नवीन लेखन...

श्री दत्तसंप्रदाय – विविध पंथ आणि परंपरा

श्री स्वामी समर्थ

श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्रीनृसिंहसरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळीवनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये साडेतीनशे वर्षे गेली. त्यांच्याभोवती वारूळ तयार झाले. एकेदिवशी एक लाकूडतोडय़ा लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला. त्या वारुळातून श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले, असे सांगितले जाते. तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते. नंतर ते मंगळवेढय़ात आले. त्यानंतर ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेथेच होते. सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले. सर्व जातीपातीचे, बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्याभोवती गोळा झाले. त्यांचे बाह्य़ आचरण काही वेळा बालक भावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते. त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला. अनेकांना सन्मार्गाला लावले. ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्याच्यावर कृपा केली. निर्भीडता, स्पष्टवक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपलेसे केले. त्यांच्या कार्यकाळात देशात इंग्रजांचा अंमल होता. इंग्रज शासनाच्या वरवंटय़ामध्ये जनता भरडत होती. तिचा आत्मसन्मान त्यांनी जागृत केला. त्यांच्या भक्तांमध्ये हिंदूप्रमाणेच मुसलमान, ख्रिश्चन इ. धर्माचे लोकही सामील होते. त्यांच्याभोवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता. प्रत्येक शिष्याला त्यांनी त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार कार्य दिले आणि परंपरेची पताका दिली. श्रीस्वामी समर्थाच्या विविध शिष्यांद्वारे श्रीस्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठय़ा प्रमाणावर झालेला आहे. यातील प्रमुख शिष्य श्री यशवंत महाराज देवमामलेदार, कोल्हापूरचे कुंभार स्वामी, पुण्याचे बिडकर महाराज, मुंबईचे श्रीतात महाराज, आळंदीचे श्रीनृसिंहसरस्वती, श्रीशंकरमहाराज श्रीवामनबुवा, श्रीगुलाबराव महाराज, श्री केळकरबुवा, श्रीस्वामीसुत, श्रीआनंदभारती, श्रीगजानन महाराज, श्रीमोरेदादा, श्रीआनंदनाथ महाराज हे आहेत. या शिष्यांनी विविध ठिकाणी श्रीस्वामी समर्थाचे मठ स्थापन केले आहेत. तसेच श्रीस्वामी मंदिरे आणि सेवा केंद्रे सुरू केली आहेत.

श्रीपंतमहाराज बाळेकुंद्री

ही परंपरा अवधूत परंपरा म्हणून ओळखली जाते. श्रीदत्तात्रेयांची प्रेमभक्ती हे या परंपरेचे मुख्य सूत्र आहे. श्रीपंत महाराज हे फार मोठे दत्तभक्त होते. त्यांनी बालावधूत महाराजांकडून अवधूत पंथाची दिक्षा घेतली होती. श्रीपंतमहाराजांनी मराठी आणि कन्नड भाषेमध्ये विपुल लिखाण केले आहे. त्यांनी रचलेली दत्तात्रेयांची शेकडो पदे, भजने, आरत्या उपलब्ध आहेत. तसेच त्यांनी भक्तांना लिहिलेली पत्रे प्रसिद्ध आहेत. श्रीदत्तात्रेयांनी अवधूत रूपामध्ये श्रीरामावधूतांवर कृपा केली. श्रीरामावधूतांनी श्रीबालावधूतांवर कृपा केली. आणि श्रीबालावधूतांनी श्रीपंतमहाराजांवर कृपा केली अशी ही परंपरा आहे. या परंपरेबाबत ‘अनादिसिद्ध श्रृतीसंमत संप्रदाय’ असा उल्लेख श्रीपंतमहाराजांनी केला आहे. श्रीदत्तात्रेयावर आणि अवधूतांवर निरतिशय प्रेम हीच अवधूत परंपरेची साधना आहे. विषयवैराग्य, सहजानुभव, बंधुप्रेम, विधिनिषेध त्याग, नि:स्वार्थ कर्म, संचित, अहंकारनाश, समरसता, सद्गुरुप्रीती, अद्वैतभक्ती इ. अवधूतपंथाची मुख्य वैशिष्टय़े आहेत. अवधूतपंथामध्ये बंधने नाहीत. येथे मुक्तीलाही कमी लेखले आहे. मुक्तीपलीकडची प्रेमभक्ती अशी अवधूत परंपरेची धारणा आहे.

