आपण आपल्या लहानपणापासून कृष्णजन्म कहाणी बऱ्याच वेळेस ऐकली आहे, सिनेमा, नाटकातून सुद्धा पाहिलेली आहे, काही ठिकाणी बरेच प्रश्न अनुत्तरीत वाटले, त्याचा विचार करून काही कड्या जुळवण्याचा प्रयत्न केला आहे.
माझाही श्रीकृष्णाबद्दल तितकाच आदर आहे जितका आपण सर्वांचा आहे, तसेच या लेखातून कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.
कंसराजा आपल्या लाडक्या बहिणीचे लग्न वासुदेव सोबत लावतो, व खूप आनंदात त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढतो, त्या वेळेस आकाशवाणी होते कि देवकीचा आठवा पुत्र तुझ्या मृत्यूस कारणीभूत होईल. तत्काळ मिरवणूक थांबऊन कंस देवकी- वासुदेवाला काळ कोठडीत बंद करतो तिथून त्यांचा यातनामय प्रवास सुरु होतो. कदाचित कंसाला भास झाला असावा, त्याला त्याने आकाशवाणी समजली असावी, यातून तो मनोरुग्ण असावा अशी शंका येते. बरेच एकहाती सत्ता असलेले राज्यकर्ते असाच काहीसा विचार करून जनतेची पिळवणूक करतात हे आपण विसाव्या शतकातही अनुभवले आहे.
देवकी-वासुदेवाला कालकोठडीत ठेऊन येणाऱ्या काही वर्षात त्यांची पहिली सात मुले मारल्यामुळे दोघेही खूप व्यथित झाले होते, अश्या परिस्थितीत आठव्याची चाहूल लागली, त्यामुळे त्यांच्या मनात अजुनच कोलाहल सुरु झाले, कारण सात जणांना मारल्याच्या दहशतीमुळे देवकी मानसिक तणावाखाली होती, आणि कंस आठवे मुलही मरणार यात शंका न्हवती अश्या परिस्थितीत तिला अन्न गोड लागत न्हवते, या मुळे ती अतिशय कृश झाली होती, तसेच सात मुलांना जन्म दिल्यामुळे सहजिकच शरीर खूप खंगले होते. कालकोठडीत जिथे सुर्य किरण सुद्धा पोहोचत नाहीत तिथे जवळपास १० वर्ष (कमीतकमी) काढल्यामुळे तिच्यात ड जीवनसत्वाची कमतरता झाली होती. या सर्व कारणामुळे देवकीने आठव्या महिन्यात मुलास जन्म दिला. वैद्यकीय परिभाषेत सांगायचे तर (premature delivery) झाली. सर्वसाधारणपणे बालके जन्मानंतर रडतात, जर रडले नाही तर त्याला रडवण्यात येते, याचे प्रमुख कारण मुलाला आईच्या गर्भात नाळेतून (placenta) प्राणवायू मिळतो, बाळ बाहेर आल्यावर नाळ कापल्यामुळे बाळाला नाकाने श्वास घ्यावा लागतो. जर बाळ रडले नाही तर फुफ्फुसे (lungs) आपले काम सुरु करत नाहीत, म्हणून डॉक्टर वेळ पडली तर चिमटा काढून बाळाला रडवतात, नाहीतर डॉक्टरवर रडण्याची पाळी येते. श्रीकृष्ण जन्मानंतर रडला नाही हे पुस्तकात लिहिलेले आहे, याचा अर्थ ते मुल मृत (still baby) अवस्थेत जन्माला आले असे म्हणू शकतो.
