६९ या अधिक्रमणांचे निरीक्षण जागतिक स्तरावर करण्यात आले. त्यात अनेक देशांतील प्रख्यात शास्त्रज्ञ सामील होते. या निरीक्षणांमधून सूर्य पृथ्वी अंतर १४ कोटी ९५ लाख ९७ हजार ८३६ किमी एवढे निश्चीत झाले. यानंतर झाले ते आठ वर्षांपूर्वीचे ८ जून २००४ चे अधिक्रमण. या वेळेला एक अनोखा प्रयोग केला गेला. शुक्र सूर्यबिंबासमोर आल्यावर सूर्याचा प्रकाश किती कमी होतो ते मोजले गेले.

— अनिकेत जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..