टेंबेस्वामी

श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामी श्रीदत्तात्रेयांची शास्त्रशुद्ध उपासना पुन:स्र्थापित करण्याचे श्रेय श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामी यांच्याकडे जाते. सावंतवाडीजवळील माणगाव येथे त्यांचा जन्म झाला. त्यानंतर ते नृसिंहवाडी येथे आले. त्यांनी संपूर्ण भारतामध्ये प्रवास केला आणि दत्त संप्रदायाची पताका सर्वत्र फडकवली. त्यांनी विपुल लेखन केले असून शंकराचार्यानंतर इतके विपुल साहित्य निर्माण करणारे ते एकमेव संत आहेत. त्यांनी संपूर्ण देशामध्ये २४ चातुर्मास केले. विविध दत्तस्थानांचा त्यांनी मागोवा घेतला. आणि त्यांचे पुनज्जीवन केले. प्रत्यक्ष दत्तात्रेयांनी त्यांना नृसिंहवाडी येथे अनुग्रह दिला, असे मानले जाते. त्यांच्याजवळ एक दत्तमूर्ती होती आणि ती त्यांच्याशी बोलत असे, असे सांगितले जाते. आचरणशुद्धता, कर्म आणि रूढीप्रिय अशी परंपरा त्यांनी निर्माण केली. कारंजा, कुरवपूर, पिठापूर अशी अत्यंत महत्त्वाची श्रीदत्तक्षेत्रे त्यांनी प्रकाशात आणली. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा अद्भुत मंत्र त्यांनी सर्व भक्तांना प्रदान केला. दत्त माहात्म्य, दत्तपुराण इ. अनेक मौलिक ग्रंथांबरोबर त्यांनी सर्वाना आणि विशेषत: महिलांना पारायण करण्यासाठी ‘द्विसाहस्त्री गुरुचरित्र’ आणि ‘सप्तशती गुरुचरित्र’ असे महत्त्वाचे ग्रंथ लिहिले. आबालवृद्धांना प्रापंचिक संकटातून सोडवणाऱ्या घोरकष्टोद्धरण स्तोत्राची रचना त्यांनी केली आहे. त्यांचा शिष्य परिवार खूप मोठा आहे. दीक्षित स्वामी, गांडामहाराज, गुळवणी महाराज, नानामहाराज तराणेकर, सीताराम महाराज इ. अनेक शिष्यांनी टेंबे स्वामींची परंपरा फार मोठय़ा प्रमाणामध्ये वाढवली आहे. श्रीरंगावधूत महाराज या त्यांच्या शिष्याने गुजरात राज्यामध्ये दत्त संप्रदायाचा प्रचार-प्रसार मोठय़ा प्रमाणावर केला आहे.

श्रीमाणिकप्रभू

बिदरजवळील हुमनाबाद येथील श्रीमाणिकप्रभू हे दत्तात्रयांचे अवतार मानले जातात. ते ऐश्वर्यसंपन्न आणि राजयोगी होते. या परंपरेला ‘सकलमत’ परंपरा असे म्हटले जाते. ही एकमेव परंपरा अशी आहे की जिथे गादी परंपरा आहे. या परंपरेमध्ये सर्व धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या लोकांना मुक्त प्रवेश आहे. कित्येक मुसलमान, जैन, लिंगायत व्यक्ती या परंपरेच्या आहेत. साधुसंत, बैरागी, शेठ सावकार, राजे, सरदार, संस्थानिक, पंडित शास्त्री, गायक, संगितकार येथे सर्वसामान्य भक्तांबरोबर येत असतात. अत्यंत वैशिष्टय़पूर्ण आणि देदीप्यमान अशी ही दत्तपरंपरा आहे. निजामाच्या राजवटीमध्ये तिचा उगम झाला. अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ श्रीमाणिकप्रभू महाराजांकडे येऊन राहिल्याचे उल्लेख आहेत. श्रीमाणिक प्रभूचे कार्य अत्यंत अलौकिक असे होते. त्यांच्यानंतर श्रीमनोहर माणिकप्रभू, श्रीमरतड माणिकप्रभू यांनी या संप्रदायाचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. दक्षिण भारतामध्ये मुख्यत: कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये ही परंपरा मोठय़ा प्रमाणावर पसरली आहे. श्रीदत्तात्रेय यांच्यासमवेत त्यांची शक्ती म्हणजे मधुमती नावाची शक्ती हे या परंपरेचे उपास्य दैवत आहे. ही एक अतिशय समृद्ध अशी दत्त परंपरा आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..