वरील सर्व कारणामुळे गर्भात व्यवस्थित पोषण झाले नसल्यामुळे, आणि प्राणवायू कमी मिळाल्यामुळे बाळ निळा रंग (cyanosis) घेऊन जन्माला आले. आठव्या महिन्यात जन्म झालेली अशी बरीच मूले मी पहिली आहेत ज्यांच्यात ही लक्षणे दिसतात. साधारण अश्यामुलांच्यात कमरेखालचा (कुल्ले, मांड्या) तसेच पाठीचा भाग निळा दिसतो. या बाळातही असेच झाले असणार, अर्थात त्या काळात विज्ञान फार प्रगत नसल्यामुळे प्राणवायू कमतरतेमुळे निळे मूल जन्माला आले हे समजले नाही. लोकांनी त्याला दैवी देणगी समजली. पुढे चित्रकारांनी संपूर्ण शरीर निळे दाखऊन दैवी चमत्कार भासवला. आजही लोक गणपती दुध पितो म्हणून देवळात रांगा लावतात, तर त्या काळाबद्दल न बोललेलेच बरे. म्हणूनच बाळकृष्ण निळा दाखवला जातो, तसेच मोठेपणीचा कृष्ण निळा दाखवला जात नाही, याचे कारण या मुलांच्यात वाढत्या वयासोबत भरपूर प्रमाणात प्राणवायू मिळाल्यामुळे चामडीचा हा निळा रंग निघून जाऊन नैसर्गिक रंग येतो.
वर सांगितल्याप्रमाणे हे मृत बाळ जन्माला आल्यामुळे रडले नाही आणि त्याचा जन्म झाला हे देवकी आणि वासुदेव शिवाय कुणालाही समजले नाही. वसुदेवाने हि गोष्ट जेव्हा जेलरला सांगितली, तेव्हा जेलर प्रचंड तणावाखाली आला. त्याला काय करायचे हे प्रथम दर्शनी सुचले नाही, परंतु त्वरित निर्णय घेणे जरुरी होते. मेलेलं मुल जन्माला आले आहे हे कंस कधीही मान्य करणार नाही, हे नक्की, उलटा कंस जेलर व वसुदेवानी संगनमत करून जिवंत मुल बाहेर पाठवून मेलेलं मुल त्याला दाखवले हे समजून सर्वाना मृत्यूदंडाची शिक्षा देणार यात शंका न्हवती. याच कारणामुळे जेलरने व वसुदेवाने संगनमत करून मेलेलं मुल बाहेर नेऊन जिवंत मुल त्या ठिकाणी ठेवायचा निर्णय घेतला. हि गोष्ट अत्यंत गुप्तपणे ठरवल्यामुळे पहारेकऱ्याना समजूद्यावयाचे न्हवते, यासाठी एकच उपाय होता, त्या प्रमाणे सर्व पहारेकऱ्याना रात्रीच्या पेयात झोपेचे औषध मिसळून दिले, ज्यामुळे सर्व शिपाईवर्ग झोपी गेला, व जेलरने सर्व दारे उघडून वासुदेवाला मुक्त केले, अट हि कि त्याने ताबडतोब नदी पार करून गोकुळात जाऊन हे मुल टाकून त्या जागी दुसरे मुल आणायचे. ठरल्या प्रमाणे वासुदेव नदी ओलांडून गोकुळात गेला, व तिथे चांगला वैद्यकीय उपचार मिळाल्यामुळे हे मुल जिवंत झाले, पुढे हेच मुल कृष्ण म्हणून प्रसिद्ध झाले, असो, अश्या गोष्टी आजही आपण पेपर मध्ये वाचतो. मीही बरेच वेळेस वाचले आहे कि मृत मुलाला पुरण्यासाठी घेऊन जातात व अचानक स्मशानात मुल रडू लागते.
कथेत सांगितल्या प्रमाणे वसुदेवाने गावातील एका मुलीला सोबत आणून कंसासमोर पेश केले. त्याला एखादा मुलगा मिळाला असता, परंतु कुणीही आपला मुलगा त्याला दिला नाही म्हणून मुलीवर समाधान मानून तो तिला घेऊन आला. जेलरने परत वासुदेवाला बंदी करून सर्व दरवाजांना कुलुपे घातली, या नंतर सर्व पहारेकऱ्याना जागे करण्यात आले. पुढे जेव्हा कंसाला हे समजले तेव्हा जेलर व सर्व पहारेकऱ्यानी झोप लागल्याची कबुली देऊन व हा दैवी चमत्कार भासवून स्वतःची मृत्यूदंडातून सुटका करून घेतली.
बऱ्याच वेळेस लेखकाला दोन गोष्टींची सांगड घालता आली नाही कि तो काहीतरी चमत्कार दाखवुन आपली कहाणी पूर्ण करतो, इथेही त्याला हे समजले नाही म्हणून चमत्कार दर्शवून कथा पूर्ण केली असे जाणवते.
— विजय लिमये
Leave a Reply