धनचंद नावाचा एक हिऱ्याचा एक व्यापारी होता. अनेकदा अत्यंत मौल्यवान हिरे घेऊन तो प्रवास करायचा. खरे तर किमती हिरे घेऊन प्रवास करायची मोठी जोखीमच होती. परंतु धनचंद हा अतिशय चतुर व प्रसंगावधानी होता. त्यामुळे आलेल्या संकटातून तो बऱ्याच वेळा वाचला होता.
एकदा दुसऱ्या एका हिरे व्यापाऱ्याशी सौदा करून धनचंद काही किमती हिरे घेऊन रेल्वेने प्रवास करीत होता. हिऱ्याची पिशवी त्याने आपल्या जवळच्या बॅगेत सुरक्षित ठेवली होती. मात्र धनचंदच्या पाळतीवर असलेला एक अट्टल चोर त्याच्याच डब्यात चढला व धनचंदजवळ येऊन बसला. त्याने आपली बॅगही धनचंदच्या बॅगेजवळच ठेवली होती.
योगायोगाने त्या दिवशी रेल्वेच्या डब्यात फारशी गर्दी नव्हती. धनचंद व चोर समोरासमोरच बसले होते. चोराच्या हालचालीवरून हा चोर असावा हे ओळखायला धनचंदला वेळ लागला नाही. परंतु त्याने तसे भासू दिले नाही. उलट त्याने त्याचाशी गप्पा सुरू केल्या. थोड्या वेळाने गाडी एका स्थानकावर थांबली. आपला अधिक संशय येऊ नये, म्हणून चोर डब्यातून उतरला व परत डब्यात येऊन बसला.
रात्र झाली तेव्हा धनचंदने झोपायची तयारी सुरू केली. थोड्या वेळाने तो झोपीही गेला. दिवसभराच्या श्रमाने त्याला गाढ झोप लागली होती. चोर याच क्षणाची वाट पहात होता. धनचंद झोपल्यावर चोराने हळूच बनावट चावीने धनचंदच्या बॅगेचे कुलूप उघडले. बॅग शोधली, परंतु हिऱ्याची पिशवी काही त्याला मिळेना. त्यानंतर त्या चोराने धनचंदचा सदरा, कोट आदी सर्व कपडे तपासले परंतु त्याला कोठेच हिऱ्याची पिशवी मिळाली नाही. त्यामुळे तो अस्वस्थ झाला. त्याला झोपही लागली नाही.
सकाळ झाली. धनचंदचे स्थानक जवळ आले होते. चोराचा निरोप घेताना धनचंद त्याला म्हणाला, “काल रात्री तुम्ही काही वेळ डब्यात नव्हता. त्या वेळी मी घाईघाईत माझ्याजवळची एक पिशवी चुकून माझ्या बॅगेत ठेवायच्या ऐवजी तुमच्या बॅगेत ठेवली. ती कृपया मला द्या.”
चोराने आपली बॅग उघडली तर त्यात ती हिऱ्याची पिशवी होती. त्या चोराला ती हिऱ्याची पिशवी धनचंदला देण्याशिवाय पर्यायच नव्हता. आपल्याला धनचंदने असे फसविले तर असे मनातल्या मनात म्हणत तो चरफडत राहिला.
धनचंद त्याला शेरास सव्वाशेर भेटला होता..
Leave a Reply