MENU
नवीन लेखन...

श्रीमहालक्ष्मीची कहाणी

आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढं एके दिवशी काय झालं? भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई, आई, आपल्या घरी गौर आण! आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजा-अर्चा केली पाहिजे, घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही तुमच्या वडिलांजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणीन! मुलं तिथून उठली, वडिलांकडे आली. बाबा बाबा, बाजारात जा. घावनघाटल्याचं सामान आणा. म्हणजे आई गौर आणेल!

वडिलांनी घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दु:खी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही. गरिबांपुढे उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्‍चय केला. अर्ध्या वाटेवर गेला, इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं.

बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्या बाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवर्‍यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि अंबिलाकरता कण्या पाहू लागली. तो मडकं आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवर्‍याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली, सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळी जणं आनंदानं निजली.

सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला, मुला मला न्हाऊ घालायला सांग, म्हणून म्हणाली, घावनघाटलं देवाला कर. नाही काही म्हणू नको, रंड काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला बायकोला हाक मारली, अगं, अगं, ऐकलंस का, आजीबाईला न्हाऊ घाल, असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलंबाळंसुद्धा पोटभर जेवली.

म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी आजी दूध कोठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि तुला जितक्या गाईम्हशी पाहिजे असतील तितके खुंट पूर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाईम्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्याचं दूध काढ! ब्राह्मणानं तसं केलं, गाईम्हशींना हाका मारल्या (त्या) वासरांना घेऊन धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाईम्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं. दुसर्‍या दिवशी खीर केली.

संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला, मुला मला आता पोचती कर! ब्राह्मण म्हणू लागला, आजी आजी, तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोचती कसे करू? तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल? म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठागौर म्हणतात ती मीच! मला आज पोचती कर! ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग!

गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देईन, ती सार्‍या घरभर टाक, हांड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भाद्रपदाच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं. दोन खडे घरी आणावे. ऊन पाण्यानं धुवावे. ज्येष्ठागौर व कनिष्ठागौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावनगोड तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीला जेवू घालावं. तिची ओटी भरावी. संध्याकाळी हळदीकुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षयसुख मिळेल. संतती, संपत्ती मिळेल. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण…..

स्त्रीचं मन नेहमी स्वत:च्या कुटुंबाशी जोडलेलं असतं. घराची भरभराट व्हावी घरात नेहमी सुखसमृद्धी नांदावी, आपल्या माणसांचा उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही इच्छा तिच्या मनात सदैव असते त्यामुळेच हे सणवार, व्रतवैकल्ये ती मोठ्या उत्साहाने, श्रद्धेने व मनोभावे करते.

1 Comment on श्रीमहालक्ष्मीची कहाणी

  1. “ज्येष्ठागौरीची कहाणी” आणि “महालक्ष्मीची कहाणी” ह्या दोन पूर्णतया भिन्न कहाण्या आहेत… 😉

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..