श्रीराम जन्म कथा
श्रीरामाचा अवतार दुष्टांचा करण्या संहार
जन्म घेतला पृथ्वीवर परमेश्वरानी //१//
रामासी लाभले मोठेपण तयाठायीं तन मन धन
अर्पिती सर्व भक्तजन प्रेमभरे //२//
थोर ग्रंथ रामायण त्यातील जन्मकथा निवडून
करीत असे अर्पण तुमचेसाठीं //३//
लंकाधीपती रावण होता शिवभक्त महान
उन्मत्त झाला वर पावून त्रास देई सर्वाना //४//
युद्ध केले स्वर्गासी बंदी केले देवांसी
छळूं लागला तयांसी दुष्टपणानें //५//
रावणाच्या त्रासा पोटीं देवांच्या मुक्तीसाठीं
अवतार घेई जगत् जेठी श्रीराम जन्म घेऊनी //६//
आयोध्येचा दशरथ राजा आनंदी होती प्रजा
सुखी बघण्यात मजा त्यास वाटे //७//
एक दुःख होते त्यास पुत्राविना जात दिवस
पुत्र प्राप्त करण्यास प्रयत्न केले बहूत //८//
राजा जाई वशिष्ठ गुरु कडे घालूनी त्यास साकडे
पुत्राविना वंश न वाढे मार्ग सुचवावा //९//
वशिष्ठ गुरु सुचविती यज्ञ करण्या सांगती
पुत्रकामेष्टी यज्ञ महती आगीच असे //१०//
गुरुंचा आशिर्वाद घेऊनी राजा निघाला तेथून
संकल्प केला दशरथांनी पुत्रकामेष्टी यज्ञाचा //११//
श्रृंगऋषी महान होते तप सामर्थवान
विनवितसे जाऊन त्यांचे आश्रमी //१२//
पाद्यपुजा त्यांची करुनी भक्तिभावे विनवूनी
यज्ञासाठीं पाचारण करुनी तयासी बोलावले //१३//
मंडव घातला भला यज्ञाचा भव्य सोहळा
ऋषीगण ब्राह्मण सगळा यज्ञासी जमती //१४//
यज्ञांत आवाहन केले सर्व देव निमंत्रिले
हविर्भाव सर्वासी दिले श्रृंगऋषीनें //१५//
स्पष्ट मंत्रोपचार म्हणून सर्व ऋषी एकसूर धरुन
अग्नीसी टाकती हवन राजा दशरथ // १६//
प्रसन्न झाली यज्ञदेवता पायस कलश हातीं देता
समान भाग राण्यांस वाटता पुत्र प्राप्त होई //१७//
दशरथाच्या राण्या तीन कौसल्या सुमित्रा नि कैकयी लहान
आनंदी झाल्या पायस बघून यज्ञाचा प्रसाद //१८//
कैकयी बसली रुसून पट्टराणी मी लहान असूनी
प्रथम भाग कौसलेस देवून अपमान माझा होई //१९//
प्रसाद घेवूनी बैसली मनीं विचार करुं लागली
तत् क्षणी एक घार आली प्रसाद जाई घेऊन //२०//
सर्वजण होती चकीत कांही समजण्याचे आंत
एक भाग घार नेत आकाशी उडाली //२१//
कैकयी झाली दुःखी शब्द निघेना मुखी
प्रसंग ओडावला एकाएकीं तिचेवर //२२//
आपल्या प्रसादातील भाग देवून कैकयीस सांग
सोडून द्यावा तुझा राग विनवितसे दोन्ही राण्या //२३//
चैत्रशुद्ध नवमीला राम जन्म झाला
कौसल्या मातेला आनंद होई त्रिभुवनी //२४//
सुमित्रेचा लक्ष्मण कैकयीस भरत शत्रुघ्न
चार पुत्र मिळून पितृत्व दिले दशरथासी //२५//
आदर्श जीवन जगला पितृआज्ञे वनवास सोसला
मारिले दुष्ट रावणाला यशस्वी केले रामराज्य //२६//
रामाचा महीमा थोर परमेश्वराचा तो अवतार
भक्तांचा करी उद्धार त्याचे आशिर्वादे //२७//
एक पत्नी, वचनी, बाणी सत्य आणि प्रेमळ वाणी
अद्वितीय गुणांच्या खाणी रामासी ठरवी पुरुषोत्तम //२८//
रामाचे जीवन भव्य आदर्शमय ते काव्य
दाखवोनी जगाला दिव्य ठाव घेई सर्वा मना //२९//
रामनामी मोठेपण जाईल तो उद्धरुन
संकटे जात निघून आठवण येता त्याची //३०//
रामरक्षा स्तोत्र पठण करी तुमचे देह रक्षण
नित्य नियमें वाचन मनोभावें //३१//
” शुभं भवतु ”
डॉ. भगवान नागापूरकर
५-०१११८३
Leave a Reply