प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ याने सर्वप्रथम पृथ्वी हीच सूर्याभोवती फिरते असा शोध लावला. त्याच्या आधी ‘सूर्य हाच पृथ्वीभोवती फिरतो’ हाच सार्वत्रिक समज होता. त्यामुळे गॅलिलिओच्या था शोधाला अर्थातच प्रचंड विरोध झाला. त्या काळच्या धर्ममार्तंडांनी तसेच कर्मठ लोकांनी गॅलिलिओविरुद्ध मोहीमच उघडली.
सामान्य नागरिकही गॅलिलिओला शिव्या देण्यात तसेच त्याची निंदानालस्ती करण्यात आघाडीवर होते. त्यामध्ये गॅलिलिओचा शेजारीही होता. त्याने तर गॅलिलिओवर बहिष्कारच टाकला होता. त्या शेजाऱ्याचा तरुण मुलगा आजारी पडला व दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावत चालली. गॅलिलिओला हे कळल्यावर त्याने त्याच्या ओळखीच्या नामांकित डॉक्टरची भेट घेतली व त्याला घेऊन तो शेजाऱ्याच्या घरी आला. दरवाजा ठोठावल्यानंतर त्या शेजाऱ्यानेच दार उघडले व गलिलिओला पाहिल्यावर कसलाही न विचार करता त्याने शिव्या द्यायला सुरुवात केली.
त्याच्या शिव्या संपल्यानंतर गॅलिलिओ शांतपणे त्याला म्हणाले, ‘मी तुझ्या मुलाचा गंभीर आजार ऐकून त्याच्यावर उपचार करण्यासाठी एक नामांकित डॉक्टर घेऊन आलो आहे.’
ते ऐकून तो शेजारी वरमला व त्याचवेळी त्याला हीही जाणीव झाली, की आपण त्या नामांकित डॉक्टरचे बिल देण्यास असमर्थ आहोत, शेजाऱ्याने आपणास डॉक्टरची फी परवडणार नाही म्हणून उपचार नकोत असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र गॅलिलिओ त्याला लगेच म्हणाला, ‘तुम्ही पैशाची काळजी करू नका कारण तुमचा मुलगा आजारातून वाचणे हे महत्त्वाचे आहे व शेजारधर्म म्हणून माझे ते कर्तव्य आहे. त्यामुळे डॉक्टरांची फीज व औषधाचा खर्च मीच करणार आहे.’
ते ऐकून तो शेजारी फारच खजिल झाला व गॅलिलिओला म्हणाला, ‘मी तुम्हाला रोज शिव्या देऊनही तुम्ही माझ्या मुलाला वाचविण्यासाठी एवढा खर्च करायला कसे तयार झालात?’
त्यावर गॅलिलिओ म्हणाला, ‘सूर्य पृथ्वीभोवती फिरी की पृथ्वी सूर्याभोवती फिरो’ हे आपल्या शेजाऱ्यामधील वैर निर्माण होण्याचे कारण होऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने चांगला शेजारधर्म पाळणे आवश्यक आहे व तो पाळण्यासाठीच मी तुमच्याकडे आलो आहे. तुम्ही तुमचा शेजारधर्म (शिव्या देण्याचा) पुढेही पाळलात तरी त्याला माझी हरकत नाही. ”
Leave a Reply