शैव माझे यार झाले…
मारण्यासाठी मला ही उचलली तलवार त्यांनी
उचलले मी फक्त डोळे घेतली माघार त्यांनी
छान केला आज माझा हा असा सत्कार त्यांनी
लपविला खंजीर मागे अन् दिली तलवार त्यांनी
का तुझे निसटून गेले हात हातातून माझ्या
स्पर्श करण्याचा किती हा पाळला उपचार त्यांनी
जवळ आले जग किती हे माणसे ही दूर गेली
लावुनी छोटाच पडदा घडविले बेकार त्यांनी
मी कसा जगणार याची या पुढार्यांनाच चिता
भाकरीवर लावला कर स्वस्त केली कार त्यांनी
जे मला सांगायचे ते नीट घे समजून तू
मी कुणाचे नाव घेऊ फक्त मी म्हणणार,‘‘त्यांनी’’
शैव माझे यार झाले, वैष्णवांनी लाड केले
पाहिला माझ्यातला का नरहरी सोनार त्यांनी?
— प्रदीप निफाडकर
Leave a Reply