श्रीमंतीसाठी अंधश्रद्धेचा वापर गरीबीवर मात करण्यासाठी प्रत्येकालाच पैसा कमविणे गरजेचे असून तो सरळ मार्गाने मिळत नाही. यासाठी कोण कशा-कशाचा आधार घेईल, याचा काहीच भरवसा राहिलेला नाही. श्रीमंत होण्यासाठी अनेकांनी देवी-देवतांचा आधार घेतला आहे. यासाठी लोकांच्या अंधश्रद्धेचा आधार घेऊन त्यांना लुबाडणार्यांचे प्रमाण माहिती-तंत्रज्ञानाच्या या युगातही कमी होत नाही, ही
मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.देशाची वाटचाल आर्थिक महासत्तेकडे सुरू आहे, तंत्रज्ञानानेही भरपूर प्रगती केलेली आहे, शास्त्रज्ञांनी चंद्रावर जाऊन तेथील माती आणल्यानंतर आता तेथील खोल गुहाही शोधून काढली आहे. असे असताना अनेक लोक आजही अंधश्रद्धेला बळी पडत आहेत. नेवासे तालुक्यातील शनिशिंगणापूर नजिकच्या चारी नंबर चारीलगत राहणार्या एका कुटुंबाला प्रतिष्ठित कुटुंबाला अधंश्रद्धेचा असाच आर्थिक फटका बसला आहे. गावाबाहेरून वास्तव्यास आलेल्या एका महिलेने देवी अंगात येत असल्याचे भासवून दररोज तिच्या आरतीचा पंचक्रोशीत कार्यक्रम सुरू केला. या दरम्यान तिच्या अंगात येणार्या देवीचे म्हणणे ऐकण्यासाठी येणार्यांची संख्याही बर्यापैकी वाढली. या आरतीमध्ये सांगण्यात येणार्या तोडग्यावर लोकांचाही विश्वास वाढू लागला. या मंदीरानजिक राहणार्या मूल होत नसलेल्या एका प्रतिष्ठित कुटुंबातील सुनेवर तिच्याच सासूने करणी केल्याचे संंबंधित महिलेच्या अंगात येणार्या महिलेला देवीने सांगितल्याचा तिने बहाणा केला. करणी उलटविण्यासाठी पन्नास हजारांचा खर्च येणार असल्याचे सांगितले. त्यानुसार तिच्या पतीने दहा-दहा हजार असे करून पैसे देण्याचा निर्णय घेतला आणि पहिला टप्पा सदर महिलेला दिला. या प्रकाराची संबंधित कुटुंब प्रमुखास खबर लागताच त्याने देवी अंगात येत असल्याचा बहाणा करणार्
या त्या महिला आणि तिच्या पतीचा चांगलाच समाचार घेतला. विशेष म्हणजे अंधश्रद्धेचा हा एककलमी कार्यक्रम गेल्या अनेक दिवसांपासून करणार्या या महिलेने पंचक्रोशीत देवीचे भलेमोठे मंदीरही बांधले आहे. बाहेरच्या गावाहून परगावात येऊन जागा विकत घेऊन तेथे स्वतःसाठी घर आणि देवीचे मंदीर बांधून श्रीमंत होण्याचा प्रयत्न करणारे अनेक महाभाग आजही शिंगणापूर परिसरात आहेत. चोरी होत नाही, अशी अख्यायिका असलेल्या शिंगणापूर गावात अशा पद्धतीने लोकांच्या पैसावर भरदिवसा असा दरोडा टाकण्याचे काम संबंधितांनी चालविले आहे. घराण्याचे नाव जाईल, या भीतीने अशा व्यक्तींविरुद्ध कोणीही पोलिसांत तक्रार करीत नाही. याचाच फायदा ही मंडळी घेत आहे. समाज जागृतीची साधने वाढली असतानाही अंधश्रद्धेचा भस्मासूर काही केल्या गाडला जात नाही. हा नक्की प्रगत विचारांचा पराभव आहे, ही लोक चुकीच्या वाटेने जात आहेत, हा तसा गंभीर प्रश्न आहे.
बाळासाहेब शेटेमाझा मोबाईल- ९७६७०९३९३९
— बाळासाहेब शेटे
Leave a Reply